You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंकजा मुंडे : हातात मशाल घेऊन राज्यभर दौरा आणि एक दिवसाचं उपोषण करणार
पंकजा मुंडे यांनी 1 डिसेंबर रोजी फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर त्या काय बोलतील याकडे आज सर्वांचं लक्ष लागलं होतं. पंकजा मुंडे बंडखोरी करतील की पक्षांतर करतील याचा निर्णय आज होईल अशी चर्चा सुरू होती. या चर्चेला पूर्णविराम देत आपण पक्षातच राहणार असल्याचं माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
आता बॉल भाजपच्या कोर्टात आहे. मी पक्षाला सोडणार नाही पण पक्षाला जर मला सोडायचं असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा. भाजपने सर्व नाराज लोकांशी संवाद साधून त्यांचे गैरसमज दूर करावेत असं आवाहनही त्यांनी केलं. 26 जानेवारी रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने कार्यालय काढून 27 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे एक दिवसीय उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
गोपीनाथगडावरील कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.
पंकजा मुंडे यांच्या भाषणातील मुद्दे
- पराभव वगैरे चिल्लर गोष्टींनी खचणारी मी नाही. ज्या मुंडे साहेबांच्या चितेला अग्नी दिल्याचं दुर्भाग्य माझ्या वाट्याला आलं.
- मी एक डिसेंबरला पोस्ट लिहिली होती की 12 डिसेंबर ला बोलणार. तेव्हापासून माध्यमांचं लक्ष होतं.
- सूत्रं एवढी हुशार होती तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतलेली तुम्हाला कसा कळला नाही.
- निवडणूक निकाल ते उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या प्रवासापर्यंत मी जो राजकारणाचा अनुभव घेतला तितका अनुभव गेल्या 15 वर्षांत आला नाही.
- मुंडे साहेब गेल्यानंतर मी संघर्ष यात्रा काढली. माझ्यासोबत कुणीच नव्हतं पण लोकांनी मला साथ दिली.
- माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. मी कधीही बंड करणार. पक्षाने जाहीर केलेला मुख्यमंत्री निवडून यावा म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत लढले.
- डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, सुदर्शनजी आणि मोहन भागवत यांचा वारसा फक्त काही लोकांकडेच आहे का? आमच्याकडे नाही का?
- मी कुणावर नाराज नाही कारण मला कोणाकडून काही अपेक्षा नाही.
- पक्ष ही प्रक्रिया असते, त्याची मालकी कुणा एकाकडून नाही. या पक्षाचं नेतृत्व व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांनी भूषवलं आहे. आता अमित शहा अध्यक्ष आहे पुढे दुसरं कुणी येईल.
- मला कोअर कमिटीतून मुक्त करा.
- मी बंडखोर आहेच बंडखोर लोकच स्वातंत्र्य मिळवू शकतात.
- मी मशाल घेऊन महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. मी घरात बसून राहणार नाही. 26 जानेवारी रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे.
- 27 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे एक दिवसाचं उपोषण करणार आहे.
- ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार झाला असेल त्या ठिकाणी मी जाणार आहे.
- उद्धव ठाकरे यांना आमच्यासाठी काही करायचं असेल तर मराठवाडा दुष्काळमुक्त करावा.
एकनाथ खडसे यांच्या भाषणातील मुद्दे
- पंकजा मुंडे या पराभूत झाल्या नसून त्यांना पराभूत केलं गेलं असं मत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी परळीत व्यक्त केलं.
- भाजपची वाटचाल गेली चाळीस वर्षे आम्ही पाहिली आहे. शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून पक्षाला ओळखलं जायचं त्या पक्षाला बहुजन पक्षाचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं.
- शेकडो लोकांना एकत्र घेऊन जाण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. मुंडे साहेबांनी आमच्या सर्वांची महाराष्ट्राला ओळख करुन दिली.
- मुंडे साहेबांनी मोकळ्या मनाने कार्यकर्ता घडवला, त्यांनी कधीही पाठीत खंजिर खुपसला नाही. मुंडे साहेबांची आठवण आली की आज ओक्साबोक्शी रडावसं वाटतंय.
- तुम्ही (कार्यकर्ते) आहात म्हणून आम्ही जगतोय. ज्यानं सुखदुःखात हात दिला ते मुंडे आज आमच्यात नाही हे सहन होत नाही."
- जिथं गोपीनाथ तिथं एकनाथ असं म्हटलं जायचं असं सांगून खडसे म्हणाले, मुंडे साहेब आपल्यात नाहीत हे पटत नाही.
- पक्षाविरोधात बोलू नका असा पक्षानं आदेश दिला आहे. आज पक्षाचं जे चित्र आहे ते महाराष्ट्राला मान्य नाही. वरुन गोड बोलायचं आणि दुसऱ्याला साथ देऊन पाडायचं हे मला माहिती आहे.
- पंकजा मुंडे यांचं दुःख मला समजतंय. गोपीनाथ मुंडे यांच्या मतदारसंघात त्यांची मुलगी पराभूत झाली हे मला मान्य नाहीय.
चंद्रकांत पाटील यांच्या भाषणातले मुद्दे:
- गोपीनाथ रावांनी शरद पवारांना अंगावर घेतलं, ते यापूर्वी कुणीही केलं नव्हतं. विरोधकांना अंगावर घ्यायचा, सक्षम पक्षाला अंगावर घ्यायची शिकवण गोपीनाथ मुंडेंनी दिली.
- पंकजा ताईंनी मंत्री म्हणून खूप चांगलं काम केलं. त्या पराभूत झाल्या, हे मान्य आहे. त्यांना काहीतरी बोलायचं आहे, हेही मान्य आहे. एकनाथ खडसेंचं दु:ख समजू शकतो. नाथाभाऊंना तिकीट देण्यात आलं नाही, मला तिकीट द्या, मुलीला देऊ नका असं ते म्हणत होते. आणि निवडणुकीतंनतर ते खरं ठरलं. रोहिणीचा अवघ्या 900 मतांनी पराभव झाला.
- पण, असं असलं तरी पंकजा ताई आणि एकनाथ खडसे यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, त्याची दखल घेतली जाईल, असा मी शब्द देतो.
गे्ल्या आठवड्यात पंकजा यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांना अखेर मीडिया समोर येऊन उत्तर दिलं होतं. भाजप नेते विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी संध्याकाळी पत्रकारांशी बोलाताना त्यांची बाजू मांडली.
"मला आत्मचिंतनासाठी वेळ हवा आहे. मी दरवर्षी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेत असते. फेसबुक पोस्टची सर्व मीडियानं योग्य बातमी दिली. पण काही वर्तमानपत्रांनी मी पक्ष सोडणार अशा बातम्या दिल्या. त्यामुळे या चर्चेला वेगळा सूर मिळाला. मी यामुळे दुःखी आहे, व्यथित आहे. माझ्यावर असा आरोप केला जात आहे की मी कुठल्या पदासाठी असं करत आहे. पण उलट आता मला कुठलं पद मिळू नये म्हणून हे सगळं सुरू आहे का," असा सवाल पंकजा मुंडे यांनी मीडियाला उद्देशून उपस्थित केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)