You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिक्षक दिन: सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. राधाकृष्णन हे भारताच्या उपराष्ट्रपतीपदी आणि राष्ट्रपतीपदी होते. पण त्याआधी ते भारताचे राजदूत होते.
त्यावेळचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.
सर्वपल्ली राधाकृष्णन चीनला गेले तेव्हा चीनचे नेते माओ यांनी आपल्या निवासस्थानी त्यांचा पाहुणचार केला. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं तेव्हा राधाकृष्णन यांनी माओ यांच्या गाल प्रेमाने थोपटले होते.
त्यांच्या या कृतीचं माओंना आश्चर्य वाटलं यावर माओ काही बोलायच्या आधीच राधाकृष्णन यांनी म्हटलं, "अध्यक्ष महोदय. तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका. असंच मी स्टालिन आणि पोप यांच्याबरोबरसुद्धा केलं आहे."
भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यादरम्यान चीनमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी बीबीसीचे प्रतिनिधी रेहान फजल यांना त्या भेटीबद्दल सांगितलं, "जेवण करताना माओ यांनी चॉपस्टिकच्या साहाय्यानं प्लेटमधील एक पदार्थ राधआकृष्णन यांच्या ताटात ठेवला. पण, राधाकृष्णन हे शाकाहारी आहे, याचा माओ यांना काही एक अंदाज नव्हता. राधाकृष्णन यांनीही माओ यांनी काही चुक केली, असं जाणवू दिलं नाही."
त्यावेळी राधाकृष्णन यांच्या बोटाला जखम झालेली होती. चीनच्या दौऱ्यापूर्वी कंबोडियाला गेले असताना कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे त्यांचा हात कारच्या दरवाजामध्ये अडकला होता आणि बोटाचं हाड मोडलं होतं. माओ यांनी हे बघितल्यानंतर डॉक्टरांना बोलावलं आणि राधाकृष्णन यांच्या बोटाची मलमपट्टी करून दिली.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुत्तानी या गावी झाला.
2. तिरुत्तानी गावात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. 1093 मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठात पुढचं शिक्षण पूर्ण केलं. कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी असा त्यांचा नावलौकिक होता.
3. वाचनाची त्यांना प्रचंड आवड होती. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.
4. त्यांचा वेदांचा विशेष अभ्यास होता. तत्त्वज्ञान या विषयात त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.
5. 1909 मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी पाच वर्ष अध्यापनाचं काम केलं. म्हैसूर इथं तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं.
6. 35व्या वर्षी जॉर्ज पंचम यांच्या 'चेअर ऑफ फिलॉसॉफी' या पदी विराजमान होण्याचा मान मिळवला.
7. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना 'नाईटहूड'ने सन्मानित केलं. ही बिरुदावली पटकावणारे सर्वपल्ली हे पहिले आशियाई व्यक्ती होते.
8. राधाकृष्णन यांनी आंध्र तसंच बनारस हिंदू विद्यापीठाचं कुलगुरूपद भूषवलं.
9. 1931 ते 1939 या आठ वर्षांच्या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताचं प्रतिनिधित्व केलं.
10. 1949 ते 1952 या कालावधीत ते रशियात भारताचे राजदूत होते.
11. रशियाहून परतल्यानंतर राधाकृष्णन यांनी 1952 ते 19652 या कालावधीत उपराष्ट्रपतीपद भूषवलं. 14 मे 1962 रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले.
12. 1954 मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च अशा 'भारतरत्न' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
13. राधाकृष्णन यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी 16 वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी 11 वेळा मानांकन मिळालं होतं.
14. माझा जन्मदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात यावा असे विचार सर्वपल्ली यांनी राष्ट्रपती असताना मांडले होते. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
15. 17 मे 1975 रोजी त्यांचं निधन झालं.
(वरील माहिती राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण समिती (NCER ) ने प्रसिद्ध केलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या व्यक्तीचित्रणावरून घेण्यात आली आहे. )
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)