जागतिक पर्यावरण दिनः सृष्टीतून लोप पावलेले हे प्राणी तुम्हाला माहिती आहेत का?

प्रलयासारखी मोठी नैसर्गिक आपत्ती आल्याने पृथ्वीवरून एखादा जीव नामशेष होतो, असा एक सर्वसाधारण समज आहे. एखादा सजीव प्राणी लोप पावणं ही दुर्मिळ घटना आहे, असंही वाटू शकतं.

उदाहरणार्थ पृथ्वीवरून डायनॉसोर नामशेष झाले. मात्र, प्रत्यक्षात नामशेष होण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते आणि विश्वास बसणार नाही, इतक्या वेगाने ही प्रक्रिया सुरू आहे.

वन आणि वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाऱ्या World Wide Fund for Nature या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी जगातून जवळपास 10 हजार सजीव प्रजाती नष्ट होत आहेत.

पृथ्वीवर नेमक्या किती प्रजाती आहेत, याची निश्चित आकडेवारी माहिती नसल्यामुळे त्यापैकी दरवर्षी किती लोप पावतात, याचा नेमका आकडा सांगता येत नसल्याचं WWFचं म्हणणं आहे.

मिस वॉलड्रॉन्स रेड कोलोबस (घाना आणि आयव्हरी कोस्ट)

मिस वॉलड्रॉन्स रेड कोलोबस ही माकडांची एक प्रजाती आहे. लाल तोंडाच्या या माकडाचा आकार मध्यम उंचीचा होता. 1978 साली हे माकड अधिकृतरित्या शेवटचं बघितलं गेलं. त्यानंतर ते दिसलंच नाही. त्यामुळे 2000 साली माकडांची ही प्रजाती लोप पावल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं होतं.

पश्चिम आफ्रिकेतल्या घाणा आणि आयव्हरी कोस्टच्या सीमाभागात आढळणारे हे माकड खूपच खास मानले जायचे. याचं कारण म्हणजे या माकडांना अंगठेच नव्हते.

ही माकडं स्वभावाने शांत होती. मोठ्या कळपात राहायची. उंच झाड हे त्यांचं निवासस्थान. मात्र, मानवाने जंगलतोड सुरू केली आणि यांचं घर हिरावलं गेलं.

जंगल कमी होऊ लागलं तसतसे यांचे कळपही लहान होऊ लागले. त्यामुळे सुरक्षितता धोक्यात आली. शिकाऱ्यांचा धोका वाढला. शिवाय, कळपातल्या जवळच्या नात्यातल्या माकडापासून प्रजोत्पादन होऊ लागल्याने (in-breeding) जेनेटिक समस्या उत्पन्न होऊ लागल्या.

यांगत्से रिव्हर डॉल्फीन (चीन)

डॉल्फीन तसा समुद्रात आढळणारा मासा. मात्र, चीनमधल्या यांगत्से नदीतही डॉल्फीनची एक प्रजाती अस्तित्वात होती. फिकट पांढऱ्या रंगाची ही डॉल्फीन तिच्या समुद्रातल्या बहिणींपेक्षा अंगकाठीला नाजूक आणि अत्यंत सुंदर होती.

तिला बैजी डॉल्फीनही म्हणतात. चीनी भाषेत 'बैजी' म्हणजे 'पांढरे कल्ले असणारी डॉल्फीन'.

ही डॉल्फिन दिसायला साधी असली तरी तिची 'प्रतिध्वनी यंत्रणा' म्हणजेच इको सिस्टिम समुद्रातल्या डॉल्फीनहून खूप जास्त विकसित झालेली होती. कदाचित दृष्टी अधू असल्याने तिने तिची प्रतिध्वनी यंत्रणा अधिक विकसित केली असावी. एखादा छोटा मासा नेमका कुठे आहे, हे देखील तिला प्रतिध्वनीवरून कळायचं. इतकंच नाही तर कळपातल्या इतर डॉल्फीनसोबत मिसळणं, समन्वय साधणं, भावना व्यक्त करणं हे सगळं ती आपल्या आवाजातून साध्य करायची. याच प्रतिध्वनीवरून तिला संकटाचा अंदाज यायचा.

मात्र, वाढत्या औद्योगिकरणाने यांगत्से नदीत बेसुमार मासेमारी होऊ लागली. मोठमोठी जहाजं नदीत येऊ लागली. फॅक्ट्रीमधल्या कचऱ्यामुळे नदी प्रदूषित झाली.

