शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकसूत्री मसुदा पक्षश्रेष्ठींकडे

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक आज संध्याकाळी उशिरा संपली. या तिन्ही नेत्यांच्या पक्षांन एकत्र बसून एकसूत्री कार्यक्रम तयार केला आहे. तो तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींना दाखवला जाईल असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

या बैठकीत गेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या बैठकीत सहभागी झाले होते.

गेले दोन दिवस दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होती. आज प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याबरोबर सेनेचे नेते सहभागी झाले होते.

या बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र कार्यक्रम तयार केला आहे.

आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरात लवकर सरकार स्थापन होण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन चर्चा करत होते हे एक सकारात्मक पाऊल असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही शिवसेनेच्या नेत्यांबरोबर बसून चर्चा करण्याचा चांगला योग आला असं सांगितलं. आम्ही आमच्या दृष्टीनं गरीब सर्व ओबीसी शेड्युल कास्ट सर्वांसाठी किमान समान कार्यक्रम बनवला आहे. पक्षश्रेष्ठी त्यात बदल सूचवतील असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)