शरद पवार : पुलवामासारखी घटना घडली नाही तर राज्यात सत्तांतर होईल #पाचमोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. पुलवामाप्रमाणे काही घडलं नाही तर राज्यात सत्तापरिवर्तन अटळ : शरद पवार

लोकसभा निवडणुकीपूर्वी 'पुलवामा' घडले. त्याचा केंद्रातील सत्ताधारी पक्षाला फायदा झाला. राज्यातील निवडणुकीपूर्वी पुलवामाप्रमाणे काही घडले नाही तर, राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे,' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

पवारांनी शुक्रवारी औरंगाबादेतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "मराठवाडाभर फिरून आलो.

सर्व ठिकाणी युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देश व राज्यातील सरकारबाबत तीव्र नापसंती असावी, असे दिसते. लोकांमध्ये प्रचंड उत्साह असून तरुणांमध्ये परिवर्तनाची लाट आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कष्टाची तयारी आहे."

2. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणावात वाढ

गेल्या काही वर्षांत राज्यात हिंदु-मुस्लिम तणावापेक्षा सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाची व्याप्ती वाढली असल्याचा अहवाल राज्यातील पोलीस खात्याने निवडणूक आयोगाला दिला आहे. ही बातमी एपीबी माझाने दिली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वाढत्या जातीय तणावामुळं पोलीस प्रशासन चिंतेत पडलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणावात वाढ झाल्याचा अहवाल पोलिस खात्याने निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे.

हिंदु-मुस्लीम तणावाची जागा गेल्या पाच वर्षांत सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

बुधवारी मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला होता. त्यात पोलीस खात्याने राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेसंदर्भात एक सादरीकरण केले आहे.

3. शेअर मार्केट वधारावं म्हणून मोदी काहीही करण्यास तयार: राहुल गांधी

आपल्या 'हाऊडी, मोदी' या अमेरिकेत होणाऱ्या कार्यक्रमाच्या आधी भारतातलं शेअर मार्केट वधारावं म्हणून मोदी काय करू शकतात हे पाहून मी थक्क झालो आहे असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

मोदी सरकारच्या कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या घोषणेविषयी ते बोलत होते. अमेरिकेत होणाऱ्या या कार्यक्रमावर 1.4 लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि हा जगातला सगळ्यांत महागडा कार्यक्रम असेल. पण यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची जी दुरावस्था झाली आहे ती झाकली जाणार नाही असंही राहुल गांधी पुढे म्हणाले.

4. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल झाले पहिले राफेल

भारतीय वायुदलाच्या ताफ्यात राफेल हे विमान दाखल झाले आहे. फ्रान्सने हे विमान दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फ्रान्समधील दसॉ अॅव्हिएशन या कंपनीने पहिले राफेल विमान भारतीय वायुदलाला सोपवले असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसत्ताने यासंदर्भात वृत्तं दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी राफेल करारावरुन मोदी सरकारवर राहुल गांधी यांनी वारंवार निशाणा साधला होता. तसेच राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबांनींचा फायदा व्हावा म्हणून मध्यस्थाचे काम केले असाही आरोप केला होता. इतकंच नाही तर राफेल विमानाची किंमत आघाडीच्या काळापेक्षा वाढवण्यात आली असंही काँग्रेसने म्हटलं होतं.

राफेल कराराचा मुद्दा संसदेत आणि संसदेबाहेर चांगलाच गाजला होता. आज अखेर फ्रान्सने पहिल्या विमानाची डिलिव्हरी भारताला दिली आहे.

5. बजरंग पुनियानला जागतिक कुस्ती स्पर्धेत तिसऱ्यांदा पदक

भारताचा अव्वल पैलवान बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. बजरंगनं 65 किलो गटात कांस्यपदकाच्या लढतीत मंगोलियाच्या तुलगा तुमूर ओशीरवर 8-7 अशा फरकाने सनसनाटी विजय मिळवला आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.

जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेतलं बजरंगचं हे आजवरचं तिसरं पदक ठरलं आहे. त्यामुळे जागतिक कुस्तीची तीन पदकं मिळवणारा तो भारताचा पहिलाच पैलवान ठरला आहे. याआधी 2013 आणि 2018 साली बजरंगनं या स्पर्धेत पदक मिळवलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)