You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आरे कॉलनी: आदित्य ठाकरे फक्त ट्वीट करणार, की ठाम भूमिका घेणार?
"मुंबई मेट्रोचे अधिकारी झाडं तोडण्यात जी तत्परता दाखवत आहेत, त्यासाठी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये का तैनात करू नये? दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा ना, झाडं कशाला उद्ध्वस्त करताय?" असं म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरे कॉलनीतल्या वृक्षतोडीचा निषेध केलाय.
मुंबई हायकोर्टाने मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीत वृक्षतोड करण्याची परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी रात्रीच तिथे वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली. यानंतर वृक्षप्रेमींनी मोठ्या प्रमाणात आरे कॉलनीमध्ये एकत्र येऊन या वृक्षतोडीचा विरोध करायला सुरुवात केली.
आदित्य ठाकरे हे सुद्धा सातत्यानं ट्विटरवरून आरे कॉलनीत मेट्रोशेड बांधण्यास विरोध करत आहेत. मात्र ते केवळ ट्विटरवरूनच विरोध करताना दिसत आहेत.
आरे कॉलनीतल्या मेट्रो कारशेडबाबत आदित्य ठाकरे काही ठाम भूमिका घेणार का, असा प्रश्न आता सोशल मीडियासह सर्वच स्तरातून विचारला जातोय. त्याचबरोबर, आदित्य ठाकरेंनी कारशेडविरोधी ठाम भूमिका घेतल्यास त्यांना राजकीयदृष्टी परवडणार आहे का, असाही प्रश्न निर्माण होतोय.
'आदित्य ठाकरेंचे ट्वीट म्हणजे भूमिका नाही, ती केवळ धूळफेक'
आदित्य ठाकरे ट्विटरवरून मेट्रो कारशेड आणि वृक्षतोडीला करत असलेल्या विरोधावर वरिष्ठ पत्रकार अलका धुपकर म्हणतात, "आरे कॉलनीतल्य प्रस्तावित मेट्रो कारशेडबाबत आदित्य ठाकरेंनी भूमिकाच घेतली नाही. ते केवळ धूळफेक करत आहेत. ट्विटरवरून बोलण्याला भूमिका घेणं म्हणत नाही."
त्या पुढे म्हणतात, "आंदोलक आणि सर्वसामान्य लोकांनी भूमिका घेतल्या आहेत. सरकारी कामात अडथळ्याप्रकरणी लोकांवर गुन्हेही दाखल झालेत. आज तर तिथं कलम 144 लागू करण्यात आलंय. आता कधी आदित्य ठाकरे भूमिका घेणार आहेत? वेळ निघून गेलीय."
गेल्या काही महिन्यांपासून आदित्य ठाकरे ट्वीट करून कारशेडला विरोध करताना दिसतायत. यावर अलका धुपकर निरीक्षण नोंदवतात की, "आदित्य ठाकरेंची ट्विटर टाईमलाईन नीट तपासून पाहा, तुमच्या लक्षात येईल की आदित्य ठाकरे हे आरे कॉलनीच्या विषयावर कधीपासून बोलायला लागलेत. निवडणुकीच्या तोंडावर केलेलं दिखाऊ राजकारण आहे. आदित्य ठाकरेंसाठी मतं मागताना लोकांना दाखवण्यासाठीचा आरेचा पुळका आहे."
आरे कॉलनीत वृक्षतोड सुरू झाल्यानंतर घटनास्थळी शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ पोहोचल्या होत्या. पोलिसांनी शुभा राऊळ यांना ताब्यातही घेतलं होतं.
'आम्ही आलो म्हणजे आदित्य ठाकरे आले असाच अर्थ'
केवळ ट्वीट करण्याऐवजी ठाम भूमिका घेऊन आदित्य ठाकरे रस्त्यावर का उतरत नाहीत, असा प्रश्न शुभा राऊळ यांना विचारला असता, त्या म्हणाल्या, "आम्ही इथं आलोय म्हणजे ते आले असाच अर्थ आहे. आम्हालाच आदित्य ठाकरेंनी सांगितलं, इथली परिस्थिती पाहायला. शिवाय, आदित्य ठाकरेंनी आरेत कारशेड उभारण्यास आधीपासूनच विरोध केलाय. युती असली तरी हा विरोध राहीलच, असं आम्ही स्पष्ट केलं होतं."
राऊळ पुढे म्हणाल्या, "आदित्य ठाकरेंचा कारशेडला विरोध करणाऱ्यांना पाठिंबा आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांसोबत बैठकाही त्यांनी घेतल्या. आरे कॉलनीतही त्यांनी भेट दिली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढची दिशा ठरवू, असं आम्ही ठरवलं होतं. पण आदेश येऊन पटकन झाडं तोडायला सुरुवात होईल, असं आम्हालाही वाटलं नव्हतं."
