You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चांद्रयान-2: इस्रोचं नासाकडूनही कौतुक – तुमचा अंतराळ संशोधनाचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. 'नासा'कडून 'इस्रो'चं कौतुक
भारताच्या 'चांद्रयान 2' मोहिमेच्या मून लँडर 'विक्रम'शी संपर्क तुटल्यानंतर भारतासह जगभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं मनौधैर्य वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'नंही 'इस्रो'चं कौतुक केलंय. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.
"अंतराळ एक आव्हानच आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचं 'चांद्रयान 2' मिशनबद्दल इस्रोचं आम्ही कौतुक करतो. तुमचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आता सूर्यमालेच्या संशोधनात एकत्रित काम करण्याची आम्ही वाट पाहत आहोत," असं नासानं ट्वीट करून म्हटलंय.
नासा ही अंतराळ संशोधनात जगातील अव्वल दर्जाची संस्था मानली जाते. त्यामुळं त्यांच्याकडून भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला मिळालेली पोचपावती आणि धैर्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय.
दुसरीकडे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या आपण खंबीरपणे पाठीशी असल्याचं सांगितलंय.
2. काश्मिरात महिन्याभरात एकही गोळी झाडली गेली नाही : अजित डोवाल
कलम 370 हटवल्यानंतर गेल्या महिन्याभरात काश्मीरमध्ये एकही गोळी झाडली गेली नाही. मोठ्या कालावधीनंतर काश्मीरमधील महिना शांततेत गेला, असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर अजित डोवाल म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.
अजित डोवाल यांनी काश्मीरमधील सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी दिल्लीत माध्यमांशी खास संवाद साधला.
दुसरीकडे, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विमानाला आपला एअरस्पेस वापरण्यास पाकिस्तानने परवानगी दिली नाकारली. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आईसलँड, स्लोव्हेनिया आणि स्वित्झर्लंड या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी त्यांच्या विमानाला पाकिस्तानच्या एअरस्पेसचा वापर करायचा होता.
काश्मीरमधील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन भारताच्या राष्ट्रपतींना एअरस्पेस वापरण्यास नकार देण्याचा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतलाय, असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितलं.
3. पूर्व विदर्भात पूरस्थिती, भामरागडमधील अनेक गावं पाण्याखाली
पूर्व विदर्भात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरपरिस्थिती कायम आहे. गडचिरोलीतल्या भारागडमधील गावांमध्ये पाणी शिरल्यानं 500 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, अशी बातमी लोकसत्तानं दिली आहे.
गोसेखुर्द, चिचडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्यानं आणि वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
गडचिरोलीतील वैनगंगा, पर्लकोटा, इंद्रावती या प्रमुख नद्यांसह अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे लोकांनी सतर्क राहावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय.
चंद्रपुरातील ब्रम्हपुरी, नागभीड आणि पोंभुर्णा या तालुक्यांनाही पावसाचा जोरदार फटका बसला आहे.
4. युतीचा फॉर्म्युला अजून ठरला नाही : गिरीश महाजन
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेत युतीची चर्चा सुरू झाली असली, तर जागावाटपासाठी 50-50चा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही, असं भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या दाव्याला महाजनांनी खोटं पाडलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठरवतील, तोच युतीचा फॉर्म्युला असेल, त्याबाबत कुणीही मत मांडण्याची गरज नाही, असाही टोला गिरीश महाजनांनी राऊतांना लगावला.
5. त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. धारूरकरांचा राजीनामा
छपाई कंत्राटासाठी लाच घेतल्याचा आरोप झाल्यानंतर त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर यांनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
'व्हॅनगार्ड न्यूज' या स्थानिक वृत्तवाहिनीनं स्टिंग ऑपरेशन करून डॉ. धारूरकरांनी लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. 60 लाख रुपयांच्या छपाई कंत्राटातले 10 टक्के रक्कम डॉ. धारूरकर मागत असल्याचे या स्टिंगमधून समोर आलं होतं.
डॉ. धारूरकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख आहेत. व्याख्याते म्हणूनही ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.
हेही वाचलंत का?
चांद्रयानला नेमकं काय झालं? पाहा व्हीडिओ
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)