You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
UPSC IES परीक्षा: आश्रमशाळेत शिकलेला हर्षल भोसले देशात पहिला
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयईएस म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तांडोरच्या हर्षल ज्ञानेश्वर भोसले यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आर्थिक हलाखीच्या अवस्थेत आपलं शिक्षण पूर्ण केलेल्या हर्षल यांनी नववी आणि दहावीचं शिक्षण आश्रमशाळेत घेतलं होतं. हर्षल यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं आहे.
2018 मध्ये लोकसेवा आयोगामार्फत जानेवारीत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मुलाखतीचा टप्पा पार पडला होता. या परीक्षेंतर्गत 511 जागा रिक्त होत्या.
त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीच्या 161, यंत्र अभियांत्रिकीच्या 136, विद्युतच्या 108, अणूविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी शाखेच्या 106 जागा रिक्त होत्या. लोकसेवा आयोगाने शुक्रवारी 25 ऑक्टोबरला आपल्या संकेतस्थळावर आयईएस परिक्षेचा निकाल जाहीर केला.
आर्थिक हालाखीच्या परिस्थितीवर केली मात
हर्षल पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या आईने शेतात काम करून अत्यंत बिकट अवस्थेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळली. हर्षल यांनीही न डगमगता शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलं होतं.
मंगळवेढा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक शाळेत हर्षल यांचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर सोलापुरातील उत्तर सोलापूर तालुक्यातील देगावमधल्या माध्यमिक आश्रमशाळेत नववी ते दहावी पर्यंतचं माध्यमिक शिक्षण त्याने पूर्ण केले.
दहावीनंतर बीडच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल येथे डिप्लोमा तर कराड येथील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डिग्रीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर येथे एक महिन्याचे ट्रेनिंग घेऊन तिथला राजीनामा दिला. त्यानंतर 'ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन' पुणे येथे हर्षलची निवड झाली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअर सर्व्हिसेसची पूर्वपरिक्षा जानेवारी महिन्यात तर त्यानंतर मुख्य परीक्षा जून महिन्यात दिली. नंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखती पार पडल्या. शुक्रवारी 25 ऑक्टोबर रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये हर्षल भोसले यांने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आश्रमशाळा ते युपीएससी
"आश्रमशाळा म्हटले की त्या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होते, असा अनेक वर्षांपासून लोकांमध्ये गैरसमज आहे. मात्र हा गैरसमज हर्षल भोसले या विद्यार्थ्याने पुसून टाकला आहे. हर्षल हा विद्यार्थी जेव्हा देगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेत शिकण्यासाठी आला होता. तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. मात्र त्याच्या गुणवत्तेकडे पाहिले असता तो भविष्यात उल्लेखनीय कामगिरी करेल असे वाटत होते.
आज आयईएस परीक्षेत हर्षल देशात प्रथम आल्याचे समजताच आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. एकूणच हर्षलच्या या यशाने देगाव आश्रमशाळेचे नाव देशभरात गेले आहे. त्यामुळे शिक्षणाची गोडी असेल तर कोठेही शिक्षण घेऊन मोठे होता येते हे हर्षलने दाखवून दिल्याचं" आश्रमशाळेचे संस्थापक प्रकाश वानकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
तिसऱ्या वर्षात शिकताना सुरु केला अभ्यास
इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असतानाच हर्षल यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.
तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाचं अभ्यासक्रम इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या परिक्षांसाठी महत्त्वाचं असल्यामुळे लक्ष देऊन कॉलेज पूर्ण केलं. त्यानंतर विविध परिक्षांची तयारी ते करत होते.
काही काळ दिल्लीत राहून कोचिंग क्लासमध्ये त्यांनी काही विषयांचे क्लास लावले. नंतर स्वतः दिवसाला चौदा ते पंधरा तास अभ्यास केल्याचं, हर्षल यांनी सांगितलं.
खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये भरपूर पैसा असूनही तिथं कामाचं स्वातंत्र्य नाही. त्यामुळे सरकारी क्षेत्राची निवड केल्याचं हर्षल सांगतात.
ते सांगतात, "खासगी क्षेत्रात भरपूर पगाराच्या नोकऱ्या आहेत पण आपल्या बॉसच्या म्हणण्यानुसार मर्यादित कामं करावी लागतात. पण सरकारी क्षेत्रात मोठमोठ्या प्रकल्पांवर काम करता येतं.
त्याठिकाणी आपल्याला विविध अधिकार असतात. त्या अधिकारांचा वापर करून लोकोपयोगी कामात आपलं योगदान देता येतं. त्यामुळेच सरकारी क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)