You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र विधानसभा निकाल: पक्षांतर करणाऱ्या, अपक्ष लढणाऱ्या बंडखोर नेत्यांचं काय झालं?
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी गाजली. पाच वर्षांची कामगिरी जनतेसमोर घेऊन जाण्याची युतीची ही दुसरी वेळ होती परंतु युती पुन्हा सत्तेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सलग दुसऱ्यांदा 100चा आकडा गाठणं 1990 नंतर कोणत्याही पक्षाला जमलं नव्हतं. भारतीय जनता पार्टीनं सलग दुसऱ्यांदा 100 चा आकडा पार करण्याची कामगिरी करून दाखवली आहे. असं असलं तरीही या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षांतरं आणि बंडखोरी यामुळेही निवडणूक वेगळी ठरली. अगदी एका पक्षानं दिलेली उमेदवारी नाकारून अगदी शेवटच्या क्षणी दुसऱ्या पक्षात जाण्याची घटनाही घडली.
पक्षांतरं करून आजवर केलेल्या राजकारणाच्या अगदी उलट विचारांच्या पक्षामधून निवडणूक लढवण्याला लोकांनी फारशी पसंती दिलेली नाही. यंदाच्या निवडणुकीमध्ये सुमारे 30 आयाराम बंडखोरांना तिकीट मिळालं होतं. त्यातील 20 उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे.
लोकसभा निवडणुकीपासून झाली सुरुवात
निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप आणि सेना युतीमध्ये जाण्याचे प्रमाण लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच सुरू झाले होते. त्यामध्ये पहिली मोठी सुरुवात अहमदनगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीमुळे झाली.
लोकसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे-पाटीलसुद्धा भाजपत गेले आणि त्यांना अल्पकाळाचे मंत्रिपद उपभोगायला मिळाले. त्यांच्याबरोबरच अगदी थोड्या काळासाठी जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री होता आलं. जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.
त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही पक्षांतरं वाढू लागली. 'मेगाभरती', 'महाभरती', असे शब्दही त्यासाठी वापरले जाऊ लागले. भाजपमध्ये जवळपास एकदिवस आड किंवा दररोज असे प्रवेश होऊ लागले तर मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे आयारामांची मनगटं 'शिवबंधनात' गुंडाळू लागले.
हे इन्कमिंग विजयासाठीच होत आहे. प्रत्येक आयारामाला तिकीट मिळेल आणि तो विजयी होणारच, असा आभासही तयार झाला होता. परंतु मतदारांनी हा भ्रमाचा भोपळा फोडून आयारामांना त्यांची जागा दाखवून दिली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागांमध्ये पक्षांतरं आणि आपल्याच पक्षाच्या विरोधात बंडखोरी असे प्रकार दिसून आले आहेत.
साताऱ्याचं संस्थान खालसा
एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्याचे मतदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले होते. मात्र साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी चार महिन्यांमध्येच पक्षांतर करून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादीनं प्रतिष्ठेची केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही सभा इथं झाल्या. परंतु अखेर उदयनराजे यांचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी जिंकून घेतला.
तर जावळीमध्ये शिवेंद्रसिंह यांन मात्र आपला गड राखला.
बंडखोरांच्या निवडणुकीचा 'सोलापूर पॅटर्न'
पश्चिम महाराष्ट्रात आयारामांना खऱ्या अर्थाने फटका बसला असं म्हणता येईल. सोलापूर जिल्ह्यामध्ये याचे चित्र चटकन समजून घेता येईल.
सोलापूरमधील बार्शीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र दिलीप सोपल यांना या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर यश मिळाले नाही. निवडणूक अपक्ष लढवणारे राजेंद्र राऊत यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
सोलापूर जिल्ह्यामध्येच करमाळ्यात रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता, मात्र करमाळ्यात अपक्ष संजय शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. रश्मी बागल यांना तर निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे इथं विजयी झाल्या. त्यानंतर MIMचे फारूख शाब्दी आणि अपक्ष महेश कोठे यांचा नंबर लागतो आणि चौथ्या क्रमाकांवर माने आहेत. असं असलं तरी सोलापूर जिल्ह्यामधील मतदारांनी सर्वच बंडखोरांना नाकारलं आहे, असं चित्र दिसत नाही.
पंढरपुरात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेल्या भारत भालकेंना मतदारांनी विजयी केलं आहे. इथं भाजपचे सुधाकर परिचारक पराभूत झाले आहेत.
अहमदनगरमध्ये 'कही खुशी, कही गम'
महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातही बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झाली होती. गृह मंत्रालय, वने, आदिवासी विकास अशी विविध खाती सांभाळण्याचा अनुभव असणाऱ्या बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा निरोप घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होती. पाचपुते यांनी 1 लाख 3 हजार 258 मतं मिळवत विधानसभेत पुन्हा प्रवेश केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घनश्याम शेलार यांचा पराभव केला.
