राज ठाकरे म्हणतात, कलम 370 हटवल्याबद्दल अभिनंदन, पण त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध - विधानसभा निवडणूक

राज ठाकरे

फोटो स्रोत, BBC/SharadBadhe

फोटो कॅप्शन, राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईत 2 सभा झाल्या यावेळी त्यांनी ED च्या मुद्द्यावर भाष्य तर केलंच शिवाय त्यांनी त्यांच्या मनसेकडे विरोधी पक्षाची धुरा देण्याची मागणी मतदारांकडे केली आहे.

'राज ठाकरे यांनी वास्तविकता स्वीकारली'

राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना मात्र राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका व्यवहार्य वाटत आहे.

ते म्हणतात,"मला राज ठाकरे यांची ही भूमिका योग्य आणि व्यवहार्य वाटते. गेली 10-12 वर्षं ते म्हणत होते की, एकदा एकहाती सत्ता द्या, मग कायापालट करतो. पण लोकांनी त्यांना सत्ता दिली नाही. नाशिकच्या महापालिकेत सत्ता मिळाली, पण ती त्यांना टिकवता आली नाही. त्यामुळे आता त्यांनी वास्तविकता स्वीकारली."

देसाई पुढे सांगतात, "सध्या राज्यात विरोधी पक्ष नाही, हे अगदी खरं. काँग्रेस-राष्ट्रवादी हा अजिबात प्रभावी विरोधी पक्ष नाही, हे तर आपण गेली पाच वर्षं बघतोच आहोत. त्यामुळे विरोधी पक्षाची जबाबदारी ते पार पाडतील, असं ते म्हणत आहेत. त्यातही स्वप्नरंजन आहे, यात वाद नाही. पण निदान ते वास्तविकता स्वीकारून होतंय. आज त्यांनी भाषणात खड्ड्यात पडून जीव गेलेली मुलगी, झाड कोसळून तडफडून मेलेला बस ड्रायव्हर, शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर आदी गोष्टी आणल्या."

"पण आता राज ठाकरे यांची पुढली भाषणं कशी होतात, त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणं कायम ठेवलं, तर लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसेल. ते बचावात्मक भूमिका घेतील, असं त्यांच्या स्वभावावरून वाटत नाही. पण त्यांनी सध्या घेतलेली भूमिका व्यवहार्य आहे," असं त्यांना वाटतं.

भाजपनं मात्र राज ठाकरे यांच्या या भूमिकेला गांभिर्यानं घेण्याची गरज नाही अशी टीका केली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बीबीसी मराठीशी बोलताना राज यांच्यावर टीका केली आहे.

"लोकशाहीत विरोधी पक्ष असलाच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. पण त्यासाठीही लोकांमध्ये एक विश्वासार्हता असावी लागते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि राज ठाकरे यांनी ती विश्वासार्हता गमावली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना आधीच नाकारलं आहे. त्यामुळे राज यांचं म्हणणं गांभीर्याने घेण्याची गरज नाही," असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांच्या गोरेगावच्या सभेतील ठळक मुद्दे

