You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओला दुष्काळ: 'तोंडात घास टाकायची वेळ आली होती आणि सगळं नुकसान झालं'
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राज्यात सत्ता स्थापनेवरून पेच निर्माण झाला आहे. पण अशा स्थितीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची स्थिती बिकट आहे. बीबीसीनं काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
"आता ताटावर बसायची वेळ आली होती, ताट वाढेल होतं, फक्त तोंडात घास टाकायचा होता आणि सगळं काही नुकसान होऊन बसलं," बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सुभाष खेत्रे यांचे हे उद्गार.
अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेली स्थिती समजून घ्यायचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला आहे.
शेतकरी सुभाष खेत्रे विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावात राहतात. अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीनचं पीक वाहून गेलं आहे.
आम्ही त्यांच्या शेतात पोहोचलो तेव्हा कापून ठेवलेल्या सोयाबीनचा एक ढिग उभा असलेला दिसून आला.
पिकांच्या नुकसानीविषयी त्यांनी सांगितलं, "सोयाबीन सोंगून 7 ते 8 दिवस झाले होते, आम्ही सगळ्या सुड्या झाकून ठेवल्या होत्या. कारण वारंवार पाणी पडल्यानं कोणतंच मोठं वाहन शेतात येऊ शकत नव्हतं. त्यामुळे सुड्या पॅक करून ठेवल्या होत्या. पाणी पडल्यानंतर आम्ही शेतात येऊन पाहिलं तर एक सुडी 70 टक्के पाण्यात बुडालेली होती. बाकीच्या 5 सुड्या वाहून गेल्या असं वाटत होतं, पण त्यातली एक सापडली आणि 4 वाहून गेल्या."
विदर्भात सोयाबीन गेलं वाहून
अवकाळी पावसामुळे 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं ते सांगतात.
"आज माझ्यासाठी चार ते साडे चार लाख रुपयांचं दुःख पचवणं खूप अवघड होऊन बसलं आहे. कारण पुढच्या 12 महिन्यांपर्यंत आता शेतात काहीच येणार नाही," ते पुढे सांगतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कारण्याचे आदेश दिले आहेत. पण, अद्याप पंचनाम्यासाठी शेतात कुणीच आलं नसल्याचं खेत्रे सांगतात.
"अधिकारी कोणताच नाही आला, मित्र वगैरे आले, पण आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याचा किंवा कुणाचा फोन आलेला नाही. फक्त पाहुण्यांनी फोन केला," खेत्रे सांगतात.
पंचनाम्यांच्या सद्यस्थितीविषयी लोणारचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी बीबीसीला सांगितलं, "सुलतानपूर गावातल्या पिकांच्या पंचनामांचं काम सुरू आहे, तलाठी ते पूर्ण करत आहेत. याव्यतिरिक्त लोणार तालुक्यातील 80 टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, राहिलेले पंचनामे येत्या 2 दिवसांत पूर्ण होतील."
राज्यातील सत्ता स्थापनेच्या वादाविषयी ते म्हणाले, "आम्ही सरकार निवडून दिलं, माणसं निवडून दिली, सेना-भाजपला मतदान दिलं आणि आता गादीसाठी ते भांडत आहे. फक्त म्हणताहेत की, आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, पण काय मेल्यानंतर करणार आहे का, आमचा सातबारा कोरा?"
मराठवाड्यातील मका सडला
शेतकरी भगवान खरात मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या वाघ्रुळ जहांगीर या गावात राहतात. अवकाळी पावसामुळे त्यांच्या मक्याच्या शेतात पाणी साचलं आहे.
ते म्हणाले, "एवढी वर्षं शेती केली, पण इतकं नुकसान कधी पाहिलं नाही, यंदा हातात आलेलं पीक गेलं आहे. कपाशी गेली, सोयाबीन गेली, मका गेला, टमाटर गेला. 1 लाख रुपयांचं नुकसान लागलेलं आहे, तितकं आता वसूल नाही होत."
आता रब्बीची पेरणी कशी करणार, असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, "रब्बीच्या पेरणीसाठी या शेतात महिनाभर वापसाच होत नाही. कसं घेणार आहे, रब्बीचं पीक? पैसे लावायला लागतील ना त्याला?"
