आदित्य ठाकरे : वरळीतून शिवसेनेला विजय

फोटो स्रोत, Twitter
युवासेनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलीय. ते वरळीतून शिवसेनेचे उमेदवार आहेत.
या मतदारसंघातून ते विजयी ठरले आहेत. राष्ट्रवादीच्या सुरेश मानेंचा त्यांनी पराभव केला.
आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. सुरेश माने यांच्यात वरळीत प्रमुख लढत होणार आहे. तर 'मराठी बिग बॉस'फेम अभिजित बिचुकलेही इथून मैदानात उतरले होते.
या लढतीला इतकं महत्त्वं का?
आदित्य ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत. गेल्या जवळपास सहा वर्षांपासून ते शिवेसना, युवासेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झालेत.
भारतातील सर्वात श्रीमंत मानली जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर दोन दशकाहून अधिक काळ शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय. शिवाय, मुंबईतल्या शिवसेना आमदार आणि खासदारांची संख्याही लक्षणीय राहिलीय. त्यामुळं मुंबई म्हणजे शिवसेनेचं होमग्राऊंड समजलं जातं.

फोटो स्रोत, Twitter
बाळासाहेब ठाकरे हे कधीच निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. उद्धव ठाकरे किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही स्वत: कधी निवडणूक लढली नाही. त्यामुळं आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही वरळीतून उमेदवार दिला नाहीय. पुतणे आदित्य ठाकरेंसाठी काका राज ठाकरे यांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले.
एकूणच आदित्य ठाकरे हे वरळीतून रिंगणात उतरल्यानंच हा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे.
किती चुरशीची लढत?
आदित्य ठाकरे यांना मुख्य आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांचं.
अॅड. सुरेश माने हे जवळपास 20 वर्षें बहुजन समाज पक्षात होते. मात्र, पाच वर्षांपूर्वी त्यांनी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली. त्यांचा हा पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत आहे.
वरळीची जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यानं, सुरेश माने हे राष्ट्रवादीच्या चिन्हावरच रिंगणात उतरलेत.

फोटो स्रोत, Facebook/Suresh Mane
नव्वदच्या दशकात वरळी हे दलित आंदोलनाचं केंद्र होतं. आजही वरळी मतदारसंघात दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे.
मात्र, अॅड. सुरेश माने यांचा आदित्य ठाकरे यांच्यासमोर किती निभाव लागतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याचं कारण वरळीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि मुंबई राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष सचिन अहिर यांनीच शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवाय, 2014 साली सचिन अहिर यांचा पराभव करत शिवसेनेचेच सुनील शिंदे इथं विजयी झाले होते. त्यामुळे वरळी मतदारसंघ सध्या शिवसेनेकडेच होता.
दुसरीकडे, 1990, 1995, 1999, 2004 अशा सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सुरक्षित वाटत असल्याने आदित्य ठाकरे यांच्यासाठी या मतदारसंघाची निवड करण्यात आली असावी.
राजकीयदृष्ट्य वरळीचं महत्त्व किती?
वरळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्राची छोटी आवृत्ती असल्याचं संजय व्हनमाने सांगतात. "वरळीमध्ये गिरण्या आणि गिरणी कामगारांच्या चाळी मोठ्या प्रमाणावर होत्या. या परिसराला एकेकाळी गिरणगावही म्हणलं जायचं. गिरण्या बंद पडल्यानंतर वरळीमध्ये टोलेजंग इमारती, 5 स्टार हॉटेल्स, मल्टीप्लेक्स उभे राहिले आणि पुढच्या काळात या परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला."

फोटो स्रोत, Twitter
"वरळीमध्ये मोठमोठ्या चाळी आहेत. रेसकोर्स, ऑर्थर रोड जेल आहे, सर्वांत मोठा धोबीघाट आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच भागातील लोक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. गुजरातमधले अनेक नागरिक याठिकाणी राहायला आले आहेत. संमिश्र स्वरूपाची मतदारसंख्या या भागात पाहायला मिळते," असं ते पुढे सांगतात.
"सीताराम, मोरारजी, मफतलाल, डॉन मिल यासारख्या अनेक गिरण्या या मतदारसंघात आणि आजुबाजूला आहेत. मध्यंतरी संपामुळे अनेक गिरण्या बंद पडल्या आणि इथले बरेच मतदार उपनगरात, कल्याण-डोंबिवलीकडे वळले. पण तरीसुद्धा मराठी मतदारच या भागात महत्त्वाचा मानला जातो," असं संजय व्हनमाने सांगतात.
वरळी मतदारसंघातील गेल्या तीन निवडणुका
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








