You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आदित्य ठाकरेंच्या BMW कारची किंमत फक्त 6.50 लाख कशी?
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जात त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या.
यातील बहुतांश चर्चा या आदित्य ठाकरेंच्या BMW गाडीबद्दलच होत्या. आदित्य ठाकरेंनी आपल्या गाडीची किंमत साडेसहा लाख रुपये लिहिली आहे. BMW ची किंमत एवढी कमी कशी, असा प्रश्न विचारला जातोय.
MH02 CB 1234 असा या गाडीचा नंबर असून BMW 530D GT असं हे गाडीचं मॉडेल आहे. आदित्य यांनी या गाडीची किंमत 6.50 लाख अशी सांगितली आहे.
जी गाडी आदित्य यांच्याकडे आहे, तिचं रजिस्ट्रेशन 2010 साली झाल्याचं 'वाहन' या केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून कळतं.
या गाडीची नेमकी किंमत किती?
2010 साली या गाडीची एक्स-शोरूम किंमत 64.80 लाख रुपये साधारण होती. आणि आज या गाडीच्या अद्ययावत मॉडेलची किंमत सुमारे 66 लाखांपासून सुरू होते.
कुठलीही गाडी विकत घेताना तिचं मूल्य काही वर्षांनी कमी होणार, हे गृहित असतंच. ती गाडी जर मुंबई किंवा किनारपट्टीजवळच्या शहरातील असेल तर तिचं मूल्य आणखी कमी होतं, कारण या भागात गाड्यांची मूळ बॉडी कालानुरूप गंजण्याचं प्रमाणही तुलनेने जास्त असतं.
त्यामुळे जरी आदित्य यांची ही गाडी 9 वर्षं जुनी असली तरी तिची किंमत 6.50 लाख असेल, हे जरा आश्चर्यचकित करणारं आहेच.
तुम्ही जर एखादी जुनी BMW कार सेकंड हँड गाड्यांच्या बाजारात घ्यायला गेलात, तर एका चांगल्या अवस्थेतील गाडीसाठी कमीत कमी 10 लाख तरी मोजावे लागणारच.
सेकंड हँड BMW ची किंमत किती असू शकते हे पाहायला आम्ही OLX वर जरा शोधाशोध केली, तर तिथेही 2008चं दिल्लीतील 5 सीरिज BMW मॉडेल 6.50 लाखांना होतं.
त्यातल्या त्यात गाडीचं काही नुकसान झालं असेल तर हा आकडा आणखी खाली येऊ शकतो. जसं की जानेवारी 2017 मध्ये आदित्य यांच्या याच गाडीला अपघात झाला होता. तेव्हा त्यांनी आपण सुखरूप असल्याचं ट्वीट करून सांगितलं होतं.
मात्र आदित्य यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ही गाडी 2019 साली खरेदी केल्याचं सांगितलं आहे.
याबाबत शिवसेनेचे नेते अनिल परब बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "कारचं मॉडेल 2010 सालचं आहे. त्यामुळं ज्यावेळी कार खरेदी केली, त्यावेळची डेप्रिसिएशन व्हॅल्यू पाहा. मॉडेल 2010 सालचं आणि खरेदी केली 2019 साली, म्हणजे 9 वर्षात किती डेप्रिसिएशन होतं, हे काढल्यास किंमत योग्य आहे."
"आदित्य ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रात एवढी साधी चूक आम्ही कशी करू? डेप्रिसिएशन व्हॅल्यू घेऊन किंमत काढलीय. त्यामुळं या किंमतीवरून टिंगलटवाळीला काहीच अर्थ नाही." असंही अनिल परब म्हणाले.
एखाद्या गाडीचे नेमकं डेप्रिसिएशन म्हणजे वर्षागणिक कमी होणारी किंमत कशी ठरवतात याविषयी कार एक्सपर्ट दिगंबर यादव यांनी सांगितलं, "एखाद्या कारचं डेप्रिसिएशन काढताना ते चार्टर्ड अकाऊंटंट 15 टक्क्यांनी मोजतात. तर इन्शुरन्ससाठी याची गणना 10 टक्क्यांनी केली जाते. याशिवाय हे मॉडेल जर जुनं असेल तर या मॉडेलला आता किती मागणी आहे, ती कार नेमकी कुठे विकली जातेय यावरही गाडीची किंमत अवलंबून असते. शिवाय या कारचा कधी अपघात झालेला आहे का, तेव्हा किती नुकसान झालं होतं, एकूणच कारचं कितीवेळा कोणतं काम करून घेण्यात आलेलं आहे, कारने एकूण किती किलोमीटर्सचा प्रवास केलेला आहे या सगळ्या गोष्टींवरही गाडीची किंमत सेकंड हँड घेताना अवलंबून असते."
एवढी स्वस्त BMW कुठे मिळेल?
या प्रश्नाचं उत्तर अनेक जण शोधू लागले आहेत. काहींनी तर सोशल मीडियावर याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे.
अमेय भगत यांनी फेसबुकवर आदित्य ठाकरेंच्या बीएमडब्ल्यू कारच्या किंमतीबाबत आश्चर्य व्यक्त केलंय.
मंगेश केळुस्कर यांनी आदित्य ठाकरेंना टोमणा मारत इतक्या कमी किंमतीची बीएमडब्ल्यू घ्यायला एका पायावर तयार असल्याचं म्हटलंय.
शशिकांत जाधव मिश्किलपणे विचारतात, की 6.5 लाखात कुठे बीएमडब्ल्यू मिळते?
हर्षवर्धन म्हस्के आदित्य ठाकरेंच्या कारला जगातली सर्वात स्वस्त कार म्हणतात.
विकास घुले यांनीही फेसबुकवर पोस्ट शेअर करत आदित्य ठाकरेंच्या कारच्या किंमतीची खिल्ली उडवलीय.
रोहित जाधव यांची फेसबुक पोस्टही आश्चर्य व्यक्त करणारी आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)