शरद पवार: ईशान्य भारतासाठी असलेलं कलम 371 रद्द करा, आम्ही पाठिंबा देतो - #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.

1. अनुच्छेद 371 रद्द करा, आम्ही पाठिंबा देतो! - शरद पवार

राज्यघटनेतील अनुच्छेद 371 मुळे ईशान्येकडील राज्यांत जमीन-घर खरेदी करता येत नाही. हे कलम रद्द करा, त्यास आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारला लगावला. बुटीबोरीमध्ये आयोजित प्रचारसभेत पवार बोलत होते. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे.

पवार पुढे म्हणाले, 370 रद्द झाल्याने काश्मीरमध्ये घर, जमीन खरेदी करता येते. याचे आम्ही स्वागत करतो. पण 371 अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही. हा अनुच्छेद रद्द करत असाल तर त्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण हे सरकार 371 संदर्भात काहीही करायला तयार नाही. त्याचे कारण एकच आहे. 370च्या नावाने, पुलवामाच्या नावाने त्यांनी लोकांची दिशाभूल चालवली आहे.

2. 150 ट्रेनच्या खासगीकरणासाठी विशेष गट

देशभर विस्तारलेल्या रेल्वेच्या जाळ्यातील 150 ट्रेनचे खासगीकरण तसेच 50 रेल्वे स्थानकांच्या जागतिक निकषांनुसार विकास करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी रेल्वेने विशेष गटाची स्थापना केली आहे. ही बातमी दैनिक महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

ही प्रक्रिया कालबद्धरीत्या पूर्ण करण्यासाठी अधिकारप्राप्त गटाची स्थापना करण्याबाबत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांना 7 ऑक्टोबर रोजी पत्र लिहिले होते.

त्यानंतर रेल्वेने हा आदेश काढला आहे. या गटात कांत आणि यादव यांच्यासह आर्थिक व्यवहार आणि गृहनिर्माण आणि नगरविकास या खात्यांचे सचिव, रेल्वेचे वित्तीय आयुक्त, इंजिनीअरिंग रेल्वे बोर्ड आणि ट्रॅफिक रेल्वे बोर्डाचे सदस्य यांचाही समावेश असेल.

3. रेनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंगसह 4 जणांना अटक

फार्मा कंपनी रेनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शिविंदर सिंग यांच्यावर फसवणूकीचा आरोप आहे. रेलिगेअर इंटरप्राइजेस लिमिटेडच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. शिविंदर सिंग यांच्यावर 740 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. ही बातमी हिंदुस्तान टाईम्स मराठी या वेबसाईटने दिली आहे.

शिविंदर सिंग यांच्यासह पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित इतर तीन जणांनाही अटक केली आहे. दरम्यान शिविंदर सिंगचा मोठा भाऊ मालविंदर सिंग याचा देखील शोध पोलिस घेत आहेत. मालविंदर सिंग यांचे देखील या प्रकरणात नाव आहे.

4. SBI ने तब्बल 76 हजार 600 कोटींचं कर्ज टाकलं बुडित खात्यात

स्टेट बँक ऑफ इंडिया ने दिवाळखोरीत गेलेल्या 220 जणांचं कर्ज बुडित खात्यात टाकलं आहे. हे एकूण कर्ज 76 हजार 600 कोटींचं आहे. तांत्रिकदृष्ट्या हे कर्ज 'राइट ऑफ' म्हणजे निर्लेखित करण्यात आलं आहे. CNN News 18 ने रिझर्व्ह बँकेत दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जातून ही माहिती मिळाली. ही बातमी न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने दिली आहे.

यामध्ये बँकांची 31 मार्च 2019 पर्यंतची 100 कोटींपासून ते 500 कोटीपर्यंतचं कर्ज बुडित खात्यात टाकली आहेत. या दिवाळखोरीत निघालेल्या कर्जदारांमध्ये SBI आणि पंजाब नॅशनल बँकेचे कर्जदार मोठ्या संख्येने आहेत.

याच पंजाब नॅशनल बँकेत आर्थिक गैरव्यवहार पुढे आलेले आहेत. IDBI या बँकेनेही कर्जदारांची कर्जं बुडित खात्यात घातली आहेत. त्याचबरोबर या यादीत कॅनरा बँकेचे कर्जदारही आहेत.

5. अमित शहा यांचा पाकिस्तानला इशारा

सांगलीतल्या जत येथील प्रचारसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता आहे पण पाकिस्तान कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण समजा त्यांनी आमचा एक सैनिक मारला तर त्यांचे आम्ही 10 सैनिक मारू असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी कलम 370 वर आपली भूमिका मांडावी असंही आवाहन केलं. ही बातमी लोकमतनं दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)