प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोलापूर शहर मध्यची निवडणूक किती आव्हानात्मक? - विधानसभा निवडणूक 2019

प्रणिती शिंदे

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे
    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान एका आठवड्याभरावर आलं आहे. अशा स्थितीत राज्यातील प्रमुख रंगतदार लढतींकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ असलेला सोलापूर शहर मध्य मतदारसंघ त्यापैकीच एक.

सोलापूर शहर मध्यच्या रिंगणातील प्रमुख उमेदवार

'कुणाचाच विजय निश्चित नाही'

म्हणजेच सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पाचही उमेदवारांनी प्रचंड चुरस निर्माण केली असून कुणाचाच विजय निश्चित नसल्याचं ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर यांना वाटतं.

इथल्या राजकीय समीकरणाबाबत बोलताना मुजावर सांगतात, "प्रणिती शिंदे यांची महिला आणि तरुणांमध्ये क्रेझ आहे. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे, पण त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक सोपी नसेल. गेल्या पाच वर्षांत काँग्रेस देशभरात कमकुवत झाली. तसंच यावेळी त्यांचेच एकेकाळचे सहकारी दिलीप माने आणि महेश कोठे त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. त्याशिवाय आडम आणि शाब्दी यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही."

दिलीप माने

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, शिवसेना उमेदवार दिलीप माने

मुजावर पुढे सांगतात, "2009च्या निवडणुकीत चारही पक्ष वेगळे लढले होते. भाजप आणि सेनेत झालेल्या मतविभागणीचा फायदा प्रणिती शिंदे यांना झाला होता. यावेळी महायुती झाली असली तरी त्यामध्ये बंडखोरी झालेली आहे. यंदा शिवसेनेने ऐनवेळी महेश कोठे यांचं तिकीट कापून माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी दिली. निराश झालेल्या कोठे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. नरसय्या आडम यांना माकपची मुलूखमैदानी तोफ मानलं जातं. मतदारसंघात बहुतांश कामगार वर्ग असून त्यांच्यावर आडम यांचा प्रभाव आहे."

"शहर मध्य मतदारसंघात एक तृतीयांश मतं मुस्लीम समाजाची असून मागच्या वेळी त्यांनी MIM पक्षाच्या मागे आपली ताकद उभी केली होती. विशेषतः मुस्लीम तरुणांमध्ये हा पक्ष लोकप्रिय आहे. त्यामुळे MIMचे उमेदवार शाब्दी यांना कमी लेखून चालणार नाही. अशा स्थितीत कोणत्याही एका उमेदवाराला विजयाची शाश्वती नसेल," असं मुजावर यांना वाटतं.

'जातीय गणितानुसार निवडणूक नाही'

मतविभागणी कोणत्या समीकरणावर आधारित असते, या प्रमुख प्रश्नाभोवती या निवडणुकीच्या विजयामागचं रहस्य लपलं असल्याचं ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने सांगतात. "MIMचा शिरकाव झाला तरी सुशीलकुमार शिंदे यांना मानणारा मुस्लीम वर्ग इथं आहे. विकासकामांमुळे सर्व जाती-धर्माची लोक प्रणिती शिंदे यांना मतदान करतात," असं माने सांगतात.

ते पुढे सांगतात, "दिलीप माने यांच्या स्वरूपात मराठा चेहरा शिवसेनेने दिला आहे. इथं शिवसेनेचा परंपरागत मतदार पाहायला मिळतो. गेली पाच वर्षं इथं तयारी करणारे महेश कोठे यांचीही मतदारांवर चांगली पकड आहे. त्यामुळे शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसू शकतो."

महेश कोठे यांची प्रचारसभा

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, महेश कोठे यांची प्रचारसभा

ते सांगतात, "या भागात भाजपला मानणाराही एक वर्ग आहे हे 2014च्या निवडणुकीत दिसून आलं होतं. तो वर्ग शिवसेनेला मत देईलच, असं नाही. आडम यांनासुद्धा विविध समाजगटांचं पाठबळ लाभलेलं आहे. त्यामुळे जातींना गृहीत धरून राजकीय व्यूहरचना रचणं या मतदारसंघात धोक्याचं आहे. आश्चर्यकारक निकाल इथं पाहायला मिळू शकतो."

सोलापूर जिल्ह्यातील शहर मध्य मतदारसंघात बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम मजूर, असे हातावर पोट असलेले मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. मुस्लिमांची संख्या इथं सर्वाधिक असून पद्मशाली समाज, मोची समाज, वडार समाजही या भागात मोठ्या संख्येने आहे. पण जातीय गणित लावून या ठिकाणी विजय मिळवणं कठीण असल्याचं मुजावर सांगतात.

