सई मांजरेकर: सलमान खानच्या दबंग-3 मध्ये दिसणार महेश मांजरेकरांची लेक

नुकत्याच झालेल्या आयफा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात विविध बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. जगभरातून अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यात सहभागी झाले होते. पण या सगळ्यांमध्ये एका मराठी चेहऱ्याने साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं.

हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर आयफा पुरस्कारसोहळ्याचं आकर्षण ठरली. या कार्यक्रमाला ती सलमान खानसोबत आली होती.

सलमान खानच्या आगामी दबंग-3 मध्ये तिची महत्त्वाची भूमिका असणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरणही सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळेच आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनची संधी सलमान खान आणि सई मांजरेकर यांनी सोडली नाही.

सलमान खान आणि महेश मांजरेकर यांचे संबंध अतिशय मैत्रीपूर्ण असल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे. गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेल्या सलमानच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात महेश मांजरेकरची एखादी भूमिका असते.

दबंग चित्रपटात महेश मांजरेकरने सोनाक्षी सिन्हाच्या वडिलांची भूमिका केली होती. तसंच सलमानच्या अन्य काही सिनेमांमध्येही ते झळकले होतेच.

आता सई मांजरेकर दबंग-3 मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्यामुळे दबंग 3 मधल्या सईच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. या चित्रपटात अर्थातच सलमान खान चुलबुल पांडे या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तसंच सोनाक्षी सिन्हा, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता किच्चा सुदीप यांची प्रमुख भूमिका असणार आहे.

कोण आहे सई मांजरेकर

सई ही महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची धाकटी मुलगी. अश्विनी मांजरेकर आणि सत्या मांजरेकर हे तिचे बहीण-भाऊ आहेत.

सईचा जन्म 29 ऑगस्ट 1998 ला मुंबईमध्ये झाला. तिचं प्राथमिक शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं. नंतर तिने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासूनच तिला नृत्य आणि अभिनयाची आवड आहे. तिच्या कुटुंबीयांप्रमाणेच तिलासुद्धा चित्रपटसृष्टीतच करिअर करायचं होतं.

यावर्षी जुलैमध्ये तिला दबंग 3 मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करायची संधी मिळाली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)