सावरकर यांचे विचार पटत नसले तरी त्यांच्याबद्दल काँग्रेसला आदर- मनमोहन सिंग #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.

1. काँग्रेस सावरकरविरोधी नाही- डॉ. मनमोहन सिंह

"काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी नाही," असं मत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मांडलं आहे. "स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांबाबत काँग्रेसचे मतभेद आहेत मात्र त्यांच्या विचारांबाबत आदर आहे," असं मत डॉ. मनमोहन सिंग यांनी मांडलं आहे. मनमोहन सिंह यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये हे विधान केलं आहे.

काँग्रेसपेक्षा जास्त देशभक्त कोणीच नाही.

"देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाजप आणि आरएसएसचं नाव देखील नव्हतं. त्यामुळे काँग्रेसला देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही," असं मनमोहन सिंग म्हणाले.

"काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी नाही. म्हणून इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या स्मरणार्थ त्यांच्या पोस्टल स्टँप सुरू केला होता," अशी माहितीही मनमोहन सिंग यांनी दिली. एबीपी माझानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

2. कुस्ती बरोबरीच्या पैलवानांसोबत खेळतात, लहान मुलांशी नाहीः शरद पवार

"कुस्ती बरोबरीच्या पैलवानांबरोबर खेळतात लहान मुलांशी नाही", असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. कुस्तीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये टीका-प्रत्युत्तरं देऊन झाल्यावर पुन्हा एकदा शरद पवार यांनी या विषयावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

निफाड येथील सभेत बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता टीका केली आहे. "विद्यमान सरकारला राज्य चालवायची पद्धत ठाऊक नाही असं पवारांनी म्हटलं आहे. सत्ता आल्यावर पाय जमिनीवर आणि डोकं जागेवर ठेवायचं असतं", असा सल्लाही पवार यांनी भाजप सरकारला आहे. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

3. शिवरायांचा इतिहास आता सहावीपासून

चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकामधून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता छत्रपती शिवरायांचा इतिहास आता शिकता येणार नाही. शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख आता सहावीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातून करून देण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मंडळाने खुलासा केला आहे.

मंडळाच्या मते, आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा संपूर्ण अभ्यासक्रम हा संकल्पनाधिष्ठित आहे. पहिली ते चौथी या स्तरावर विविध संकल्पना निश्चित करून त्याभोवती सर्व विषयांची गुंफण केलेली आहे. त्यामुळे कोणताही विषय चौथीपर्यंत स्वतंत्र नाही. महाराष्ट्र राज्याच्या राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात विविध विषय स्वतंत्रपणे देण्यात आलेले आहेत. मुळात आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या संकल्पनाधारित अभ्यासक्रम तयार करण्यामागे एक वेगळी भूमिका आहे.

इतिहासाची पार्श्वभूमी तयार करताना समाजनिर्मिती, शासन-प्रशासन, राज्य आणि राज्यकर्ते या संकल्पना सर्वप्रथम स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इतिहासाची मांडणी करताना कालमापन पट्टीही डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक असते.

या सर्वाचा विचार करता, इतिहासाच्या नव्या आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार इतिहास केवळ युद्ध आणि संघर्षांपुरता मर्यादित नसून त्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय असे अनेक आयाम असतात. या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन इतिहासाची ओळख एक विषय म्हणून इयत्ता पाचवीपासून करून देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता सहावीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका वेगळ्या अंगाने देण्याचे मंडळाने ठरविले आहे. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.

4. प्रफुल्ल पटेल यांची आज ईडीकडून चौकशी

गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची आज चौकशी करणार आहे. मुंबईतील वरळी येथील सीजे हाऊसमधील पटेल यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहारांबाबत ही चौकशी होणार आहे.

बलार्ड पिअर येथील ईडीच्या कार्यालयात ही चौकशी होणार आहे. सीजे हाऊसमधील मिर्चीच्या मालकीचे दोन फ्लॅट पटेल यांनी विकत घेतल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. याप्रकरणी अटक केलेल्या रणजित सिंग बिंद्रा आणि हारून युसुफ दलालांच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. 2007 साली विकास करार होऊन हस्तांतर करण्यात आले. पटेल यांची त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येते. त्याबाबत ईडी चौकशी करणार आहे. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

5. 'जे माझ्या बारशाला आले होते तेच माझ्याविरोधात निवडणूक लढवत आहेत'

"जे माझ्या बारशाला आले होते ते आज माझ्याविरोधात निवडणूक लढवत आहेत", असं म्हणत माजी खासदार उदयनराजे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. उदयनराजे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यामध्ये काल सभा झाली. या सभेत उदयनराजे भोसले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

"विरोधक केवळ सत्तेसाठी एकत्र येत आहेत. निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अहंकाराचं हरण होईल", अशी टीकाही त्यांनी केली. टीव्ही 9 मराठीनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)