You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चांद्रयान 2 : विक्रमचं ठिकाण सापडलं, संपर्क मात्र अजूनही नाही- इस्रो प्रमुख के. सिवन
चंद्रभूमीवर पोहोचण्यास अवघ्या काही मिनिटांचा अवधी असताना 'चांद्रयान 2' च्या मून लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला होता. मात्र, आता विक्रम मून लँडरचं ठिकाणी सापडलंय. इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी याबाबत माहिती दिली.
"आम्हाला विक्रम मून लँडरचं चंद्रावरील ठिकाण सापडलंय आणि ऑर्बिटरनं लँडरची थर्मल इमेजही घेतलीय. मात्र अद्याप मून लँडरशी संपर्क झाला नाहीय. आम्ही संपर्कासाठी प्रयत्न करतोय. लवकरच संपर्क होईल." असं इस्रो प्रमुख के सिवन यांनी सांगितलं.
दरम्यान, चांद्रयान-2 मोहिमेचं यश अगदी टप्प्यात दिसत असताना हिरमोड झाला. लँडर विक्रमचा ग्राउंड सेंटरशी संपर्क तुटला. यामागच्या कारणांचा आता शोध सुरू झाला आहे. या लँडरच्या सेंट्रल इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला असावा, असा अंदाज स्पेस कमिशनच्या एका माजी सदस्याने व्यक्त केला आहे.
चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किमी अंतरावर असताना लँडरचा ग्राउंड स्टेशनशी संपर्क तुटला, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी शनिवारी पहाटे दिली. त्यानंतर इस्रोकडून कुठलंही अधिकृत निवेदन देण्यात आलेलं नाही.
दरम्यान, बीबीसीच्या इम्रान कुरेशी यांनी लँडरशी संपर्क का तुटला, याविषयी तज्ज्ञांशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न केला -
स्पेस कमिशनचे माजी सदस्य प्रा. रोड्डम नरसिंहा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "सेंट्रल इंजिनमध्ये काहीतरी बिघाड हे अपयशाचं संभाव्य कारण असू शकतं. या इंजिनमधून आवश्यक दाब निर्माण होत नव्हता. त्यामुळे लँडरचा जेवढा कमी वेग होता, तेवढा कमी होऊ शकला नाही. त्यामुळेच संपर्क तुटला असण्याची शक्यता आहे. तसंच लँडरचंही नुकसान झालं असण्याची दाट शक्यता आहे."
लँडरचं सॉफ्ट लँडिंग अंतिम टप्प्यात असताना लाईव्ह स्क्रीनवर दिसणारा लँडरचा दर्शक असणारा वक्र ज्या पद्धतीने खाली आला, त्यावर आपलं 'संभाव्य स्पष्टीकरण' आधारित असल्याचं प्राध्यापक नरसिंहा जोर देऊन सांगतात. लँडिंगच्या अंतिम टप्प्यात वेळेनुसार कशापद्धतीने लँडर आपल्या उंचीवरून खाली आला, हे तो वक्र दर्शवत होता.
ते पुढे सांगतात, "लँडरची हालचाल दाखवणारी रेष निश्चित केलेल्या सीमेच्या आता असती तर याचा अर्थ सर्व सुरळित सुरू आहे. मात्र, जे मी पाहिलं त्यानुसार लँडरने दोन तृतीयांश मार्ग योजनेनुसारच पार केला. त्यानंतर लँडरच्या रेषेने सीमारेषा ओलांडली. त्यानंतर सरळ रेष दिसली आणि त्यानंतर तर सीमेच्या पलिकडे गेली."
प्रा. नरसिंहा म्हणाले, "संभाव्य स्पष्टीकरण असं असू शकतं की काहीतरी गडबड झाली आणि लँडर कमी वेगाने म्हणजे हळूहळू खाली येण्याऐवजी अधिक वेगाने खाली कोसळू लागलं. चंद्राच्या पृष्ठभागाजवळ आल्यावर लँडर 2 मीटर/सेकंद या वेगाने खाली उतरणं अपेक्षित होतं. नाहीतर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणने त्याला वेगाने खाली ओढले असते."
शनिवारी मध्यरात्री 1.38 मिनिटांनी काउंटडाउन सुरु झालं त्यावेळी लँडरचा वेग 1640 मीटर/सेकंद इतका होता. सुरुवातीच्या रफ ब्रेकिंग आणि फाईन ब्रेकिंग हे दोन टप्पे पार करेपर्यंत लँडर सुरळीत काम करत होतं. 'हॉवरिंग'च्या टप्प्यात असताना लाईव्ह स्क्रीनवरचा वक्र नियोजित मार्गाच्या बाहेर गेला.
मूळ योजनेनुसार लँडरला चंद्रावरच्या दोन मोठ्या खड्ड्यांपैकी (क्रेटर) एकाची निवड करायची होती. यानंतर लँडरचं दार उघडून त्यातून प्रज्ञान हे रोव्हर बाहेर येणार होतं. हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार होतं. चंद्रावर विशेषतः चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आणि धातूच्या अस्तित्वाचे पुरावे या रोव्हरवर असणाऱ्या सेंसरच्या माध्यमातून गोळा करण्यात येणार होते.
ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये न्यूक्लिअर अँड स्पेस इनिशिएटिव्हच्या प्रमुख डॉ. राजेश्वरी गोपालन देखील लाईव्ह स्क्रिनवर लँडरच्या हालचाली बघत होत्या. ज्यावेळी वक्र आपल्या मार्गावरून भरकटला तेव्हा त्यांनादेखील प्रा. नरसिंहांप्रमाणेच काहीतरी गडबड झाल्याची शंका आली.
त्या म्हणतात, "संभाव्य कारण असंही असू शकतं की अंतराळ यानाच्या चार टोकांवर असलेल्या चार इंजिनांनी अर्धवटच काम केलं असावं. एक शंका अशीही आहे की मुख्य इंजिनमध्ये बिघाड झाला असावा आणि ते सुरूच झालं नसेल."
त्या म्हणतात, "कुठल्याही माहितीच्या अभावी ठोस निष्कर्ष काढणं कठीण आहे. मात्र, स्क्रीनवर दिसणाऱ्या वक्रावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की काहीतरी गडबड झाली. दुसरी एक शक्यता अशी आहे की जेव्हा तुम्ही अधिक वेगाने लँडिंग करता तेव्हा खूप धुराळा उडतो. या धुराळ्यामुळेदेखील गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळयान हादरतं. मात्र, यापेक्षाही इंजिनामध्ये बिघाड झाला असण्याची शक्यता अधिक आहे."
डेटा विश्लेषणाला वेळ लागेल आणि सध्याच्या समस्येचं निराकरण होत नाही तोवर पुढची मोहीम राबवता येणार नाही. त्यामुळे पुढच्या मोहिमेलाही वेळ लागेल, असं प्रा. नरसिंहा यांना वाटतं.
डॉ. राजगोपालन यांनी सांगितलं की चांद्रयान-2 चं ऑर्बिटर पुढचं वर्षभर तरी काम करेल आणि चंद्रावरची माहिती गोळा करून ग्राउंड स्टेशनवर पाठवेल. त्या म्हणतात, "चंद्राच्या पृष्ठभागाच्या अभ्यासासाठी ही महत्त्वाची पायरी असणार आहे."
मात्र, नासाच्या जेट प्रपल्शन लेबोरेटरीमध्ये (JPL) मिशन इंटरफेस मॅनेजर डॉ. आलोक चॅटर्जी मानतात, "ज्या पद्धतीने तो खाली आला त्यावरून त्याच्या प्रपल्शनमध्ये काहीतरी गडबड झाली असावी."
डॉ. चॅटर्जी यांच्यानुसार हे तेव्हा होतं जेव्हा चारपैकी एक किंवा दोन इंजिनांमध्ये बिघाड होतो.
ते म्हणतात, "2.1 किमी अंतरापर्यंत सर्व चारही इंजित काम करत होते. लँडर पृष्ठभागाच्या 400 मीटर जवळ आल्यावर सेंट्रल इंजिन सुरू करतात. पृष्ठभागावर पोहोचेपर्यंत सर्वच्या सर्व चारही इंजिन सुरू ठेवले तर पृष्ठभागावरच्या मातीमुळे समस्या उद्भवू शकतात. सेंट्रल इंजिन व्हर्टिकल लँडिंग प्वाईंटवर ऑन करायला हवं."
डॉ. चॅटर्जी 2009साली चांद्रयान-1ने पाठवलेल्या छायाचित्रांच्या मदतीने चंद्रावर पाण्याचा शोध घेणाऱ्या पथकाचे सदस्य होते.
नासाच्या मून मिनरोलॉजी मॅपर किंवा एम 3 पेलोडने हे पुरावे गोळा केले होते. रिमोट सेंसरमुळे इस्रोला याचा अंदाज होताच. मात्र, नासाच्या जेल प्रपल्शन लेबोरेटरीने चंद्रावर पाणी असण्यावर शिक्कामोर्तब केलं होतं आणि त्यानंतर त्याची अधिकृत घोषणाही केली होती.
डॉ. आलोक चॅटर्जी म्हणतात की इस्रोने तपास केल्यावरच लँडर खाली का कोसळलं याचं नेमकं कारण कळू शकेल. जोवर त्याच्या टेलिमेट्री सिस्टिमचा ग्राउंड स्टेशनशी संपर्क असेल तोवरचा डेटा त्याने पाठवला असेल.
असं असलं तरी इस्रोच्या कुठल्याच शास्त्रज्ञाने किंवा माजी शास्त्रज्ञाने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात आलेल्या अपयशाच्या कारणांवर चर्चा केलेली नाही. मात्र, वैज्ञानिकांना हे चांगलंच ठाऊक आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा सक्सेस रेट अत्यल्प म्हणजे केवळ 35% आहे.
"एक संस्था म्हणून इस्रोला यापूर्वीही अशा प्रकारच्या अपयशांचा सामना करावा लागला आहे", अशी माहिती इस्रोच्या एका माजी शास्त्रज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
मात्र, हेदेखील तेवढंच खरं आहे की भूतकाळातल्या प्रत्येक अपयशानंतर इस्रोने त्यावर दिर्घकाळ टिकणारे उपाय शोधले आणि देशासाठीची उद्दिष्टं पूर्ण केले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)