शरद पवार: माझं नाव शिखर बॅंक प्रकरणात आल्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला

अजित पवार यांनी राजीनामा का दिला याबाबत शरद पवारांनी खुलासा केला. माझं नाव शिखर बॅंक घोटाळा प्रकरणात आल्यामुळे अजित पवार हे अस्वस्थ होते त्यातूनच त्यांनी राजीनामा दिला असावा असं मला समजलं, असं शरद पवारांनी सांगितलं.

अजित पवार यांनी राजीनामा का दिला याबाबत शरद पवारांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आमच्या कुटुंबात कोणताही कलह नाही असं शरद पवार यांनी सांगितलं. माझा निर्णय अंतिम असतो. असं पवार सांगतात.

राजकारणाची पातळी घसरली आहे त्यापेक्षा उद्योग आणि शेती करा असा सल्ला अजित पवारांनी आपल्या मुंलाना दिला असं शरद पवारांनी सांगितलं.

अजित पवार यांनी माझ्याकडे राजीनामा दिला पण त्यांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण स्पष्ट केलं नाही असं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं.

मी राजीनामा दिला आणि तो तुम्ही तो स्वीकारा असं अजित पवार मला म्हणाले, असं हरिभाऊ बागडे म्हणाले. अजित पवारांनी फॅक्सद्वारे राजीनामा पाठवला असं बागडे यांनी सांगितलं. त्यांच्या राजीनाम्याचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. आपण राजीनामा मंजूर केला आहे असं बागडे यांनी सांगितलं.

पक्षाला पूर्वकल्पना न देताच अजित पवार यांनी राजीनामा दिला असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितलं.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर अजित पवारांनी का राजीनामा का दिला असा प्रश्न अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.

आज शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात जाणार होते तेव्हा अजित पवार मुंबईत हजर नव्हते. त्यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारणा केली की अजित पवार कुठे आहेत.

अजित पवार हे आपल्या मतदारसंघात पूरपरिस्थितीचा आढावा घेत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जिंतेद्र आव्हाड यांनी सांगितलं होतं.

बारामती आणि पुण्याच्या परिसरात पुराने थैमान घातलेलं असल्यामुळे अजित पवार हे आज मुंबईत येऊ शकले नाहीत.

अजित पवारांची राजकीय कारकीर्द

1982 साली सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीपासून अजित पवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

अजित पवारांनी पहिली निवडणूक विधानसभेची नाही तर लोकसभेची लढवली होती. 1991 मध्ये ते बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. मात्र त्यांची लोकसभेतील ही कारकीर्द सहा-आठ महिन्यांचीच ठरली.

त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर शरद पवार यांना पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. पण पंतप्रधानपदाची माळ पी. व्ही. नरसिंह राव यांच्या गळ्यात पडली. तेव्हा शरद पवारांना नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून स्थान देण्यात आलं, ज्यासाठी अजित पवारांनी आपली बारामती लोकसभेची जागा काकांसाठी सोडली.

मात्र तेव्हापासून अजित पवार राज्यात कार्यरत राहिले तर 2009 पासून शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या लोकसभेत बारामतीचं प्रतिनिधित्व करतात. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे ही राष्ट्रवादी काँग्रेसची जणू अलिखित विभागणीच झाली आहे.

1995 पासून अजित पवार विधानसभेत बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. सुधाकरराव नाईकांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत, आघाडीच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी मंत्रिपद भूषवलं आहे.

अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रकरणी आणि राज्य सहकारी बॅंक प्रकरणी आरोप झाले आहेत. निवडणुकांची घोषणा झाली असताना त्यांनी राजीनामा दिला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)