प्रतिष्ठेची लढाई

पाचही उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचं प्रशांत माने सांगतात. प्रणिती शिंदे या दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. 2009 मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या. कमी वयातील आमदार म्हणून त्यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत लोकसभेत वडिलांचा पराभव होऊनसुद्धा प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत आपली जागा राखली होती.

आता 2019च्या निवडणुकीतही काँग्रेसची परिस्थिती बिकट असताना शिंदे त्यांची जागा राखण्यात यशस्वी होतात का, हा मुख्य प्रश्न आहे, असं जाणकार सांगतात.

माकप उमेदवार नरसय्या आडम मास्तर

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, माकप उमेदवार नरसय्या आडम मास्तर

महेश कोठे 2009ला काँग्रेसकडून तर 2014ला शिवसेनेकडून रिंगणात होते. दोन्ही वेळी त्यांना विजयाने हुलकावणी दिली. त्यांनी 2019 साठीही तयारी केली होती. पण शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख मंत्री तानाजी सावंत आणि इतर नेत्यांच्या राजकीय व्यूहरचनेनुसार उमेदवारी दिलीप माने यांना मिळाली.

प्रशांत माने सांगतात, "माने यांना तिकीट देऊन आपल्यावर अन्याय केल्याचं सांगत कोठेंनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. शिवसेना उमेदवार दिलीप माने काँग्रेसचे माजी आमदार आहेत. कोठे यांचा पत्ता कट करून त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळालेली असल्याने ते विजय मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. तसंच नरसय्या आडम मास्तर हे या मतदारसंघात आमदार राहिले आहेत. जनसामान्यांचा आवाज असल्याचा दावा ते नेहमी करतात. पुन्हा विजय मिळवण्यासाठी त्यांनीही जीवाचं रान केलं आहे."

अशा प्रकारे प्रत्येक उमेदवाराने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असल्यामुळे अतिशय रंगतदार राजकीय वातावरण या मतदारसंघात निर्माण झालं आहे.

2009ची निवडणूक आणि अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

शहर मध्य मतदारसंघात आजची स्थिती उत्पन्न होण्यामागचं राजकारण समजून घेण्यासाठी आपल्याला दहा वर्षं मागे जावं लागेल.

सोलापुरात तीन विधासभा मतदारसंघ आहेत. 2009 मध्ये महेश कोठे यांना शहर उत्तर मतदारसंघात, शहर मध्यला प्रणिती शिंदे तर दक्षिण सोलापूर मतदारसंघात दिलीप माने यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली होती.

कोठेंविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस नेते मनोहर सपाटे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. सपाटे यांना त्यावेळी 14 हजार 624 मतं मिळाली होती. मतविभागणी झाल्यामुळे कोठे यांना भाजपच्या विजयकुमार देशमुख यांच्याकडून 10 हजार 90 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. बाजूला प्रणिती शिंदे, दिलीप माने यांनी मात्र विजय मिळवला होता.

प्रणिती शिंदे नागरिकांसोबत

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, प्रणिती शिंदे नागरिकांसोबत

याबाबत विश्लेषण करताना मुजावर सांगतात, "2009च्या पराभवाची सल कोठे यांच्या मनात कायम होती. सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मुलीच्या विजयासाठी प्रयत्न केले मात्र आपल्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, अशी भावना कोठे यांच्या मनात होती. शिंदे यांच्यामुळेच आपण राजकीयदृष्ट्या मागे पडल्याचं सांगत महेश कोठे यांनी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र ठोकला."

पुढे 2014ची विधानसभा निवडणूक तोंडासमोर असताना कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

2009ची विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी (सोलापूर शहर मध्य)

मोदीलाट आणि राजकीय उलथापालथ

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सोलापूरमध्ये प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ झाली. सुशीलकुमार शिंदे लोकसभेत पराभूत झाले. विधानसभेला प्रणिती शिंदेंविरुद्ध एकेकाळचे सहकारी महेश कोठे आणि तौफिक शेख उभे राहिले. अशा स्थितीतही प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत विजय मिळवला.

2019 मध्ये सुशीलकुमार पुन्हा पराभूत झाले. तर मूळचे काँग्रेसचे असलेले तीन उमेदवार शहर मध्यला आमनेसामने आले आहेत. शिवाय आडम, शाब्दी यांच्यासारखे तुल्यबळ उमेदवार इथं नशीब आजमावत आहेत.

2014ची विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी

प्रणिती यांनी एक लोकप्रिय आमदार म्हणून ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडिया तसंच आपल्या थेट विधानामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. सुशीलकुमार शिंदे यांची राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या पाहिले जाते. देशात, राज्यात सर्वत्र काँग्रेस कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे या परिस्थितीला कशा प्रकारे टक्कर देतात, याविषयी उत्सुकता आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)