काय?... 65 वर्षांच्या पुरुषाच्या शरीरात सापडलं गर्भाशय?

    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसीसाठी, पाटण्याहून

"पेशंट एकदम ठीक आहे. जेवण-खाण नीट करतो, हिंडता-फिरता आहे. त्याला काही त्रास नाही," 65 वर्षांचे रामस्वरुप (बदललेलं नाव) यांच्या नातेवाईकाने बीबीसीशी फोनवर ही गोष्ट सांगितली. बिहारमधल्या पूर्णिया जिल्ह्यातून ते बोलत होते.

पूर्णिया शहर आणि आसपासच्या भागात रामस्वरुप चर्चेचा विषय ठरलेत कारण त्यांच्या शरीरात पूर्ण वाढ झालेलं गर्भाशय आहे.

सामजिक दडपणांमुळे दबलेले रामस्वरूप माध्यमांशी मोकळेपणानं बोलत नाहीयेत कारण त्यांना त्यांच्या मुलींच्या लग्नाची चिंता आहे.

पण जेव्हा 25 नोव्हेंबरला हा विषय स्थानिक माध्यमांमध्ये आला तेव्हा त्यांनी पत्रकारांना म्हटलं होतं की, "आम्हाला पाच मुलं आहेत. आजवर कधी कुठला त्रास झाला नाही. पण आता डॉक्टरांनी शरीरातून गर्भाशय काढलं. मला हेच समजत नाहीये की बाईच्या शरीरात असणारा अवयव माझ्या शरीरात कसा आला."

नक्की काय झालं ?

बिहारची राजधानी पटनापासून 300 किलोमीटर अंतरावर आहे पूर्णिया शहर. या जिल्ह्यातल्या रौटा गावातल्या रामस्वरुप यांच्या पोटात 24 नोव्हेंबरला अचानक खूप दुखाला लागलं. त्यांचं पोटं फुगलं होतं त्यांना हर्निया झाला होता. रामस्वरुप यांच्या घरचे त्यांना उपचारासाठी पूर्णियामधल्या रेहाना नर्सिंग होममध्ये घेऊन गेले. त्यानंतर झालेलं निदान त्यांचं शांत आयुष्यात खळबळ माजवायला पुरेसं होतं

रामस्वरुप यांच्यावर उपचार करणारे सर्जन डॉ. सोहेल अहमद सांगतात की, "ते अॅडमिट झाले तेव्हा आम्ही काही महत्त्वाच्या टेस्ट केल्या, आणि त्यांचं हर्नियाचं ऑपरेशन केलं. पण जेव्हा त्यांचं पोट कापलं तेव्हा त्यांच्या पोटात पूर्णपणे विकसित झालेलं गर्भाशय होतं. आम्ही ते काढलं आणि त्याची बायोप्सी करायला पाठवलं.

पेशंट आता ठीक आहे. त्यांना 26 तारखेला आम्ही डिस्चार्जही दिला. पण पुरुषाच्या शरीरात असं पूर्णपणे विकसित झालेलं गर्भाशय सापडणं ही अगदी दुर्मिळ बाब आहे."

या गर्भाशयाची चाचणी करण्यासाठी त्यांनी हे गर्भाशय स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. सना अमरीन यांनाही दाखवलं.

अमरीन म्हणाल्या, "मी ते गर्भाशय पाहिलं तेव्हा लक्षात आलं हे पूर्ण वाढ झालेलं गर्भाशय आहे. एका महिलेच्या गर्भाशयात जे असतं ते सगळं त्यात आहे. पण समाजात बदनामी होईल या भीतीने ते आणि त्यांच्या घरचे याबाबतीत मोकळेपणाने बोलत नव्हते.

