You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत: भाजप मंबाजीचं राजकारण करतंय, महाराष्ट्रात मंबाजी चालत नाही
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पाहा संपूर्ण मुलाखत
महाराष्ट्रात मंबाजीचं राजकारण चालत नाही अशी बोचरी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केली.
'105 आमदारांचं संख्याबळ असणाऱ्या भाजपनं राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केलाच पाहिजे' असं आवाहन देत 'मोठा पक्ष सरकार स्थापन करायला अपयशी ठरला, तर आम्ही आमचा मुख्यमंत्री करू, एवढं संख्याबळ आमच्याकडे निश्चित आहे,' असा पुनरुच्चार शिवसेनेनं केला आहे.
महाराष्ट्रात निवडणुकांचे निकाल येऊन दहा दिवस उलटले तरीही 'महायुती'तली सरकार स्थापनेची चर्चा अद्याप सुरू झाली नाहीये. दिवसागणिक शिवसेना आणि भाजपतला तणाव वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या विस्तृत मुलाखतीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर दबावाची सेनेची भूमिका कायम ठेवली आहे.
अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद हाच अद्याप सेना आणि भाजपामधला कळीचा मुद्दा कायम आहे. मुख्यमंत्रीपदावरचा शिवसेनेचा दावा कायम ठेवतांना भाजपानं दिलेला शब्द फिरवला आहे, असं संजय राऊत यांनी पुन्हा म्हटलं आहे.
पण आता भाजपासोबत काहीच चर्चा होणार नाही का, असं विचारल्यावर राऊत म्हणाले, "बोलणं का व्हावं? तुम्ही जर दिलेला शब्द फिरवता, या बोटावरची थुंकी त्या बोटावर फिरवता. महाराष्ट्रात अशी ढोंगं चालत नाहीत. हे मंबाजीचं राजकारण आहे. महाराष्ट्रात मंबाजी चालत नाही."
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजप प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा बीबीसीने प्रयत्न केला त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
'भाजप नेते जबाबदार'
आत्तापर्यंत शिवसेना आणि भाजपमध्ये सरकार स्थापनेबाबत न होऊ शकलेल्या चर्चेला त्यांनी भाजपचे राज्यातले नेते जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
"अमित शहांनी ही जबाबदारी राज्याचा प्रश्न आहे म्हणून इथे दिली होती, असं आम्ही ऐकलं आहे. पण राज्यातले नेते हा प्रश्न सोडवू शकले नाहीत," राऊत म्हणाले.
शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीच्या आडून महत्त्वाची मंत्रिमंडळातली खाती मागते आहे, या टीकेला राऊत यांनी विरोध केला. शिवसेना असा व्यापार करत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
एक कयास असाही लावला जातो आहे की, शिवसेनेनं भाजपाला मदत केली नाही तर मुंबई महानगरपालिकेत भाजपचा मदतीनं सुरु असलेली त्यांची सत्ता धोक्यात येईल.
"मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा झेंडा उतरवण्याचा कोणी प्रयत्न केला, तर महाराष्ट्रात कसं रान पेटतंय बघाच तुम्ही," असं उत्तर यावर राऊत यांनी दिलं.
काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येणार?
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला मदत करतील का, या चर्चेवर संजय राऊत यांनी ठाम उत्तर दिले नाही.
"कॉंग्रेस, राष्ट्रवादी ही चर्चा सोडून द्या. मी इतकंच म्हणतो की, आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ आहे. बघा ना तुम्ही काय होतंय ते. 145चं बहुमत आमच्याकडे आहे, किंबहुना जास्त आहे," राऊत म्हणाले.
अर्थात, शरद पवार वा उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री बनण्यावरून आणि त्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येत असल्याच्या बातम्यांना राऊत यांनी केवळ 'अफवा' असं म्हटलं आहे.
मंबाजी कोण?
संजय राऊत यांनी 'मंबाजीचं राजकारण' असा उल्लेख केला तो मंबाजी नेमका कोण होता? याविषयी आम्ही संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना विचारलं.
"मंबाजी हा देहूगांवचा मठपती होता. तुकाराम महाराजांचा तो द्वेष करायचा. महाराजांचं मोठेपण त्याला सहन होत नव्हतं. त्याबद्दलच्या अनेक अख्यायिका आहेत. पण नेहमीच 'सज्जन आणि दुर्जन' असा विरोधाभास दाखवण्यासाठी तुकाराम आणि मंबाजी यांचं उदाहरण दिलं जातं," असं डॉ. मोरे यांनी सांगितलं.
संजय राऊत यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत आणखी काही मुद्दे मांडलेत, ते पुढीलप्रमाणे -
प्रश्न - उद्धव ठाकरे त्यांच्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले आहेत, असं तुम्ही म्हणालात, याचा नेमका अर्थ काय?
उत्तर - सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेनेनं नक्की काय करायला हवं, यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी काही भूमिका ठरवल्या आहेत, तरीसुद्धा आम्ही सध्या थांबलेलो आहोत. कारण, सरकार स्थापन करण्याचा पूर्ण जनादेश आम्हाला मिळालेला नाही. तो जनादेश शिवसेना-भाजपा युती असा दोघांना मिळालेला आहे. त्यात भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यांना 105 जागा मिळाल्या आहेत. दोघांना मिळून चांगलं बहुमत मिळालं आहे. पण युती म्हणून सरकारचा दावा पेश करावा, अशाप्रकारच्या हालचाली 105वाल्यांकडून झाल्या नाहीत. युती होण्यापूर्वी काय ठरलं होतं, सरकार कशाप्रकारे स्थापन करायचं होतं, सत्ता स्थापनेत याला महत्त्व असतं. पण, काय ठरलं होतं, हे मान्य करायला आमचे सहकारी तयार होत नसतील, तर मग बोलणं खुंटतं.
प्रश्न - सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे?
उत्तर - अमित शहा मातोश्रीवर आले, तेव्हा काय बोलणं झालं याची माहिती उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी मीडियासमोर दिली. सत्ता, जबाबदाऱ्या आणि पदांचं वाटप हे 50:50 होईल, असं तेव्हा सांगण्यात आलं होतं. याचा अर्थ पाळण्यातल्या मुलालापण समजतो. यात मुख्यमंत्री पद नाही, हे सांगणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवणं आहे.
प्रश्न - 9 नोव्हेंबर पर्यंत भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा करावा, असं तुम्ही म्हणालात, तर शिवसेनेला नेमका सरकार पाडण्यामध्ये इंटरेस्ट आहे, की सरकार टिकवण्यामध्ये?
उत्तर - सत्तेच किल्ल्या शिवसेनेकडे का असू नये? सरकार पाडणं किंवा राज्य सरकार अस्थिर करणं हा आमचा हेतू कधीच नव्हता. तुम्ही स्थिर सरकार देऊन राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत असाल, तर सरकार बनवायला हवं, अशीच आमची भूमिका आहे.
प्रश्न - शिवसेनेनं परतीचे दोर कापलेत, असं एका मुलाखतीत तुम्ही म्हटलात, याचा अर्थ भाजपसोबत चर्चा होणार नाही, असा होतो का?
उत्तर - मूळात निवडणुकीपूर्वी 50:50चा फॉर्म्युला ठरला होता आणि मुख्यमंत्र्यांनी स्वत:च तो मीडियासमोर सांगितला होता. पण आता तोच फॉर्म्युला नाकारला जात आहे, असं असेल तर चर्चा करण्यात काय अर्थ आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)