नदीत बोटी, जहाजांची वर्दळ वाढलयाने बैजी डॉल्फीन गोंधळात पडली आणि तिचं नदीत जगणंच अवघड होऊन बसलं.

त्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. अखरे 2006 साली नदीत राहणाऱ्या डॉल्फीनची ही एकमेव प्रजाती नष्ट झाल्याचं घोषित करण्यात आलं.

कॅरेबियन मॉन्क सील (जमैका आणि निकारागु दरम्यानचा सेरॅनिला तट)

कॅरेबियन सीलची ही प्रजाती मॅक्सिकोच्या खाडी किनारीही आढळायची.

या सीलच्या चरबीत असलेल्या तेलासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. शिवाय मासेमारी वाढल्याने त्यांना अन्नच मिळेनासं झालं. परिणामी कॅरेबियन मॉन्क सील नामशेष होऊ लागले.

1952 साली पश्चिम कॅरेबियन समुद्र किनाऱ्यावरील जमैका आणि निकारागुआ दरम्यानच्या सेरॅनिला तटावर त्यांना शेवटचं बघण्यात आलं होतं.

अलाबामा पिगटो (अमेरिका)

अतिशय शांत स्वभावाचे हे शिंपले 2006 पर्यंत अमेरिकेतल्या अलाबामा प्रांतातल्या मोबाईल नदीत आढळायचे.

या शिंपल्यांचा आकार डुकराच्या पायासारखा असल्याने त्यांना 'पिगटो' असं नाव पडलं. नदीतलं गढूळ पाणी स्वच्छ करण्याची क्षमता या शिंपल्यात होती. मात्र, नदीतलं प्रदूषण इतकं वाढलं की त्याचा सामना या छोट्या जीवाला करता आला नाही.

मोबाईल नदीत राहणारे हे शिंपले नामशेष झाल्याने कारखान्यांमधून नदीत सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त पाण्याचं सत्य जगासमोर आलं. या रसायनयुक्त पाण्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या अफ्रिकन-अमेरिकी समुदायतल्या लोकांना अनेक जीवघेणे आजार होऊ लागले.

डोडो (मॉरिशस)

डोडो हा कबतूर वर्गीय पक्षी. मात्र, तो उडू शकत नव्हता. या पक्ष्याला 'नामशेष झालेला सर्वाधिक प्रसिद्ध पक्षी' असा विचित्र सन्मान प्राप्त झाला आहे. याचं कारण म्हणजे अगदी डायनॉसॉर एवढा नसला तरी हा पक्षीही हजारो वर्षांपूर्वी नामशेष झाला आहे.

गबाळा किंवा गचाळ दिसणारा आणि उडू न शकणारा डोडो मॉरिशसमध्ये आढळायचा. इतर प्राणी त्याची शिकारही करत नसतं. म्हणजेच त्याला नैसर्गिक शिकारी नव्हता.

जेव्हा मानवाने मॉरिशस बेटावर पाय ठेवला तेव्हा त्यांनी आपल्यासोबत इतर प्राणी आणले. शिवाय, मॉरिशसला आल्यावर मानवानेही अन्नाचा शोध सुरू केला. त्यात डोडोची मोठ्या प्रमाणावर शिकार झाली आणि अठराव्या शतकाच्या शेवटी-शेवटी तो नामशेष झाला.

स्टेलर्स सी काऊ (अलास्का आणि रशियाच्या दरम्यान)

स्टेलर्स सी काऊ हा एक जलचर प्राणी आहे. सेरेनियन या प्राण्याची ही लोप पावलेली प्रजाती. अलास्का आणि रशिया यांच्या दरम्यान असलेल्या समुद्रात हा प्राणी आढळायचा.

स्वभावाने अत्यंत शांत, समुद्रातील वनस्पतीवर जगणारा आणि अत्यंत थुलथुलीत असा हा प्राणी आकाराने भव्यदिव्य होता. त्यामुळेच त्याला 'सी काऊ' म्हणजे 'सागरी गाय' असंही म्हटलं जातं.

स्टेलर्स सी काऊची लांबी 9 मीटर पर्यंत असू शकते. त्याच्या अतिप्रचंड आकार आणि चरबी यामुळे सहाजिकच त्याची मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. स्टेलर्स सी काऊचं मांस बदामाच्या तेलात मॅरिनेट करून बनवलेल्या डिशची चव अगदी बीफसारखी असल्याने ही डिश त्याकाळी फार लोकप्रिय होती.