काय आहे हा आजार

पुरुषाच्या शरीरात अशा प्रकारचं गर्भाशय सापडणं, याला पर्सिस्टंट म्यूलेरियन डक्ट सिंड्रोम म्हणजेच पीएमडीएस असं म्हटलं जातं.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्टस या मेडिकल जर्नलमध्ये सापडल्या गेलेल्या रिपोर्टनुसार, अशा प्रकारची पहिली केस 1939मध्ये इंग्लंडमध्ये सापडली होती. 2009 पर्यंत संपूर्ण जगभरात असे 150 पेशंट आढळले होते.

पीएमडीस एक प्रकारचा आजार आहे ज्यात पुरुषांना सामान्य पुरुषांना असणारे जननेंद्रिय तर असतातच पण त्यांच्या शरीरात पूर्ण विकसित झालेलं गर्भाशय आणि फेलिपियन ट्यूबही (महिलांच्या शरीरात असणारा प्रजनन अवयव) असते.

गर्भाशय आणि फेलिपियन ट्युब एक शारीरिक संरचनेतून विकसित होतात ज्याला म्यूलेरियन डक्ट असं म्हटलं जातं. हे म्युलेरियन डक्ट स्त्री आणि पुरुष दोन्ही भ्रूणांमध्ये असतं.

पण म्यूलेरियन इनहीबिटिंग सबस्टन्स म्हणजेच एमआयएस हार्मोनमुळे पुरुषांमध्ये हा डक्ट तुटतो. पण काही दुर्मिळ केसेसमध्ये हा हार्मोन पुरुषांमध्ये नसतो आणि त्यांच्या गर्भाशयाचा विकास होतो.

आधीही समोर आली होती अशी केस

2013 मध्येही पूर्णिया जिल्ह्यात अशी एक केस समोर आली होती. 17 फेब्रुवारी 2013 ला हिंदुस्तान टाइम्समध्ये छापलेल्या एका बातमीनुसार पूर्णिया जिल्ह्यातल्या रुपौली गावात 30 वर्षीय तरुण मणिकांत मंडल यांच्या शरीरातही विकसित गर्भाशय सापडलं होतं.

सततच्या पोटदुखीने हैराण असणाऱ्या मणिकांत मंडल यांचं ऑपरेशन त्यावेळी डॉक्टर जनार्दन प्रसाद यादव यांनी केलं होतं. रामस्वरूप यांना पाच मुलं आहेत, पण 2013 साली जेव्हा मणिकांतच्या शरीरात गर्भाशय आहे हे कळालं तेव्हा तोपर्यत ते पिता बनू शकले नव्हते.

पेपरमध्ये आलेल्या बातमीनुसार त्यांच्या लग्नाला तोपर्यंत 10 वर्ष झाली होती आणि मूल होत नसल्याच्या कारणावरून ते गावातल्याच एका वैदूकडून औषधं घेत होते.

या वैदूने त्यांना सांगितलं की त्यांना हर्निया झालाय आणि त्यामुळे त्यांना मुल होत नाहीये. यानंतर मणिकांत यांनी डॉ. जनार्दन यांच्याकडून उपचार घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी ऑपरेशन करताना मणिकांत यांच्या पोटात विकसित गर्भाशय सापडलं होतं.

असे पुरुष मुलांना जन्म देऊ शकतात का?

जेव्हा मी हा प्रश्न डॉ सोहेल यांना विचारला तेव्हा ते म्हणाले अशा प्रकारचं पूर्ण विकसित गर्भाशय असणाऱ्या पुरुषांना गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"त्या गर्भाशयाची पूर्ण वाढ झाली असेल. पुरुषात शुक्राणू असतील आणि त्यात स्त्रीचे अंडाणू मिळवले तर अशा पुरुषांना गर्भधारणा होणं शक्य आहे."

2007 साली अमेरिकेचे थॉमस बीटे हे पहिले ट्रान्सजेंडर मॅन बनले आणि तेच पहिले गर्भधारणा करणारे पिताही ठरले. अर्थात या गर्भधारणेचा पीएमडीएस या आजाराशी काही संबंध नव्हता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)