निवडणुकीआधी भाजपमध्ये जाऊन मंत्री होणाऱ्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपमधूनही यश मिळाले आहे. त्यांना शिर्डीमध्ये मोठं मताधिक्य मिळालं असून काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा त्यांनी पराभव केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आयारामांच्या निवडणुकीतील लक्ष वेधून घेणारा निकाल अकोले मतदारसंघात दिसून येतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आपला मुलगा वैभवसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र वैभव यांना अकोले मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. अकोलेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे विजयी झाले असून वैभव आणि लहामटे यांच्यामध्ये 50 हजारांहून अधिक मतांचं अंतर आहे.
श्रीरामपूर मतदारसंघामध्ये काँग्रेसमधून येऊन शिवसेनेच्या तिकिटावर लढणारे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे पराभूत झाले आहेत. भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसच्या लहू कानडे यांनी पराभूत केले आहे. 2009 आणि 2014 या विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाऊसाहेब विजयी झाले होते.
राष्ट्रवादीतून सेना-भाजप
राष्ट्रवादी काँग्रेसमधून सेना-भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांपैकी राणा जगजितसिंह पाटील यांना तुळजापूर मतदारसंघात भाजपच्या तिकिटावरही यश मिळाले आहे. राणा जगजितसिंह यांनी काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांना पराभूत केले. 2014 साली मधुकरराव चव्हाणांना या मतदारसंघात तर राणा जगजितसिंह यांना उस्मानाबाद मतदरासंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर यश मिळाले होते.
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला एबी फॉर्म नाकारून नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि केज मतदारसंघातून त्या विजयीसुद्धा झाल्या आहेत. याच मतदारसंघात त्यांच्या मातोश्री आणि माजी आरोग्यमंत्री विमलताई मुंदडाही जिंकून आल्या होत्या. केजमध्ये नमिता यांनी राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठे यांचा पराभव केला आहे. 2014 साली इथे भाजपच्याच संगीता ठोंबरे विजयी झाल्या होत्या.
एकेकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले भास्कर जाधव या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा शिवसेनेत आले. 2009 आणि 2014 साली गुहागर मतदारसंघात ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. आता ते सेनेच्या तिकिटावर विजयी झाले आहेत.
त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतून शिवसेनेत येणारे पांडुरंग बरोरा यांना त्यांच्याच शहापूर मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या दौलत दरोडा यांनी त्यांचा पराभव केला. हेच दौलत दरोडा 1995, 1999, 2004, 2009 आणि 2014 साली झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढले होते आणि तीनवेळा शिवसेनेचे आमदारही झाले होते.
याबरोबरच राष्ट्रवादीतून शिवसेनेत येणारे शेखर गोरे माण मतदारसंघात पराभूत झाले आहेत. जयकुमार गोरे माण येथे विजयी झाले आहेत. तसेच शिवसेनेत येऊन दिलीप सोपल, जयदत्त क्षीरसागर, रश्मी बागल पराभूत झाले आहेत.
काँग्रेसच्या गयारामांचं काय?
काँग्रेसमधून भाजपध्ये गेलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर जयकुमार गोरे, कालिदास कोळंबकर यांचाही विजय झाला आहे. कालिदास कोळंबकर वडाळा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते.
सर्वात लक्ष वेधून घेणारा निकाल सिंधुदुर्गात दिसून आला. शिवसेना आणि भाजपा कणकवली मतदारसंघात एकमेकांविरोधात लढत होते.
नारायण राणे आणि नितेश राणे यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश सेनेला फारसा रुचलेला नाही हे वारंवार दिसून येत होतं. त्यामुळे कणकवलीत नितेश राणे निवडून येतील का याबद्दल सर्वांना उत्सुकता होती.
परंतु 56.16 टक्के मते मिळवून नितेश राणे इथं विजयी झाले. गेली निवडणूक काँग्रेसमधून जिंकणारे नितेश यावेळेस भाजपमधूनही निवडून आले तसेच युतीमधील बेदिलीचा परिणाम कमी करण्यातही ते यशस्वी झाले असं म्हणावं लागेल.
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले काशीराम पावरा धुळ्यातील शिरपूर मतदारसंघात आणि रायगड जिल्ह्यात पेणमध्येही रवींद्र पाटील विजयी झाले आहेत. रवींद्र पाटील काँग्रेसमधून भाजपात आले आहेत. रवींद्र पाटील यांनी शेकापच्या धैर्यशील पाटील यांना पराभूत केले. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या निर्मला गावित यांचा इगतपुरीमध्ये पराभव झाला आहे.
इतर पक्षांमधील फुटीर
बहुजन विकास आघाडीचे विलास तरे बोईसर विधानसभा मतदारसंघात दोनवेळा विजयी झाले होते. 2009 आणि 2014 साली विजयी झालेले विलास तरे शिवसेनेत गेले मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला. त्यांच्या आधीच्या पक्षाचे म्हणजे बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांनी त्यांना सुमारे 3 हजार मतांनी पराभूत केले. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या तिकिटावर विजयी होणारे शरद सोनावणे शिवसेनेत सामिल झाले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल बेनके यांनी त्यांना पराभूत केले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)