किरण नगरकर: सामान्य माणसांची असामान्य गोष्ट सांगणारा लेखक

फोटो स्रोत, Getty Images
- Author, चेतन डांगे
- Role, लेखक, बीबीसी मराठीसाठी
(प्रसिद्ध लेखक किरण नगरकर यांचं 5 सप्टेंबर रोजी निधन झालं. या पार्श्वभूमीवर त्यांचा सहवास लाभलेल्या चेतन डांगे यांनी नगरकरांच्या आठवणींना दिलेला उजाळा)
किरण नगरकर यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्यावर मागच्या वर्षात झालेले आरोप, त्यांची जीवनशैली आणि कारकिर्दीमधले एकूण चढ-उतार. हे सगळं एका फ्रेममध्ये पाहाताना त्यांच्या सात सक्कं त्रेचाळीस या कांदबरीमधलं, 'यू फाईंड द रूम अनटायडी?' हे एक वाक्य आज त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं रूपक बनून गेलं असं वाटतं.
त्यांनी लिहिलेली पुस्तकं, पात्रं, त्यांच्या वागण्या-बोलण्याचा लहेजा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांची व्हल्नरॅबिलीटी, ही नेहमीच इतकी प्रखरपणे जाणवली आहे की त्यांच्यात अडकून तर राहायला होतंच पण पुढचे कैक दिवस ही पात्र आपल्या रोजच्या जगण्याशी रिलेट होतात. सात सक्कं त्रेचाळीसचा नायक कुशंक असेल, रावन अँड एडीमधले रावन आणि एडी असतील किंवा ककल्डमधले महाराज असतील. ही सगळी पात्रं सुरुवातीला सामान्य वाटत असूनही गोष्ट संपता संपता असामान्य कशी बनून जातात आपल्याला कळतही नाही.
नगरकर स्वतः जसे खऱ्या आयुष्यात होते तशीच छटा त्यांच्या रचलेल्या पात्रांमध्ये दिसते. इतकं आत्मीयतेने आणि स्पष्टपणे ते त्यांच्या पात्रांविषयी बोलायचे की ऐकणाऱ्याला असंही वाटू शकायचं की हा प्रसंग त्यांच्या खऱ्या आयुष्यातच घडला की काय.
सात सक्कं त्रेचाळीसमधलाच एक प्रसंग या क्षणी आठवतो. जेव्हा कुशंक हा नायक त्याच्या लग्न झालेल्या मैत्रिणीच्या घरात बरेच दिवस राहत असतो आणि तिचा नवरा काही बोलत नाही, तेव्हा कुशंक आणि त्याची मैत्रिण आरोती यांच्यात एक छोटं संभाषण होतं.
Kushank: Is he worried that I am in love with you?
Aaroti: Are you?
Kushank: I don't know
Aaroti: Maybe he doesn't either.
हे संभाषण जेव्हा मी वाचलं तेव्हा मलाही हेच वाटलं की हा प्रसंग किरण सरांच्या आयुष्यात येऊन गेला असेल. इतकी खरी आणि व्हल्नरेबल पात्रं उभी करायला लेखकाने स्वतःशी किती खरं राहायला हवं याचा आपण एक ढोबळ का होईना पण अंदाज लावू शकतो.
अनेक वेळा असं व्हायचं की सर 'भेट रे' म्हणून सांगायचे. त्यांना उतरत्या वयात कष्ट नको म्हणून मी त्यांना नेहमी सांगायचो की मी घरी येऊन भेटतो. सर ताबडतोब नकार द्यायचे. याचं कारण मला खूप उशीरा कळलं. सरांनीच सांगितलं, "अरे मी माझ्या एका मैत्रिणीकडे राहतो. मी तुला भेटायला तिची प्रायव्हसी का गृहित धरू?"
माणसं सांभाळणारा माणूस
भेटल्यावरही सरांनी मला कधीच स्वतःबदद्ल असं खुलून सांगितलं नाही. पण माझ्या आयुष्याच काय चालू आहे याची मात्र त्यांना ओढ होती जी त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. खूप दिवसांनंतर जाणवलं की अशीच काहीशी ओढ त्यांना त्यांच्या पात्रांची होती. म्हणूनच तर तू पात्र आणि त्यांच्या जीवनातले प्रसंग इतके खरे वाटून जातात.