पेरणीसाठी घेतलेली उधारी कशी चुकवायची याची त्यांना आता चिंता आहे.
"आता टेंशन आलंय. पैसे कशावर द्यावं लोकायचे. दुकानदाराचे पैसे उधार आणलेले आहेत, खत-औषधं भरायला."
लाखो हेक्टरवर नुकसान
अवकाळी पावसामुळे सोयाबीन, मकासहित राज्यभरातल्या बाजरी, ज्वारी, कापूस, मूग, भात, तूर अशा सर्वच प्रकारच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या 8 जिल्ह्यांतील 32 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. यापैकी 62 टक्के म्हणजेच 20 लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचं झालं आहे. मराठवाड्यात 11 लाख हेक्टरवरील कापूस, 14 लाख हेक्टरवरील सोयाबीन, 2 लाख हेक्टरवरील मका, 92 हजार हेक्टरवरील बाजरी, 60 हजार हेक्टरवरील ज्वारी आणि 2 लाखाहून अधिक हेक्टरवरील इतर पिकांचं नुकसान झालं आहे.
"विदर्भातल्या अमरावती विभागातल्या अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या 5 जिल्ह्यांमध्ये 16 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या भागांचा NDRF मार्फत 55 टक्के सर्व्हे पूर्ण झाला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांचं 60 टक्के सर्वेक्षण पूर्ण झालं आहे," असं अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी बीबीसीला सांगितलं.
अवकाळी पावसामुळे राज्यभरातील पिकांच्या नुकसानीविषयी देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना सांगितलं की, "अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. प्राथमिक अंदाजानुसार, राज्यातील 358 पैकी 325 तालुक्यांमध्ये 54 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. हे नुकसान वाढण्याची शक्यता आहे."
"राज्य सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून 10 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. याशिवाय, या आपत्तीला ओला दुष्काळ समजून शेतकर्यांना संपूर्ण मदत दिली जाईल. शेतकर्यांना कुठल्याही वसुलीला सामोरं जावं लागू नये, हेही सुनिश्चित केलं जाईल," असं फडणवीसांनी जाहीर केलं.
मदत अपुरी - अजित नवले
राज्य सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अपुरी आहे, सत्तास्थापनेच्या गोंधळात सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आहे, असं मत शेतकरी नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केलं आहे.
ते म्हणाले, "राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल, इतकी मदत सरकारनं करावी, असं काही विचारवंत सांगू लागले आहेत. पण, अवकाळी पावसानं शेती क्षेत्राचं किती नुकसान झालं, याचा अंदाज न आल्यानं अशा बाता केल्या जात आहेत."
"हेक्टरी 25 हजार रुपये म्हणजे गुंठ्याला 250 रुपये मदत ही शेतकऱ्यांची निव्वळ चेष्टा आहे. प्रश्न केवळ उत्पादन खर्च भरून देण्याचा नाही, तर तयार शेतीमालाच्या बाजारातील किंमतीइतकी मदत शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे," असंही ते म्हणाले.
पण, पंचनाम्यांनुसार मदतीची रक्कम वाढवली जाऊ शकते, असं माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी बीबीसीला सांगितलं.
"शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रश्नच नाही. शेतकऱ्यांच्या मदतीची प्रक्रिया अबाधित ठेवली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी 10 हजार कोटी रुपयांची मदत आधीच जाहीर केली आहे. पंचनाम्यांनुसार पीकनिहाय मदत दिली जाईल. याशिवाय 20 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी दावा दाखल केला आहे, पीक विम्याच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत दिली जाईल," बोंडे यांनी सांगितलं.
"सरकारनं दिलेली भरपाईची मदत पुरेशी आहे की नाही, हे पंचनामे झाल्यानंतर ठरवता येईल. पंचनाम्यांनुसार नुकसान भरपाईच्या रकमेचा आकडा जास्त आल्यास, मदतीच्या रकमेत निश्चितपणे वाढ केली जाईल," त्यांनी पुढे सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)