You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टाटा ग्रुप-सायरस मिस्त्री वादात सुप्रीम कोर्टाचा टाटांच्या बाजूनं निर्णय
टाटा ग्रुप विरुद्ध सायरस मिस्त्री प्रकरणात सुप्रीम कोर्टाने टाटा ग्रुपच्या बाजूने निर्णय दिला आहे. भारताचे सरन्यायाधीश अरविंद बोबडे यांनी सुनावणीवेळी म्हटलं, याप्रकरणी सर्व कायदे टाटा यांच्या बाजूनेच आहेत.
शेअर्स प्रकरणी कायदेशीर मार्ग निवडायचा का, याचा निर्णय टाटा सन्सने घ्यावा असं कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं.
सायरस मिस्त्री टाटा समूहाचे सहावे चेअरमन बनले होते. 2016 साली त्यांना पदावरून हटवण्यात आलं.
रतन टाटा 2012 मध्ये निवृत्त झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांना टाटा ग्रुपचं चेअरमन बनवण्यात आलं होतं. कंपनी कायद्याचं उल्लंघन करून मला हटवण्यात आलं, असा दावा मिस्त्री यांनी केला होता. त्याचसोबत त्यांनी टाटा सन्सच्या व्यवस्थापनाविरोधात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता.
चार वर्ष टाटा समूहाचे चेअरमन राहिल्यानंतर मिस्त्री यांना पदावरून हटवण्यात आलं होतं.
रतन टाटा यांनी टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरून केलेली हकालपट्टी बेकायदेशीर - NCLAT
यापूर्वी म्हणजे 18 डिसेंबर 2019 रोजी टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी चुकीची असल्याचा निर्वाळा आज एका कोर्टाने दिला. 110 अब्ज डॉलर मूल्य असलेल्या टाटा समूहासाठी हा एक मोठा झटका मानला गेला होता.
नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलच्या (NCLAT) दोन न्यायधीशांनी आज हेही म्हटलं की कंपनीचे चेअरमन इमेरिटस (मानद अध्यक्ष) रतन टाटा यांनी सायरस मिस्त्री यांच्याविरुद्ध केलेली कारवाई बेकायदेशीर होती. 2016 मध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरून हटवून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी नेमणूक चुकीची होती, असंही NCLATने आपल्या निर्णयात म्हटलं होतं.
हा निर्णय चार आठवड्यांनी लागू होईल, असं सांगत कोर्टाने रतन टाटा यांना या निर्णयाला आव्हान देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती.
हा विजय माझा वैयक्तिक विजय नसून योग्य प्रशासन आणि अल्पसंख्याक शेअरधारकांच्या हक्कांचा नैतिक विजय आहे, असं सायरस मिस्त्री यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
नेमकं काय झालं होतं?
मिस्त्री हे टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष होते. रतन टाटा यांनी 2012 मध्ये निवृत्तीनंतर टाटा ग्रुपची सूत्रं सायरस मिस्त्री यांच्या हाती सोपवली.
मिस्त्री परिवार आणि त्यांच्या दोन गुंतवणूक कंपन्या - सायरस इन्व्हेंस्टमेंट्स आणि स्टर्लिंग इन्व्हेंस्टमेंट्स प्रा. लि. - यांची टाटा सन्समध्ये सर्वांत जास्त, म्हणजे 18.4 टक्के भागीदारी आहे.
मात्र ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांना कंपनीच्या अध्यक्षपदावरून तडकाफडकी हटवण्यात आलं होतं. काही वेळाने त्यांची कंपनीच्या संचालकमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती.
फेब्रुवारी 2017 मध्ये टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (TCS)चे व्यवस्थापकीय संचालक एन. चंद्रशेखरन यांची टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
याविरुद्ध त्यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये तक्रार दाखल केली. हे कंपनीच्या कायद्यांचं उल्लंघन आहे असं सांगत सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या व्यवस्थापनात गैरव्यवहाराचा आरोपही केला.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)