"पर्यावरण मंत्रालय, आयुक्त सगळीकडे आम्ही आरडाओरडा केला. मात्र मुंबई उच्च न्यायालयात अजून प्रकरण आहे, असं वाटलं होतं. पण न्यायालयानंही अशा वेळेला आदेश दिले की, पुढचे चार-पाच दिवस न्यायालय बंद राहील. रात्रीच्या रात्री झाडांची कत्तल सुरू केली. सर्वोच्च न्यायालयात कुणी जाणार नाही, असं पाहिलं." असेही शुभा राऊळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
उद्धव ठाकरे यांचा इशारा
आरे हा आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या आरे कॉलनीत जे काही सुरू आहे त्याची मी सविस्तर माहिती घेईन असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
आरे कॉलनीतल्या झाडांची कत्तल करणाऱ्यांना कठोर शासन केलं जाईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. आगामी सरकार हे आमचंच असेल आणि ज्या लोकांनी झाडांची कत्तल केली आहे त्यांना शिक्षा दिली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
आरे कॉलनीत मेट्रो कारशेड बांधण्यास आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेचा विरोध असला, तरी भाजप मेट्रो कारशेडसाठी पुढे सरसावलीय.
त्यामुळं आदित्य ठाकरेंच्या विरोधाबाबत भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांना विचारले असता, ते म्हणाले, "मेट्रो कारशेड हा महाराष्ट्र सरकारचा निर्णय असून, मुंबई उच्च न्यायालयानंही आता वैध ठरवलाय. वृक्ष प्राधिकरणानंही मान्यता दिलीय. या प्राधिकरणात शिवसेनेचेही सदस्य आहेत."
भातखळकर म्हणतात, "मेट्रो प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. विरोध करणं ज्याला जे करायचं ते करावं, पण मुंबई उच्च न्यायालयानं वैध ठरवलंय."
"अनेक प्रकल्पाबाबत अनेकांच्या शंका असतात, त्याला उत्तर देणं सरकारचं काम आहे. आम्ही वेळोवेळी उत्तरं दिली आहेत." असेही त्यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरेंचा सोयीस्कर विरोध?
आपल्या राजकीय वाटचालीला अडचण होईल म्हणून आदित्य ठाकरे हे केवळ ट्विटरवरून विरोध करतायत का, या शक्यतेचाही बीबीसी मराठीनं कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.
याबाबत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान म्हणतात, "राज्यात निवडणुका सुरू झाल्यात. आदित्य ठाकरे स्वत: वरळीतून उमेदवार आहेत. आता आदित्य ठाकरेंना निवडून यायचंय, ते आता कदाचित टोकाची भूमिका घेता येणार नाही. त्यांना भाजपचीही मदत लागणार आहे."
ते पुढे सांगतात, "आदित्य ठाकरे यांचं कालचं ट्वीट पाहिल्यास लक्षात येईल, त्यांनी राजकीय अडचण निर्माण होणार नाही, अशी भूमिका घेत अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचं दिसून येतं."
"मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असल्याशिवाय आरे कॉलनीतली झाडं तोडणार नाही, हे स्पष्ट आहे. मात्र मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याऐवजी आदित्य ठाकरेंनी अधिकाऱ्यांना लक्ष केलं असावं." असं संदीप प्रधान सांगतात.
मात्र थेट भूमिका घेत सरकारवर टीका करण्याऐवजी नोकरशाहीला लक्ष्य करण्यामागचं कारण काय असू शकतं, याबबत संदीप प्रधान म्हणतात, "प्रस्ताव रेटण्यासाठी अधिकारीही बऱ्याचदा राजकीय नेतृत्वावर दबाव आणत असतात. काहीवेळा नोकरशाही सुद्धा सरकारमध्ये बसलेल्या लोकांना आग्रह करते, भाग पाडते, हे सुद्धा सत्य आहे. म्हणून कदाचित आदित्य ठाकरेंकडे ही माहिती असू शकेल की, नोकरशाहीनं राजकीय नेतृत्वाच्या गळी हा निर्णय उतरवलाय म्हणूनही ते कदाचित टीका करू शकत असतील."
मात्र, प्रशासन असो किंवा सरकार यावर टीका करणं आदित्य ठाकरे यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीला मारक ठरू शकेल का, हा प्रश्नही इथे उपस्थित होतो.
त्यावर संदीप प्रधान म्हणतात, "एखाद्या विषयावर विरोधी मत देणं, यात गैर काहीच नाही. आघाडी किंवा युतीचं सरकार असलं की सगळ्या पक्षांनी एकच मत दिलं पाहिजे असं नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही अनेक निर्णयांना अनेकजण विरोध दर्शवतात."
तरीही आदित्य ठाकरे ट्विटर सोडून आता मैदानात उतरतील का आणि सत्तेचा वाटेकरू असलेल्या पक्षातील नेता म्हणून काही ठाम भूमिका जाहीर करतील का, हे प्रश्न कायम आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)