रणजीत सावरकर: सावरकरांनी अटी मान्य केल्या होत्या पण माफी मागितली नव्हती #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1) 'सावरकरांनी अटी मान्य करून सुटका करून घेतली, माफी मागितली नव्हती'

सावरकरांनी कधीच माफी मागितली नव्हती. त्यांनी अटी मान्य करून सुटका करून घेतली होती, असं म्हणत सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर दिले. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.

सावरकरांनी अटी मान्य केल्या, पण कधीही ब्रिटीश राजनिष्ठेची शपथ घेतली नाही, जी पंडित जवाहरलाल नेहरुंनी घेतली होती, अशा शब्दांत रणजीत सावरकरांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

'रेप इन इंडिया'संदर्भातील वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजप खासदारांनी केली होती. त्यांना उत्तर देताना भारत बचाव रॅलीत राहुल गांधी म्हणाले, "सत्य बोललो म्हणून मला माफी मागायला सांगितली जातेय. मी काहीही चुकीचं बोललो नाही. त्यामुळं मी घाबरणार नाही. माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे."

2) भाजपनं आता दारं उघडी ठेवू नयेत - संजय राऊत

शिवसेनेसाठी दारं उघडी आहेत, असं अप्रत्यक्ष आवाहन करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, चर्चेची वेळ निघून गेलीय, त्यामुळं आता कुणीही दारं उघडी ठेवू नयेत. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

"जेव्हा दारं उघडायची होती, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले. ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या स्वीकारायला तयार नव्हते. हे चित्र कसं निर्माण झालं याचा विचार त्यांनी केला पाहिजे," असं संजय राऊत यांनी फडणवीसांना उद्देशून म्हटलं.

तसेच, शिवसेनेनं जनमताचा अनादर करून अपेक्षाभंग केल्याची टीका फडणवीसांनी केली होती. त्यावर संजय राऊत म्हणाले, आम्ही त्यांच्या त्यांच्या कोणत्याही वक्तव्याकडे गांभिर्यानं पाहत नाही.

3) महामंदीच्या दिशेनं भारताची वाटचाल - अरविंद सुब्रमण्यन

भारताच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मोठ्या मंदीच्या दिशेनं सुरू असून, अर्थव्यवस्था आयसीयूत जात असल्याची चिंता अर्थतज्ज्ञ अरविंद सुब्रमण्यन यांनी व्यक्त केलीय. सुब्रमण्यन हे देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

भारतीय अर्थव्यवस्थेला सध्या ट्वीन बॅलन्स शीटच्या (टीबीएस) दुहेरी लाटेचा सामना करावा करावा लागत असून, ही स्थिती महामंदीच्या स्वरूपात परिवर्तीत होत आहे, असं अरविंद सुब्रमण्यन म्हणाले. हार्वर्ड विद्यापीठातील सेंटर फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या विभागाच्या एका अहवालात सुब्रमण्यन यांनी हे भाष्य केले आहे.

भारतातील आर्थिक मंदी ही सामान्य मंदी नसून, ही महामंदी आहे. यामुळे अर्थव्यवस्थेची गंभीर्याने काळजी घेण्याची गरज निर्माण झाल्याचेही सुब्रमण्यन म्हणाले आहेत.

4) विखे ज्या पक्षात जातात, तिथलं वातावरण बिघडवतात - राम शिंदे

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेतल्यानंतर पक्षाला चांगले दिवस येतील असं वाटलं होतं, मात्र उलटच वातावरण झालं, असं भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे म्हणाले. सकाळनं ही बातमी दिलीय.

"अहमदनगर जिल्ह्यात बारा जागा जिंकून आणण्याऐवजी त्या जागा कमी झाल्या. विखे ज्या पक्षात जातात, तिथं खोड्या करून पक्षासाठी हानिकारक वातावरण निर्माण करतात," असंही राम शिंदे म्हणाले.

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा जिथं पराभव झाला, त्या जागांची कारणमीमांसा करण्यासाठी मुंबईतील वसंतस्मृती कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राम शिंदे यांनी नगरमधील पराभवाचं खापर विखे पाटील यांच्यावर फोडलं.

5) दिल्लीत 100 कोटींचं कोलंबियन कोकेन जप्त

दिल्लीत 100 कोटींचं ग्रेड-ए कोलंबियन कोकेन जप्त करण्यात आलं. नार्कोटिस कंट्रोल ब्युरोनं ही कारवाई केली. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

वर्षअखेरीस होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही आतापर्यंची सर्वांत मोठी कारवाई मानली जातेय.

या कारवाईत नऊ जणांना अटक करण्यात आलं असून, त्यात एका इंडोनिशियन महिलेचाही समावेश आहे. तसेच, नायजेरियन आणि अमेरिकन नागरिकही अटकेत असलेल्यांमध्ये आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)