पाकिस्तानातील कर्तारपूर साहिबला कसं जाता येईल, कर्तारपूर कॉरिडोर काय आहे?

फोटो स्रोत, Twitter
पाकिस्तानकडून कर्तारपूर कॉरिडॉरची भारताकडील मार्गिका येत्या 9 नोव्हेंबर रोजी खुली केली जाणार आहे.
कर्तारपूर नेमके आहे कुठे?
पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातल्या नरोवाल जिल्ह्यात कर्तारपूर हे ठिकाण येतं. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून चार किलोमीटर दूर आहे. कर्तारपूर साहिब हे शिखांचं अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ मानलं जातं.
कर्तारपूरला शीख भाविकांची गर्दी का?
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांची या वर्षी (2019) 550 वी जयंती आहे. पाकिस्तानमधल्या श्री नानकाना साहिब इथं त्यांचा जन्म झाला होता.
गुरू नानक यांनी आपल्या आयुष्याची 18 वर्षं इथंच व्यतित केली होती असं त्यांचे भाविक मानतात.

फोटो स्रोत, Getty Images
कर्तारपूरमध्ये गुरू नानकांचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी गुरुद्वारा उभारण्यात आली आहे, असंही भाविक सांगतात.
शीख भाविक आतापर्यंत कर्तारपूरमधल्या या पवित्र स्थळाचं दुर्बिणीनं दर्शन घेत होते.
2019 साली गुरू नानकांच्या 550व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानमधल्या या पवित्र स्थळी दर्शनाला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांचं स्वागत करण्यात येत आहे.
शीख भाविक कर्तारपूरपर्यंत कसे पोचणार?
दोन्ही देशांनी भारताच्या पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक साहिबपासून कर्तारपूर साहिबपर्यंत कॉरिडोअर बांधला आहे.
या कॉरिडॉरचं 9 नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.

फोटो स्रोत, Twitter
या कॉरिडॉरमधून भारतातल्या शीख बांधवांना याठिकाणी दर्शनास जाता येणार आहे. या मार्गावरून दररोज 5 हजार शीख भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.
कॉरिडॉरमध्ये भाविकांना प्रवेश कसा मिळेल?
कर्तारपूर साहिबला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज लागणार नाही.
भाविकांना ऑनलाइन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. भाविकांना मेल किंवा मेसेजद्वारे या मार्गावरील प्रवेशासाठी परवानगी दिली जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
त्यासाठी भारतीय भाविकांकडून 1400 रुपये प्रवेश शुल्क पाकिस्तानकडून आकारलं जाणार आहे.
पूर्व घोषणेनुसार संपूर्ण वर्षभर हा कॉरिडॉर सर्व धर्माच्या भाविकांसाठी खुला असेल.
उद्घाटनासाठी नवज्योतसिंग सिद्धू यांना पाकिस्तानातून निमंत्रण
कर्तारपूर कॉरिडॉरच्या औपचारिक उद्घाटनासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना निमंत्रण दिलं आहे. परंतु सिद्धू यांनी यावर अद्याप कोणतेही भाष्य केलेलं नाही. त्यांच्या पत्नी नवज्योतकौर सिद्धू यांनी मात्र पंजाब सरकार आणि केंद्र सरकारच्या परवानगीनंच त्यावर निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र त्यांनी सामान्य भाविक म्हणून कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं सांगितलं होतं.
कॉरिडॉरवरून पाकिस्तानातल्या राजकीय घडामोडी
पाकिस्तानात इम्रान खान यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मौलान फजलूर रेहमान यांनी विरोधकांसह आंदोलन सुरू केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाचे नेते अहसान इक्बाल यांनी शीख भाविकांना पासपोर्टविना प्रवेश देण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.
कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करणे हा उत्तम निर्णय असला, तरी पासपोर्टविना प्रवेश ही घोडचूक आहे असं ते म्हणतात.
कट्टरवाद्यांचे तळ?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यात कट्टरवाद्यांचं प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. याच जिल्ह्यात कर्तारपूर साहिब आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नरोवाल, मुरीदके आणि शाकारनगर इथल्या तळांवर पुरुष आणि महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पंजाब सीमेसंदर्भातल्या सुरक्षा यंत्रणांच्या उच्चस्तरीय बैठकीतून ही माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मात्र भारतीय भाविकांसाठी कर्तारपूर साहिबसाठी कॉरिडॉर सज्ज असल्याचं ट्वीट केले आहे,
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








