शिवसेना: सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यात भाजपचं राज्यातलं नेतृत्व फेल- संजय राऊत

महाराष्ट्रात सत्तास्थापनेची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमकडे देण्यात आली होती. पण वाटाघाटी करण्यात ते फेल झाले आहेत असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र त्यांच्याकडून हा तिढा सुटत नाहीये. भाजपच्या दिल्लीच्या नेतृत्वाने ही जबाबदारी राज्यातल्या नेतृत्वावर टाकली होती. पण राज्यातलं नेतृत्व फेल गेलं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

यावर भाजप प्रवक्त्यांनी बीबीसीला प्रतिक्रिया दिली. त्यांनी संजय राऊत यांचा दावा फेटाळला आहे. "भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वाला यश आलं की अपयश आलं आहे हे येणारा काळच ठरवेल, या विषयावर याहून अधिक भाजपला काही बोलायचं नाही." अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली.

सरकारचं भवितव्य आमच्या हातात नाही. भाजप आमच्याविना सत्तास्थापनेत अपयशी ठरलं तर जनतेच्या हितेसाठी आम्ही जबाबदारी स्वीकारू असं सूचक वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राऊत यांनी हे वक्तव्य केलं.

जर शिवसेना नाराज असेल तर त्यांची नाराजी दूर केली जाईल असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. मित्रपक्षांकडून वड्याचं तेल वांग्यावर काढलं जात आहे असं मुनगंटीवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकांचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले मात्र अद्यापही सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही.

नेमकं काय ठरलं होतं?

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं की आधी जी बोलणी झाली ती भाजपनं आठवावीत.

"वरळीतल्या ब्ल्यू सी हॉटेलात काय ठरलं होतं? युती ठरली. विधानसभेला 50-50 जागांवर लढू असं ठरलं होतं. सत्ता स्थापन करताना पदं आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप होईल. याचा अर्थ मुख्यमंत्रीपदासह बाकी जबाबदाऱ्याचं वाटपही होईल असा होतो.

"आता ठरलं नव्हतं म्हणता, मग तुम्ही बनवा सरकार. आमच्याकडे जनादेश नाही. महाजनादेश भाजपला मिळाला आहे. सरकार बनवणं आमची जबाबदारी नाही," असं राऊत म्हणाले.

निवडणूक एकत्र लढवली होती हे भाजप मान्य करायला तयार नाही. आम्ही युतीधर्माचं पालन करतोय. आमच्याकडून पाठिंब्याचं पत्र घ्यायला हवं. आमच्या 63 आमदारांची गरज आहे. तसं सांगायला हवं. सरकार बनवण्यासाठी आमदार किंवा संख्याबळ आवश्यक नसतं. बाकी व्यवस्था असतात', असं राऊत यांनी सांगितलं.

शिवसेना काय करणार?

शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार यावर राऊत म्हणाले, 'ठरलेली गोष्ट नाकारल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले. ठरलेली गोष्ट नाकारताय. ठरलं होतं ते बोलायला तयार नाहीत. सत्ता स्थापनेचा पहिला अधिकार भाजपचा असेल. त्यांना 15 दिवसांची वेळ द्या. ते अपयशी ठरले तर आम्ही दावा करू. राज्यपालांना अधिकार असतो. आम्ही शांतपणे बसलो आहोत.'

ते पुढे म्हणाले, '2014मध्ये सरकारने विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला होता. तेव्हा विरोधी पक्ष दुर्बळ होता. आता समोर निर्माण केलेलं भूत मानगुटीवर बसलं आहे'.

'आज बाळासाहेब असते तर मी जे करतोय त्यासाठी त्यांनी माझी निवड केली असती. मला मिळवायचं नाही, गमवायचं नाही', असंही त्यांनी सांगितलं.

भाजपला फटका

भाजपला त्यांच्याच कृतीचा फटका बसला आहे असं सांगताना राऊत म्हणाले, 'हा काळाने घेतलेला सूड आहे. ही अदृश्य शक्ती आहे. फार मस्तवालपणा चालत नाही. हम करे सो कायदा चालत नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना काम करते आहे. फोडाफोडीचं राजकारण चालत नाही. आम्ही कोणालाही आत टाकू शकतो अशी भीती.