  • मनसेची ब्ल्यू प्रिंट कुठल्याच पत्रकाराने वाचली नसल्याचा राज ठाकरे यांचा दावा
  • ईव्हीएम विरोधातल्या मोर्चावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.
  • ED च्या चौकशीनंतर माझं थोबाड थांबणार नाही, ज्यांना धमक्या दिल्या ते भाजपमध्ये गेले, मला नाही त्याचा फरक पडत - राज ठाकरे
  • आरे प्रकरणी न्यायालयं आणि सरकार यांच्यात संगनमत असल्याचा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला. शुक्रवारीच नेमका निकाल आला, त्यामुळे शनिवार-रविवारच्या सुटीत सगळी झाडं कापली, असं राज म्हणाले.
  • ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते भाजपमधून निवडणूक लढवत आहेत, कुठे आहे पार्टी विथ डिफरन्स, असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय.
  • आरे प्रकरण आणि इनकमिंगच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका, बाळासाहेब असते तर असं घडलं नसतं.
  • मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांना मुख्यमंत्री विहीरी म्हणत असतील तर मला मान्य आहे.
  • तुमच्या मनात काही राग आहे की नाही, तो तुम्हाला व्यक्त करावासा वाटतो की नाही, तुम्ही कधी बोलणार आहात, राज ठाकरेंचा लोकांना सवाल
  • महाराष्ट्राला एका सक्षम, सबळ विरोधी पक्षाची गरज
  • मेट्रोची कारशेड बीपीटीच्या जागेवर का नाही.
  • 370 कलम हटवल्याबद्दल अभिनंदन, पण त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध
  • बुलेट ट्रेनच्या आडून संयुक्त महाराष्ट्राची जखम उखडून काढायची आहे का?
  • मंत्र्यांच्या राजीनाम्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका
  • भारताच्या इतिहासात कुठल्याही पक्षानं आतपर्यंत विरोधीपक्षाची भूमिका मागितलेली नाही.

राज यांच्या पहिल्या सभेतील ठळक मुद्दे

  • राज्यातल्या शहरांचं नियोजन कोलमडलं आहे.
  • पीएमसी बँक कुणी बुडवली?
  • न्यायालयांकडून न्याय मिळणार आहे का?
  • तुमच्या जाणीवा मेल्या आहेत का, राज ठाकरे यांचा लोकांना सवाल.
  • तुम्ही कधी प्रश्न विचारणार आहात, राज ठाकरेंचा लोकांना सवाल.
  • आज मला तुमच्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष व्हायचंय.
  • माझा आवाका मला माहिती आहे, मला प्रबळ विरोधी पक्ष व्हायचंय.
राज ठाकरे

फोटो स्रोत, Twitter

9 ऑक्टोबरला पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण मुसळधार पावसामुळे मैदानात पाणी साचल्यानंतर ही सभा रद्द करण्यात आली होती.

ईडीनं केलेल्या चौकशीनंतर आपल्या पहिल्या प्रचारसभेत राज ठाकरे नेमकं बोलणार काय याकडे सर्वांचेच लक्ष होतं.

पावसामुळे राज ठाकरे यांची पुण्यातली सभा रद्द करण्यात आली.
फोटो कॅप्शन, पावसामुळे राज ठाकरे यांची पुण्यातली सभा रद्द करण्यात आली.

माझं तोंड बंद होणार नाही - राज ठाकरे

मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर गेला की तुम्हाला हे ट्वीट दिसेल. "मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय ह्या अशा कितीही चौकशा केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

ईडी चौकशी झाल्यानंतर राज ठाकरे हे शांत बसले झाले आहेत अशी टीका त्यांच्यावर होत होती त्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलं. हे ट्वीट मनसेनी पिन करून ठेवलंय.

त्यामुळे आज ते काय बोलतील याकडे सर्वांचे कान लागले आहेत.

'लाव रे तो व्हीडिओ'

2019 ची लोकसभा निवडणूक न लढवणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, ही घोषणा राज ठाकरेंनी केल्यानंतर पहिल्या प्रचारसभेसाठी 5 ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर प्रचारसभेची तारीख पुढे ढकलण्यात आली.

9 ऑक्टोबरची पुण्यातली सभा रद्द झाल्यानंतर आज मुंबईतल्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

लोकसभा निवडणुकीला राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले नव्हते. पण त्यांनी भाजपविरोधात सभा घेतल्या होत्या. त्यांचा 'लाव रे तो व्हीडिओ' हे वाक्य सर्वांनाच पाठ झालं होतं.

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनी राज्यात 125 हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यातले बहुतांश उमेदवार हे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या शहरी भागातील आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या ट्विटर टाइमलाइनकडे पाहिले तर त्यावर मूलभूत सुविधांचे प्रश्न सातत्याने ते मांडत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)