महाराष्ट्रातील गडकिल्ले लग्नसमारंभ, हॉटेलिंगसाठी भाडेतत्वावर देणार ही अफवा- जयकुमार रावल

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे, अशी बातमी माध्यमांमध्ये आली आहे. पण या बातमीनंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

पण महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या बातमीत तथ्य नसून ती अफवा आहे, असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) राज्यातील 25 किल्ले रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी भाडेतत्वावर देण्यासाठी सरकारचा मानस आहे. पर्यटन क्षेत्रातील खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं या बातम्यांमध्ये म्हटलं आहे.

यावर टीका करताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, "जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं! केवळ संतापजनक! विकास हवा पण गडकोटांचं पावित्र्य राखूनच!"

तर सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे की, "महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचं रिसॉर्ट व हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठाम विरोध करतो. राज्यातील किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन होणे गरजेचे आहे."

ही तर अफवा - जयकुमार रावल

"गड किल्ले लग्न समारंभासाठी किंवा हॉटेल व्यवसायासाठी भाड्याने देण्याच्या बातम्या म्हणजे अफवा आहेत. विरोधी पक्षाचा हा डाव आहे," असं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"राज्यातील 150 ते 200 किल्ले असे आहेत, जे भग्न अवस्थेत आहेत, त्यांचा विकास करायचा सरकारचं धोरण आहे. जेणेकरून या सर्व किल्ल्यांची देखभाल करता येईल. बाकी सगळ्या राज्यांनी अशीच योजना राबवली आहे," त्यांनी पुढे सांगितलं.

सरकारनं घेतलेल्या मीटिंगमध्ये काय झालं, यावर पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितलं की, "गडकिल्ल्याच्या पायथ्याखाली आम्ही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी लागणारा निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही निधी उभारू आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ. जेणेकरून पर्यटन क्षेत्र म्हणून इथल्या सुविधांचा विकास होईल आणि किल्ला पाहणारे लोक त्याचा लाभ घेतील."

पण मग बातम्यांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या का आल्या असं विचारल्या नंतर ते म्हणाले, "ही लोकशाही आहे, माध्यमांनी काहीही छापलेलं असतं. आमच्या मीटिंगमध्ये नियमाला धरून जे झालं, ते तुम्हाला सांगितलं."

तर दुसरीकडे राज्याच्या पर्यटन सचिव विनीता सिंघल यांनी एक पत्रक काढून त्यात स्पष्ट केलं की, "राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग 1 आणि दुसरे वर्ग 2. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात."

वर्ग 1 च्या किल्ल्यांचं संवर्धनाचा एक स्वतंत्र कार्यक्रम केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल.

मात्र वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)