डोडो ज्या काळात नामशेष झाला त्याच दरम्यान स्टेलर्स सी काऊ ही प्रजातीही पृथ्वीतलावरून नष्ट झाली.

क्वागा (दक्षिण आफ्रिका)

क्वागा हा मैदानी झेब्राच्या वर्गातला गवत चरणारा शाकाहारी प्राणी. त्याची चामडीच त्याच्या विनाशाचं कारण ठरली.

क्वागाच्या अंगावर पुढच्या बाजूला झेब्रासारखे पट्टे असायचे. मात्र, पाठीपासूनचा मागचा भाग घोड्यासारखा प्लेन असायचा.

त्याच्या या विशिष्ट रुपामुळे त्याची कातडीला मोठ्या किंमतीला विकली जायची. कातडीच्या हव्यासापोटी त्याची मोठ्या प्रमाणावर शिकार झाली.

तसंच, दक्षिण आफ्रिकेत जेव्हा डच वसाहत आली तेव्हा क्वागामुळे आपली गुर-ढोरं, शेळ्या-मेंढ्या यांच्यासाठी कुरण कमी पडेल, या भीतीमुळेही त्याची शिकार व्हायची.

काही क्वागांना युरोपातल्या प्राणीसंग्रहालयातही नेण्यात आलं. मात्र, तिथलं हवामान त्यांना मानवलं नाही. त्यांच्या प्रजोत्पादनाचे प्रयत्नही फसले. अखेर 1880 साली शेवटच्या क्वागाचं निधन झालं.

आयरिश इल्क (आयरलँड)

नामशेष झालेल्या ठळक प्राण्यांपैकी बरेच आजही माहिती असलेल्या प्रजातींसारखेच होते. मात्र, त्यांच्याहून थोडे विचित्र किंवा विलक्षण होते.

उदाहरणार्थ मॅमथ. हा हत्तीसारखाच दिसणारा प्राणी आज लोप पावलेला आहे. मात्र, तो हत्तीपेक्षा आकाराने मोठा आणि केसाळ होता.

तसाच आणखी एक प्राणी म्हणजे आयरिश इल्क किंवा आयरिश हरीण. आयरलँडमध्ये आढळणारे हे हरीण आता लोप पावले आहेत.

आयरिश इल्क दिसायला आजच्या हरिणासारखेच. मात्र, आजच्या हरिणांपेक्षा जास्त उंच होते. त्यांची शिंगही खूप मोठी असयाची.

आयरिश इल्कची उंची दोन मीटरपर्यंत असायची. त्यांची शिंगंही 3.65 मीटरपर्यंत मोठी असायची.

जवळपास सात हजार सातशे वर्षांपूर्वी हरिणांची ही प्रजाती नष्ट झाली. शिकार आणि वातावरण बदल ही त्यामागची कारणं असावी, असा अंदाज आहे.

व्हाईट टेल्ड ईगल (यूके)

शेवट गोड व्हावा म्हणतात. तेव्हा शेवटी एका अशा जीवाविषयी ज्याला माणसाने नामशेष होण्यापासून वाचवलं आहे.

हा आहे व्हाईट टेल्ड ईगल म्हणजे पांढऱ्या शेपटीचा गरूड. दिसायला अत्यंत देखणा आणि रुबाबदार असणारा यूकेतला हा पक्षी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर होता.

त्याच्या या देखण्या रुपामुळेच ब्रिटेनमध्ये अनेक वर्षं त्याची शिकार व्हायची. त्याच्या शिकारीला एकप्रकारे प्रोत्साहनच दिलं जायचं.

पुढे या गरुडाच्या शिकारीवर बंदी आणली गेली. मात्र, तोवर खूप उशीर झाला होता.

हा पक्षी आता पुन्हा दिसणार नाही, असं वाटत असतानाच यूकेबाहेर युरोपच्या इतर भागात तो अजूनही जिवंत असल्याचं कळलं. त्याला पुन्हा यूकेमध्ये आणण्यात आलं आणि त्याचं संवर्धन करण्यात आलं.

पांढऱ्या शेपटीचा हा गरुड सुदैवी म्हणावा लागेल. मात्र, प्रत्येकच प्राण्याला असं जीवदान मिळतं असं नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)