फोटो स्रोत, Getty Images
नगरकरांनी जितकी आपली पात्रं सांभाळली तितकाच जीव लावून त्यांनी आपली माणसंही सांभाळली. त्या माणसांचं ऐकलं, समोर असलेल्या माणसाच्या वयात शिरून त्यांच्या मॅच्युरिटीने त्यांना समजून घेण्याचे प्रयत्न केले. कुणाच्याही आयुष्यात अत्यंत लक्ष देऊन त्यांचं ऐकणारी माणसं मुठभरच असतात.
किरण सरांचा नंबर या ऐकून घेणाऱ्या माणसांच्या यादीत पहिला होता. शेजारी बसून एखाद्याचं बोलणं ऐकून घेणं आणि त्यातल्या मूळ गोष्टींविषयी अजून खोल उतरणं हा त्यांचा स्वभावच होता. त्यांच्याशी केलेलं साधं संभाषण समोरच्या माणसाला एक वेगळीच दिशा दाखवून द्यायचं.
लिखाणाची स्वतंत्र शैली
ककल्ड ही त्यांची कादंबरी मी 2011 साली वाचली. मनात पहिला विचार आला की, 'हे आपल्याला का नाही सुचलं'? जी माणसं लिहितात त्यांची प्रत्येकाची एक शैली असते. कधी ती शैली आत्मसात करण्याजोगी असते पण करू नये, कारण उधार घेतलेल्या शैलीतून नवीन लेखक निर्माण होणं ही जवळजवळ अशक्य गोष्ट असते. पण भाव? एखाद्या लेखकाने मांडलेला भाव, कुठल्या दुसऱ्या लेखकाला, दुसऱ्याच प्रसंगातून जर उभा करता आला तर तो नक्की करावा.
ककल्ड वाचलं तेव्हा माझं काहीसं असं झालेलं मला लख्ख आठवतं. म्हणजे किरण सरांच्या लिखाणाच्या शैलीपेक्षा त्यांनी पुस्तकात जो भाव टिकवून ठेवला होता, त्याचा मला जास्त मत्सर वाटला.
2015 साली फोर्टच्या मॅक्स म्युलर भवनमध्ये त्यांच्या कुठल्याशा पुस्तकातं प्रकाशन होतं. त्यांनी आवर्जून मला दोन दिवस आधी फोन केला आणि येण्याचा आग्रहही धरला. तिथे पोहचून कार्यक्रम वगैरे संपवून जेव्हा सगळी माणसं पांगली तेव्हा ते माझ्याजवळ आले.
माझ्या खांद्यावर हात ठेवून मनापासून माझ्या पुस्तकाविषयी बोलू लागले. मला न राहून वाटलंच, की आत्ताच यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालंय आणि यांच्या डोक्यात माझं पुस्तकं कसं? इतकं आश्चर्य मला फार कमी वेळा वाटलं आहे. पुढे असंही म्हणाले की, "I wanted to give you a small ice-cream treat, but I am sure these people won't let me leave this place until quite some time."
मीच ओशाळलो तेव्हा.
त्याच वर्षी त्यांनी मला असाच एक दिवशी फोन केला आणि म्हणाले, तुला सात सक्कं त्रेचाळीसविषयी बोलायचंय. मी विचारलं कुठे तर म्हणाले टाईम्स लिटरेचर फेस्टमध्ये. माझ्यावर त्यांनी त्यांच्या एकमेव मराठी कादंबरीची पूर्ण जबाबदारी टाकली. मी अर्थातच कार्यक्रमात बोललो. प्रेक्षकांमधून कादंबरीविषयी काही प्रश्नही आले. मी त्यांना उत्तरं दिली. हे सगळं होत असताना सर मागे बसून पाहात होते.

फोटो स्रोत, Chetan Dange
कदाचित त्यांना आधीच माहीत होतं की मी काय बोलणार आहे. माझं बोलणं संपवून त्यांच्या शेजारी जाऊन बसलो तर ते 'एक्सलंट' एवढंच म्हणाले. तेव्हाही मला वाटलं की आपल्या पुस्तकाची जबाबदारी कोणी अशा मुलाला देतं, तेही इतक्या मोठ्या मंचावर? नंतर खूप उशिरा मला जाणवलं की ज्या पुस्तकावर अनाकलनीय असल्याचा आरोप झाला होता ते पुस्तक कदाचित मी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वाचलं होतं आणि समजूनही घेतलं होतं.
'बोलायचं राहून गेलं'
किरण सरांची आणि माझी मैत्रीच तशी होती. मी बरेच दिवस त्यांना फोन केला नाही तर ते स्वतःहून करायचे. "हाय, बिझी आहेस का?" हे त्यांचं ठरलेलं पहिलं वाक्य. या वाक्यावर मला ओशाळल्यासारखं व्हायचं. त्यांचा सहवास लाभला ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पण नशीब सगळंच व्यवस्थित हातता आणून देत नसतं.
काही दिवसांपूर्वी सरांचा फोन आला. मला माझ्या मोबाइलवर त्यांचं नाव दिसलं. पण मी कोणत्या तरी कामात असल्यामुळे फोन उचलू शकलो नाही. म्हटलं नंतर फोन करू सविस्तर बोलू. मग कामात अडकल्यामुळे विसरलो. त्यांना फोन करू शकलो नाही, आणि आज ते गेल्याचं कळलं. त्यांच्या शेवटच्या दिवसात, ते बोलवत असताना त्यांना भेटणं माझ्या नशिबात नव्हतं.
ही गोष्ट कुठेतरी नेहमी लक्षात राहाणार माझ्या. हे सगळंच इतकं खरं आणि रोजच्या जगण्यातलं आहे की किरण सरांनी नक्कीच कुठेतरी हा प्रसंग त्यांच्या एखाद्या पुस्तकात वापरला असता असं मला वाटतं. त्यांची पात्रं जशी होती अगदी तसाच हा प्रसंग आमच्या आयुष्यात घडला. असेच काही खरे प्रसंग त्यांच्या पुस्तकांमध्ये आपल्याला नेहमीच आढळून आले आहेत.
(चेतन डांगे हे कवी, नाटककार, चित्रपट-मालिका लेखक आहेत. या लेखात मांडलेले विचार हे त्यांचे वैयक्तिक आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








