वॉलमार्ट-फ्लिपकार्ट सौद्याने कशी बदलणार तुमची शॉपिंग कार्ट?

    • Author, दिनेश उप्रेती
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अमेरिकेची बलाढ्य ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टने भारतीय कंपनी फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. वॉलमार्टची फ्लिपकार्टमधील गुंतवणूक 77 टक्के असणार आहे. दुसऱ्या शब्दांत वॉलमार्ट कंपनी या गुंतवणुकीसाठी फ्लिपकार्टला तब्बल 1,600 कोटी डॉलर म्हणजेच एक लाख 7 हजार कोटी देणार आहे.

वॉलमार्ट कंपनीतर्फे करण्यात आलेली ही सगळ्यांत मोठी गुंतवणूक मानली जात आहे.

पाच वर्षांपूर्वी अॅमझॉन या अमेरिकन ई-कॉमर्स कंपनीने भारतात पाय रोवल्यापासून फ्लिपकार्टवर दडपण वाढलं आहे. अॅमेझॉन फ्लिपकार्टला खरेदी करण्यासाठीही उत्सुक होती. मात्र वॉलमार्टने व्यवहारात बाजी मारली.

फ्लिपकार्टचे देशभरात 10 कोटी ग्राहक आहेत.

दहा वर्षांपूर्वी दोन तरुण अॅमेझॉनच्या ऑफिसमध्ये इंटर्नशिपमध्ये आले होते. मात्र अॅमेझॉनने त्यांना स्वत:चे कर्मचारी म्हणून ताफ्यात समाविष्ट करून घेतलं नाही.

पुढच्या काही वर्षात अॅमेझॉनला याच दोन कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनीशी टक्कर द्यावी लागेल, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

IITतून शिक्षण घेतलेल्या सचिन आणि बिन्नी बन्सल या जोडगोळीने भारतात परतल्यानंतर 2007 मध्ये फ्लिपकार्ट नावाच्या कंपनीची स्थापना केली.

वॉलमार्टचे प्रयत्न

वॉलमार्टचे गेल्या काही वर्षांपासून भारतातला पसारा वाढवण्याचे प्रयत्न कसोशीने सुरू होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याच्या निर्णयानंतर वॉलमार्टच्या गंगाजळीत घसघशीत वाढ झाली होती.

फ्लिपकार्टमध्ये मायक्रोसॉफ्ट, टेनसेंट तसंच सॉफ्टबँक यांचीही भागीदारी आहे. यापैकी कोणत्याही कंपनीने आपला हिस्सा विकलेला नाही. सॉफ्टबँकेकडे सर्वाधिक म्हणजे 20 टक्के भागीदारी आहे.

ई-कॉमर्समध्ये भारत कुठे?

भारतात ऑनलाइन शॉपिंगचं पेव फुटतं आहे. मार्केट रिसर्च फर्म फॉरेस्टरच्या अभ्यासानुसार, गेल्या वर्षी ऑनलाइन कारभाराने 2100 कोटी डॉलरची वेस ओलांडल्याचं स्पष्ट झालं आहे.

अर्थ क्षेत्रातील अग्रगण्य मॉर्गन स्टॅन्ली कंपनीच्या नव्या संशोधनानुसार भारतात 2026 पर्यंत ऑनलाइन कारभाराची व्याप्ती 200 अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल. याचा अर्थ पुढच्या आठ वर्षात आताच्या आकडेवारीत 9 ते 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांना भारतातल्या ऑनलाइन बाजाराच्या आकडेवारीची पूर्ण जाणीव आहे. भारतीय बाजारपेठेबाबत ते म्हणतात, "रिटेल बाजारपेठांमध्ये भारत ही सगळ्यांत आकर्षक अशी बाजारपेठ आहे. आकारमान आणि विकासदर या दोन्ही आघाड्यांवर भारतीय बाजारपेठ अव्वल आहे. ई-कॉमर्स क्षेत्रात परिणामकारक बदल घडवून आणणाऱ्या कंपनीत आम्ही गुंतवणूक केली आहे."

130 कोटी लोकसंख्येच्या भारतीय बाजारपेठेकडे अॅमेझॉन आणि वॉलमार्ट या बलाढ्य कंपन्यांची बारीक नजर आहे हे मॅकमिलन यांच्या उद्गारांतून स्पष्ट होते.

वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट यांच्यातील व्यवहाराचा भारतीय ऑनलाईन मार्केटवर काय परिणाम होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे.

कुणासाठी चिंता?

फ्लिपकार्टच्या माध्यमातून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना या डीलनंतर चिंता वाटणं साहजिक आहे. "ऑनलाइन वेंडर्संची संख्या 8 ते 10 हजार आहे. त्यांच्यासाठी हे डील अडचणीचं ठरू शकतं," असं ऑल इंडिया ऑनलाइन वेंडर्स असोसिएशनने म्हटलं आहे.

"अत्यंत कमी किमतीत वस्तूंची विक्री करण्यासाठी वॉलमार्ट लोकप्रिय आहे. असं करून प्रतिस्पर्ध्यांचं नामोनिशाण मिटवून टाकण्याचा वॉलमार्टचा प्रयत्न असतो. वॉलमार्टकडे पैशांची चणचण नाही. त्यांच्या व्यापाराचं जाळं जगभर पसरलं आहे. दुसऱ्या देशातून स्वस्तात सामान खरेदी करून वॉलमार्ट तेच सामान भारतीय ग्राहकांच्या माथी मारू शकतं," असं ऑल इंडिया ऑनलाइन वेंडर्स असोसिएशनचे महासचिव सुधीर मेहरा यांनी सांगितलं.

वॉलमार्टने चार वर्षांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. मात्र त्यांनी स्वत:ला कॅश-अँड-कॅरी, म्हणजे पारंपरिक दुकानांमधून विक्रीपुरतं मर्यादित ठेवलं होतं.

हे धोरण राबवण्याची त्यांची इच्छा नव्हती. मात्र भारत सरकारच्या परकीय गुंतवणुकीसंदर्भातील जाचक नियम आणि अटी हे यामागचं कारण होतं. म्हणूनच आजही वॉलमार्टचे देशभरात केवळ 21 शोरूम आहेत.

भारती कंपनीशी व्यवहार फिस्कटल्यानंतर वॉलमार्ट नव्या इराद्याने भारतीय बाजारपेठेत उतरत आहे. यावेळी क्षेत्र नवीन आहे आणि भागीदारही वेगळा आहे. कट्टर प्रतिस्पर्धी अॅमेझॉनला चीतपट करण्यासाठी वॉलमार्ट सर्व खेळी करण्याची शक्यता आहे.

"येत्या काही दिवसात फ्लिपकार्टच्या माध्यमातून वॉलमार्ट डिस्काउंट स्कीममध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. ऑनलाइन ग्राहकांचा यात फायदा असतो. मात्र व्यापारी आणि छोटे व्यापाऱ्यांचं यांना मोठा फटका बसेल," असं मेहता यांनी सांगितलं.

मेक इन इंडियाचं काय झालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेक इन इंडिया संकल्पना पोकळ असल्याचं ऑनलाइन वेंडर्स असोसिएशने सांगितलं. मोदी सरकार एकीकडे मेक इन इंडियाची घोषणा करतं तक दुसरीकडे वॉलमार्टसारखी कंपनी भारतात घाऊक प्रमाणात गुंतवणूक करत आहे.

प्रचंड पैशाच्या बळावर व्यापाऱ्यांना संपवण्यासाठी वॉलमार्ट कुप्रसिद्ध आहे. भारतीय रिटेल विक्रेत्यांसाठी समान संधी उपलब्ध होणार नाही आणि ते स्पर्धेत मागे पडतील.

किंमत कमी आणि वैविध्य जास्त

वॉलमार्टच्या आगमनामुळे भारतीय रिटेलविश्वाला संजीवनी मिळणार आहे. वॉलमार्टच्या प्रवेशामुळे ग्राहकांना कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू उपलब्ध होऊ शकतील. त्याच वेळी ग्राहकांना खरेदी करताना वस्तू तसेच सेवांमध्ये प्रचंड वैविध्य अनुभवता येणार आहे.

वॉलमार्टला काटशह देण्यासाठी अॅमेझॉनकडून आक्रमक डावपेच स्वीकारले जाऊ शकतात. तसं झालं तर त्यात ग्राहकांचाच फायदा होणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)