You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रावसाहेब दानवे: भाजपमधून आम्हालाच बाहेर काढाल, एवढे येऊ नका #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:
1. भाजपमधील मेगाभरतीवर दानवे म्हणाले...
"भाजपमध्ये मेगाभरती चालू आहे. नुकतेच इतर पक्षातील चार आमदार भेटून गेले. त्यांना सांगितलं की, थोडं थांबा आणि प्रतीक्षा करा. एवढे येऊ नका की आम्हालाच काढून टाकाल," असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपमध्ये सध्या होत असलेल्या पक्षप्रवेशांवर लावला आहे. ही बातमी लोकसत्ताने प्रकाशित केली आहे.
ते म्हणाले, "भाजप सर्व समाजघटकांना स्थान देणारा पक्ष आहे. विधान परिषदेवर सहा सदस्य घेताना मराठा समाजातील राम रातोळीकर वगळता अन्य पाच सदस्य आम्ही बंजारा, कोळी, धनगर, ठाकूर आणि आगरी समाजातून घेतले. सरपंच, आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष आणि दोनदा केंद्रीय राज्यमंत्रिपद पक्षाने दिलं. राजकारणात अपेक्षा कधी संपत नसते म्हणून पक्षाने मला पंतप्रधान करायचे की काय?"
लोकसत्ताच्या या बातमीनुसार, दानवेंच्या या वकत्व्यावर सभागृहात 'मुख्यमंत्री व्हा', असा आवाज आला. त्यानंतर दानवे म्हणाले, "सध्या मुख्यमंत्री आपलेच आहेत आणि यापूर्वी मराठवाड्यातील मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत."
'पुन्हा एकदा मुख्यमंत्री जालना जिल्ह्याचा हवा,' असा आवाज आल्यावर दानवे हसत-हसत "पुढच्या काळात विचार करू," असे म्हणाले.
2. शरद पवार आर्थिक संकटावर बोलले...
भांडवली गुंतवणूक वाढत नाही, तोपर्यंत मंदीतून बाहेर पडणं अशक्य असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते.
"देशात निर्माण झालेल्या मंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका बसलाय. त्यामुळे मागील काही दिवसांत अनेक क्षेत्रात लोकांना कमी करण्याचा पर्याय अवलंबला जातोय. हे प्रमाण वाढत राहिलं तर अनेकांच्या हाताला कामच राहणार नाही. पर्यायाने देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही," अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.
ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
"सामान्य माणसाची खरेदी करण्याची ताकद वाढत नाही, तोपर्यंत व्यापार वाढत नाही. पर्यायाने व्यापार आणि उद्योग वाढवल्याशिवाय मंदीतून बाहेर पडणं शक्य होणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. सध्याच्या स्थितीत लोकांना कमी करण्यापेक्षा संबंधित उद्योग संस्थांनी स्वतःचा खर्च कमी करून या संकटाला सामोरं जावं," असं आवाहनही त्यांनी केलं.
3. अजित पवार अडचणीत
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या गैर व्यवहाराप्रकरणी पाच दिवसांत FIR नोंदवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने 22 ऑगस्ट रोजी पोलिसांना दिले होते. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सहा विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळल्या. त्याचबरोबर तातडीने सुनावणी करण्यासही नकार दिला आहे.
हिंदुस्थान टाईम्स मराठीने ही बातमी प्रकाशित केली आहे.
गुन्हा नोंदवण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश योग्यच होता, असं मतही न्यायालयानं नोंदवलं. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळांसह सुमारे 50 नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
4. चिदंबरम यांना तिहारला न पाठवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
INX मीडिया गैरव्यवहारप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने जर माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला तर त्यांना तिहार तुरुंगात पाठवू नये. त्याऐवजी त्यांना घरीच स्थानबद्ध करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, ही बातमी लोकमतने दिली आहे.
शुक्रवारी न्यायालयाने चिदंबरम यांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली होती. सीबीआयने ही कोठडी वाढवून मागितली होती. पण चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी ते 74 वर्षांचे असल्याने त्यांना घरच्या घरी स्थानबद्ध करता येऊ शकतं. यात काही समस्या नसावी, असा युक्तिवाद केला.
सर्वोच्च न्यायालयाने तिहारमध्ये चिदंबरम यांना न पाठवण्याचे आदेश दिले तर ट्रायल कोर्टात त्यांना जामीन न मिळाल्यास ते सीबीआय कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत राहतील, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
5. काश्मीरमधली संपर्कव्यवस्था बंद करणं आवश्यक होतं - परराष्ट्र मंत्री
कलम 370 रद्द करताना जम्मू-काश्मीरमधली संपर्कव्यवस्था बंद करणं आवश्यकच होतं, असं भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी सांगितलं.
बेल्जियमच्या ब्रसेल्समधील पॉलिटिको मासिकाशी बोलताना सक्रिय कट्टरतावाद्यांशी लढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.
या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचं जीवन प्रभावित होणार आहे हे माहीत होतं. पण दहशतवादी आणि त्यांच्या पोशिंद्यांचा संपर्काचे माध्यम बंद करून इतरांची संपर्कसाधने चालू ठेवणं शक्य नाही, असं जयशंकर म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)