शरद पवारांचा पक्ष करंगळीएवढा उरला नव्हता. जनतेने राष्ट्रवादीला यश मिळवून दिलं. काँग्रेसला राज्यात, जिल्ह्यात नेतृत्व नव्हतं. या पक्षाने मागच्या निवडणुकीएवढी कामगिरी केली. मजबूत विरोधी पक्ष गरजेचा होता. जनतेनं दाखवून दिलं'.

मुख्यमंत्री एकटे पडलेत?

2014 आणि 2019 मधल्या राज्याच्या नेतृत्वात काय फरक आहे याबद्दल विचारलं असता राऊत म्हणाले, "2014 मध्ये भाजपची मजबूत फळी होती. आज मुख्यमंत्र्यांच्या अवतीभोवती एकनाथ खडसे, विनोद तावडे, आशिष शेलार असं कुणीच दिसत नाहीये. राजकारणात असं होऊ नये, मुख्यमंत्री एकटे पडलेले दिसतात. आहेत ते शांतपणे बसले आहेत. मोदींबरोबर शहा आहेत."

"प्रमुख माणसाच्या भोवती चार विश्वासू माणसं असतात. आज समोर तसं दिसत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हाती किती अधिकार आहेत? नागपूरचे मुनगंटीवार यांच्या विदर्भात भाजपने सर्वाधिक जागा गमावल्या आहेत. पंकजा मुंडेंना पराभूत झाल्या आहेत", असं राऊत म्हणाले.

राज्याचं नेतृत्व अपयशी?

'288 जागा लढवण्याची तयारी केली होती. युतीचा प्रस्ताव घेऊन अमित शहा आमच्याकडे आले. आपण एक संधी अजून घ्यायला हवी. त्याला माघार म्हणता येणार नाही. आताची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. कमिटमेंट ऑन रेकॉर्ड आहे. कोणत्याही संघर्षाला तयार आहोत. त्यासाठी सगळी तयारी केली आहे', असं त्यांनी स्पष्ट केलं.

'दिल्लीच्या नेतृत्वाने हा तिढा सोडवण्याची जबाबदारी राज्याच्या नेतृत्वावर टाकली आहे. राज्याचं नेतृत्व अपयशी आहे. ठरलं ते मान्य करा. देशाच्या गृहमंत्र्याने इथं यावं असं म्हणणं नाही. त्यांना बरीच कामं असतात,' असं त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपने राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत केलेलं विधान शिवसेनेला पटलं नसल्याचं राऊत यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं. भाजपकडे जास्त जागा आहेत त्यांनीच पुढाकार घ्यावा असं ते यावेळी म्हणाले होते. काँग्रेस राष्ट्रवादीकडून अनेक लोक आणून भाजप 105 पर्यंत पोहोचली आहे. म्हणून त्यांना सत्तास्थापनेची संधी द्यायला हवी. जर ते सत्ता स्थापन करू शकले नाहीत तर आम्ही 145 चा आकडा गाठू असं राऊत म्हणाले.

'शिवसेना-भाजप मैत्री कायम राहील'

शिवसेना आणि भाजपची मैत्री कायम राहील असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. शिवसेनेला जे मतदान झालं आहे ते काँग्रेसबरोबर झाल्यासाठी झालेलं नाही. जनतेची तशी इच्छा नाही. म्हणून हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकणार नाही असं मुनगंटीवार म्हणाले. भाजप आणि शिवसेना हे मित्रच आहेत आणि आमची मैत्री कायम राहील असं त्यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

शिवसेनेचं दबावतंत्र?

शिवसेनेनं भाजप नेतृत्वाबाबत असं वक्तव्य का केलं असावं याबाबत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात हा "शिवसेनेचा दबावतंत्राचा भाग असू शकतो. फडणवीस आणि त्यांची टीम अपयशी ठरली असं दिल्लीतल्या नेतृत्वाला वाटावं जेणेकरून वाटाघाटींना गती येईल असाही त्यामागे हेतू असू शकतो."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)