औरंगाबाद निकाल: एमआयएमला धक्का, महायुतीचे उमेदवार जिंकले

2019 विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबादच्या तीनही मतदारसंघातून महायुतीचेच उमेदवार विजयी झाले आहेत. औरंगाबाद मध्य येथून शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम येथून शिवसेनेचे संजय शिरसाठ आणि औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे निवडून आले आहेत.
प्रदीप जैस्वाल यांनी एमआयएमच्या नसीरुद्दीन सिद्दिकी यांचा पराभव केला. अतुल सावे यांनी एमआयएमच्या अब्दुल गफार यांचा पराभव केला. संजय शिरसाठ यांनी अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचा पराभव केला.
या लढतींची पार्श्वभूमी
लोकसभा निवडणुकीत औरंगाबादकरांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना निवडून दिलं. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार एमआयएमकडे वळल्याचं चित्र आहे. लोकसभेवेळी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होती. मात्र आता एमआयएमला वंचितची साथ नाही.
औरंगाबाद मध्य हा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. याचा परिणाम म्हणजे 13 मुस्लिम उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मुस्लिम मतदारांमधला मतविभाजनाचा फायदा महायुतीला होऊ शकतो. 23 अपक्ष उमेदवार कोणाची मतं खाणार हे बघणंही रंजक असेल.

फोटो स्रोत, facebook
काँग्रेस हा पक्ष मुस्लिमांचं लांगूलचालन करतोय असं म्हणत शिवसेनेनी मराठवाड्यात पाय रोवले तर धार्मिक पक्षांच्या जाचापासून वाचायचं असेल तर तुम्हाला आमच्याशिवाय पर्याय नाही अशी मांडणी MIM नं करत मराठवाड्यात प्रवेश केला.
आधी नांदेड आणि नंतर औरंगाबादमध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवली. दोन्ही ठिकाणी या पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला. 2014 मध्ये इम्तियाज जलील हे आमदार म्हणून निवडून आले आणि 2019 मध्ये ते खासदारही बनले.

फोटो स्रोत, facebook
औरंगाबाद आणि धार्मिक तणाव हे समीकरण चंद्र सूर्याइतक जुनं आहे, असं इथं म्हटलं जातं. मे 2018 मध्येच औरंगाबाद येथे शाहगंज भागात दोन धार्मिक समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पण हा काही या काळातला पहिलीच तणाव नाही.
औरंगाबादमध्ये धार्मिक तेढ आणि त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण होणं, हे काही नवीन नाही. या तणावाचं मूळ मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या काळातील आहे, असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे.
औरंगाबादच्या निमित्ताने शिवसेना आणि एमआयएम एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
उद्धव ठाकरे जेव्हा औरंगाबादमध्ये आले होते तेव्हा ते म्हणाले होते की "औरंगाबादला हिरव्या सापांनी विळखा दिला आहे." लोकसभेत एमआयएमचा खासदार निवडून आला आहे. याच संदर्भात ते म्हणाले की "औरंगाबादमध्ये हिरवा झेंडा रोवला गेला आहे. आपल्याला तो उखाडून फेकायचा आहे. या झेंड्याला गाडायचं आहे."
त्यांच्या या वक्तव्याला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी मालेगावमध्ये उत्तर दिलं. त्यावेळी ते म्हणाले "हिरव्याला गाडणं इतकं सोपं नाही. महाराष्ट्रात 50 ठिकाणी हिरवा झेंडा फडकणार आहे."
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत अनुचित उद्गार काढल्याच्या काही तासानंतरच शिवस्वराज्य स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे एकेकाळचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक झाली. ही दगडफेक शिवसैनिकांनीच केली असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर प्रचार करत आहेत. राज्यात ज्याही ठिकाणी उद्धव ठाकरे जात आहेत त्या ठिकाणी ते पीकविमा, कर्जमाफी अशा मुद्द्यांवर बोलत आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
तसेच शिवसेनेचा 10 रुपयांत थाळीचा मुद्दाही खूप गाजतोय. पण औरंगाबादमध्ये जिल्ह्यात झालेल्या सभांमध्ये त्यांनी म्हटलं की "भगव्याशी केलेली गद्दारी माफ केली जाणार नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








