You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार म्हणतात, 'पळपुट्यांचा समाचार जनताच घेईल', #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. पळपुट्यांचा समाचार जनताच घेईल: शरद पवार
"सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निवडून येऊन पळपुटेपणाची भूमिका घेणाऱ्यांचा समाचार जनताच घेईल," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार बोलत होते.
ते म्हणाले, "काहीजण चुकीच्या वाटेवर जातील, असं वाटलं नव्हतं. पण, तसं झालं आहे. आता त्याची चिंता करण्याचं कारण नाही. महाराष्ट्र हे स्वाभिमानी लोकांचं राज्य आहे. येथील लोक स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत. म्हणूनच ही जनता जेव्हा मतदान करेल, तेव्हा पळपुट्यांचा नक्कीच समाचार घेईल. दिल्लीश्वरांकडून अपमानास्पद वागणूक घेऊन ज्यांनी तह केला त्यांना धडा मिळेल."
"राज्यात दरवर्षी 16 हजार शेतकरी आत्महत्या करत आहेत. हातचे रोजगारही जात आहेत. ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली, त्यांच्या पदराखाली जाण्याचा नाही, तर त्यांच्यासोबत संघर्ष करण्याचा हा काळ आहे," असंही ते म्हणाले.
2. शेतीसाठीचा पैसा योग्यप्रकारे वापरला जातोय का? - RBI
शेतीसाठी दिला जाणारा पैसा योग्य हातात पोहोचतोय का, असा प्रश्न 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'नं (RBI) विचारला आहे. बिझनेस स्टँडर्डनं ही बातमी दिली आहे.
काही राज्यांमध्ये कृषी क्षेत्राला केला जाणारा पतपुरवठा हा या क्षेत्रातील सकल उत्पन्नाच्या तुलनेत जास्त होता, असं RBIच्या इंटर्नल वर्किंग ग्रुपच्या अहवालातून समोर आलं आहे.
कृषीसाठी केला जाणारा पतपुरवठा इतर क्षेत्रांमध्ये वळवण्यात आला आहे, असं यातून निदर्शनास येतं. तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पंजाब या राज्यांचा या प्रकारात समावेश होत असल्याचं बातमीत म्हटलं आहे.
3. देशाच्या मॅपिंगसाठी 300 ड्रोनचा वापर
देशाचं मॅपिंग करण्यासाठी 'सर्व्हे ऑफ इंडिया' पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करणार आहे. यासाठी संस्था 300 ड्रोन वापरणार आहे, द हिंदूनं ही बातमी दिली आहे.
"जमिनीचे चांगल्या दर्जाचे नकाशे प्रदान करण्याचं आमचं ध्येय आहे," असं संस्थेचे संचालक गिरीश कुमार यांनी म्हटलं आहे.
पुढच्या 2 वर्षांत देशाच्या 75 टक्के भौगोलिक क्षेत्राचं मॅपिंग करण्याचं संस्थेचं उद्दिष्ट आहे. यासाठी 300 ड्रोन वापरण्यात येणार असून सध्या 30 ड्रोनच्या साहाय्याननं प्रात्यक्षिकं केली जात आहेत.
4. विरोधकांचं महत्त्व कमी झालं, तर राजकर्ता बेफामपणे वागतो : संजय राऊत
या देशात लोकशाही आणि स्वतंत्र्य टिकवायचं असेल, तर विरोधी पक्षांचं महत्व कमी करून चालणार नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं महत्व कमी झालं, तर राजकर्ता हा बेफामपणे वागतो, असं मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
ते म्हणाले, "राजकरणात वैचारिक निष्ठेचा स्तर सांभाळावा लागतो. भौतिक गोष्टींसाठी आणि ईडी, सीबीआय चौकशीसाठी पक्ष बदलणाऱ्या लोकांवर बारीक लक्ष ठेवावं लागतं. 24 तासात 24 मिनिटांत मत परिवर्तन, मन परिवर्तन होणं, पक्ष बदलणं यावर संशोधन झालं पाहिजे."
"सध्याचं राजकारण हे कपडे बदलण्याइतकं सोपं झालं आहे. मात्र आमच्याकडे माणसं पारखून घेतली जात आहेत," ते पुढे म्हणाले.
5. शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा
उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासह 52 जणांवर फसवणूक आणि शेतकर्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
जवळपास 5 महिन्यांनंतर उस्मानाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महत्येपूर्वी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली. त्यातून जमिनीवर जप्ती आली. या सर्व त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते. पोलिसांनी चौकशीनंतर निबाळकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
हेही वाचलंत का?
- भाजपप्रवेशासाठी 'ईडी'चा दबाव, शरद पवार यांच्या आरोपात किती तथ्य?
- जनतेचे 'महाराज' की 'गांभीर्य नसलेला राजकारणी'?
- राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याबाबत रामराजे नाईक निंबाळकरांचा सस्पेन्स कायम
- भास्कर जाधव : 2004 मध्ये मातोश्रीवर ताटकळत ठेवल्यानंतर सोडली होती शिवसेना
- हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरानंतर इंदापूर मतदारासंघातली 'फाइट' कशी होईल?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)