You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAA: आसाम आंदोलनात मारल्या गेलेल्या सॅम स्टफर्डचा दोष काय होता? - ग्राउंड रिपोर्ट
- Author, फैसल मोहम्मद अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी, गुवाहाटी
सॅम स्टफर्ड आईला फोन करून म्हणाला होता, "खूप भूक लागली आहे आई. चिकन पुलाव बनव."
मात्र, नशिबात वेगळंच काहीतरी लिहिलं होतं. काही क्षणातच दोन गोळ्यांनी त्याला लक्ष्य केलं. एक गोळी सॅमच्या हनुवटीतून जात डोक्याकडून बाहेर आली तर दुसरी त्याच्या पाठीत घुसली.
गेल्या गुरुवारीला घडलेल्या या घटनेने त्याची आई अर्थात मॅमोनी स्टफर्डला रडू कोसळत होतं. मात्र, स्वतःला सावरत त्या सांगतात, "तो चिकन पुलाव खाऊ शकला नाही. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले."
मॅमोनी स्टफर्ड सांगत होत्या, "त्या दिवशी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात लताशील मैदानात विरोध प्रदर्शन होतं. त्यात आसामचे सुप्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांच्यासह अनेक मोठे कलाकार येणार होते. सॅमही सकाळी सकाळीच तिकडे गेला होता. संध्याकाळी घरी परत येत असताना त्याने फोन केला होता."
सॅम रस्त्याच्या एकीकडून घरी परत जात असताना समोरून एक छोटी रॅली येत होती तेव्हा गोळ्या झाडण्यात आल्या, असं प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबीय यांचं म्हणणं आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यापासूनच आसाममध्ये विरोध प्रदर्शनांना सुरुवात झाली आहे. या आंदोलनांमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत.
आसाममध्ये तीन जणांनी गमावले प्राण
काहींच्या मते ही आंदोलनं इतकी मोठी आहेत की गेल्या तीन दशकांत एवढी मोठी आंदोलनं झालेली नाहीत. प्रशासनावर मोठा दबाव होता आणि यातच हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.
सॅम स्टफर्ड जे जिथं प्राण गेले तिथं लोकांनी विटा लावून त्याचा फोटो ठेवला आहे. तिथे एक दिवा दिवस-रात्र पेटत असतो.
शनिवारी त्याच ठिकाणी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सॅमच्या कुटुंबीयांनाही शोकसभेसाठी बोलवण्यात आलं होतं. रविवारी तिथून एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं.
जवळच्याच गल्लीत राहणारे मुफीद लश्कर गुरुवारी संध्याकाळी निघालेल्या रॅलीत सहभागी झाले होते.
दहशतीचं वातावरण
मुफीद लश्कर सांगतात, "दूर काही एसयूव्ही वाहनं उभी होती. चार किंवा पाच. त्या सर्व एसयूव्हींचे हेडलाईट एकदम ऑन झाले आणि समोरून येणारी रॅली अचानक उजेडात न्हावून निघाली. मात्र, मिनिटभरातच सर्व हेडलाईट एकत्रच बंद झाले आणि लाईट बंद होताच गोळी झाडल्याचा मोठा आवाज आला. आणि समोर एक मुलगा रस्त्यावर पडत आहे असं मला दिसलं."
मुफीद लष्कर सांगतात की यानंतर पाच पांढऱ्या एसयूव्ही गाड्यांचा तो ताफा रस्त्यावर पालथा पडलेल्या सॅम स्टफर्डच्या जवळून निघून गेला.
आपण गोळ्या झाडल्या नाही, असं म्हणत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचं म्हटलं आहे.
मात्र, आसाममध्ये होणाऱ्या आंदोलनांवर लगाम लावण्याची जबाबदारी काही कठोर पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
आंदोलनं अजूनही सुरूच असली तरी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
इंटरनेटवर बंदी
दुपारनंतरच दुकानं बंद होऊ लागतात. संध्याकाळी रस्ते सामसूम होतात. चार वाजल्यानंतर शहरात संचारबंदी असते. इंटरनेटवर पूर्णपणे बंदी आहे. अनेक ठिकाणी वाय-फायही बंद आहे.
सॅम स्टफर्डच्या घरी आप्तेष्टांपासून राजकारण्यांची वर्दळ सुरू आहे. प्रार्थनासभा होत आहेत. त्याला 'शहीद' म्हटलं जात आहे. सॅमची आई मुस्लीम तर वडील ख्रिश्चन आहेत. मात्र, काही हिंदू स्टफर्डचं श्राद्ध करावं, असंही म्हणत आहेत.
आता नाताळ साजरा होणार नाही
सॅमची बहीण मासूमी बेगम साश्रू नयनांनी सांगत होती, "त्याला एव्हिएटर स्कूटर खूप आवडायची. तो नेहमी म्हणायचा काहीही कर पण आणून दे. मी त्याला म्हटलं होतं की कर्ज काढूनही आणून देईन."
मात्र, नाताळाच्या आठ-दहा दिवसांआधी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्याची मित्र मंडळी यायची. खाणं-पिणं व्हायचं. मात्र, यंदा नाताळ साजरा होणार नाही. बोलता बोलता मासूमी यांना अश्रू अनावर झाले.
"त्याच्याकडे कुठलंही शस्त्र नव्हतं. मग त्याला का मारलं? गोळीच झाडायची होती तर त्याच्या पायावर झाडायची. आम्ही तरीही त्याचा सांभाळ केला असता. पण जिवानीशी का मारलं? त्यांना हा अधिकार कुणी दिला," मासूमी विचारत होती.
दरम्यान वडील ख्रिश्चन, आई आणि बहीण मुस्लीम आणि काकू हिंदू असणाऱ्या सॅमला भारताच्या नवीन व्यवस्थेनुसार (नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC) कुठल्या गटात ठेवणार?, हा प्रश्नही उरतोच.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)