नितीन गडकरी म्हणतात, स्वकर्तृत्व नसलेले लोक जातीचं कार्ड वापरतात : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. स्वकर्तृत्व नसलेले लोक जातीचं कार्ड वापरतात : नितीन गडकरी

राजकारणात अनेक लोकं जेव्हा स्वकर्तृत्वावर उमेदवारी मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीचं कार्ड समोर करतात, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सडेतोड मत व्यक्त केलं आहे.

ते नागपूरमध्ये बोलत होते. ही बातमी ABP माझाने दिली आहे.

हे लोक राजकारणात महिला आरक्षणाची मागणी करतात. मात्र इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, वसुंधराराजे या महिला आरक्षणामुळे मोठ्या झाल्या नाहीत.

तसंच राजस्थानात अशोक गहलोत फक्त माळी समाजाच्या पाठिंब्याने नाही तर सर्व समाजाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले असं देखील गडकरी यांनी म्हटलं आहे.

आज राजकारणात जातीमुळे नव्हे तर लोकांचं काम केल्यामुळे यश मिळतं आहे. मोदींनी कधीच त्यांची जात कोणाला सांगितली नाही, याची आठवणही गडकरींनी करून दिली.

2. कोरेगाव-भीमा प्रकरण : भिडेंविरोधातील तपासासाठी न्यायालयाची मुदतवाढ

कोरेगाव-भीमा प्रकरणाबाबत श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्य़ाचा तपास करून अहवाल दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयाने सोमवारी पोलिसांना ११ नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ दिली. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

जानेवारी 2018 मध्ये पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे उसळलेल्या दंगलीचे राज्यभरात पडसाद उमटले होते. या दंगलीप्रकरणी स्थानिक रहिवासी अनिता सावळे यांनी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह अन्य काहीजणांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली होती. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर एकबोटे यांच्यासह अन्य आरोपींवर कारवाई झाली.

पण भिडे गुरुजींविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप करत साळवे यांनी अ‍ॅड. सुरेश माने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली होती.

तसंच एकबोटेंप्रमाणे भिडे यांच्याविरोधातही कारवाई करण्याची मागणी केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी भिडे यांच्याविरोधात तपास सुरू केला आहे. मात्र तो पूर्ण करण्यासाठी अधिक अवधी हवा आहे, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली. ही मागणी मान्य करत तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना 11 नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ दिली.

3. चांद्रयान 2 : विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी उरले फक्त 5 दिवस

विक्रम लँडरला चंद्रावरील एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरील 14 दिवसांसाठी काम करण्यासाठी बनविण्यात आलं होतं. यामुळे इस्रो आणि नासाकडे आता केवळ 5 दिवस उरले आहेत. ही बातमी लोकमतने दिली आहे.

विक्रम 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार होतं. मात्र, ते उलट्या भागावर कोसळल्याने संपर्क साधने कठीण बनलं आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, मातीमध्ये अँटेना अडकल्याने हे प्रयत्न फोल ठरले आहेत.

भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-2 योजनेवर साऱ्या जगाच्या नजरा होत्या. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच एखादे यान उतरणार होते. मात्र, पृष्ठभागापासून अवघ्या 2 किमीवर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने या योजनेला काहीसा धक्का बसला आहे.

4. हेल्मेटशिवाय गाडी चालवणाऱ्या 43,600 लोकांचा 2018मध्ये मृत्यू

2018 या एका वर्षात जवळपास 44 हजार लोकांचा हेल्मेट न घालता गाडी चालवल्यामुळे मृत्यू झाला आहे. 2017 च्या तुलनेत हा आकडा 21 टक्क्यांनी वाढला आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. तसंच मागे बसलेल्या व्यक्तींच्या मृत्यूचा आकडा 15,360 इतका आहे.

नुकताच केंद्र सरकारने हेल्मेटशिवाय गाडी चालवण्याचा दंड वाढवून 1000 इतका केला आहे.

5. दलित तरुणाचे कथितरित्या ऑनर किलिंग

दुसऱ्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून एका २० वर्षीय तरुणाला जिवंत जाळण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशमधल्या हरदोईमध्ये घडली आहे. यासंबंधित वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

ही माहिती समजल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आजारी असलेल्या मृत तरुणाच्या आईचाही मृत्यू झाला. हा प्रकार ऑनल किलिंगचा असल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अभिषेक उर्फ मोनू (वय २०) असं मृत तरुणाचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील भाडेसा भागात राहत होता. त्याचे त्याच भागातील एका तरुणीशी गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

संबंधित तरुणीला भेटून घरी जात असताना तिच्या नातेवाइकांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातून वाद वाढला आणि मुलीच्या नातेवाइकांनी त्याला एका घरात डांबले आणि घरावर रॉकेल टाकून आग लावली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)