Motor Vehicle Act 2019: वाहन नियम मोडल्यास दहापट दंड, नव्या सुधारणांसह कायदा लागू

वाहतूक पोलीस

फोटो स्रोत, Getty Images

तुम्ही गाडी चालवताना सीटबेल्ट लावला नसाल, तर आता 100 रूपयांऐवजी 1000 रूपये दंड भरावा लागेल आणि जर दुचाकी चालवताना हेल्मेट घातला नसेल, तर 100 ऐवजी 1000 रूपये दंड भरावा लागेल. शिवाय, वाहन परवानाही तीन महिन्यांसाठी रद्द केला जाईल.

केंद्र सरकारनं मोटार वाहन कायद्यात सुधारणा केल्या. नव्या सुधारणांसह मोटार वाहन (सुधारणा) कायदा एक सप्टेंबरपासून लागू करण्यात आलाय.

या कायद्यातील नव्या तरतुदींमुळं वाहन नियम तोडल्यास होणाऱ्या शिक्षा आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी

फोटो स्रोत, Getty Images

यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एएनआय वृत्तसेवा संस्थेशी बोलताना म्हटलं, "वाहतूक नियम मोडल्यास अधिकचा दंड ठोठावण्याचा निर्णय जनहितासाठीच घेतलाय. दंडाच्या रकमेत वाढ झाल्यानं अपघात कमी होतील. कारण लोक वाहन चालवताना अधिक सतर्क राहतील. शिवाय, सध्याच्या दंड हे जवळपास दशकभर जुने होते, त्यामुळं त्यात बदल करणंही आवश्यक होतंच."

मोटार वाहन कायद्यातील सुधारणेनुसार नव्या शिक्षा कोणत्या?

  • चारचाकी गाडी चालवताना सीटबेल्ट लावला नसल्यास आधी केवळ 100 रूपये दंड आकारला जात होता. आता हा दंड 1000 रूपये करण्यात आलाय.
  • दुचाकी चालवताना हेल्मेट घातला नसल्यास आधी केवळ 100 रूपये दंड आकारला जात होता. आता 1000 रूपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत वाहन परवाना रद्द करण्यता येईल.
  • अॅम्ब्युलन्ससारख्या आपत्कालीन वाहनांचा रस्ता अडवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षाही ठोठावल्या जातील. याआधी या गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा नव्हती.
  • वाहन चालवताना परवाना नसेल तर 5 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 3 महिन्यांचा तुरूंवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. हाच गुन्हा पुन्हा केल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा एक वर्षांची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होतील.
  • परवाना रद्द झाला असतानाही वाहन चालवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून अधिक किंवा 3 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
  • भरधाव गाडी चालवल्यास 5 हजार रूपये किंवा त्याहून अधिक किंवा 3 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
  • अल्पवयीन व्यक्तीनं गुन्हा केल्यास वाहनाच्या मालकाला दोषी ठरवलं जाईल आणि 25 हजार रूपये दंडासोबत 3 वर्षांचा तुरूंवास होईल. शिवाय, गाडीची नोंदणी एक वर्षासाठी रद्द केली जाईल. तसेच, अल्पवयीन आरोपी 25 वर्षांचा होईपर्यंत त्याला वाहन परवाना दिला जाणार नाही.
  • मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 6 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास 15 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
  • वाहन चालवताना सिग्नल तोडल्यास 10 हजार ते 5 हजार रूपये दंड किंवा 6-12 महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास 10 हजार रूपये दंड किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
  • मोठमोठ्यानं हॉर्न वाजवल्यास पहिल्यांदा एक हजार रूपयांचा दंड आणि पुन्हा हाच गुन्हा केल्यास 2 हजार रूपयांचा दंड आकारला जाईल. याआधी यासाठी शिक्षेची कोणतीही तरतूद नव्हती.
  • वाहनाला विमा संरक्षण नसल्यास दोन हजार रूपयांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास चार हजार रूपयांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
  • वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास, चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेकिंग केल्यास किंवा रस्त्याच्या विरूद्ध दिशेने वाहन चालवल्यास एक हजार ते पाच हजार रूपये दंड किंवा 6-12 महिने तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. हाच गुन्हा पुन्हा केल्यास 10 हजार रूपये दंड किंवा दोन वर्षांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.

मोटार वाहन कायद्यातील नव्या सुधारणांमुळं नियम कडक झाले असले, तरी त्यासोबत वाहन चालकांसाठी या कायद्यात काही समाधानकारक तरतुदीही करण्यात आल्या आहेत.

वाहन परवान्यासाठी अर्ज आणि वाहन नोंदणी आता राज्यातील कुठल्याही आरटीओमध्ये करता येईल. तसेच, वाहन परवान्याचं नूतनीकरण करायचं असल्यास वर्षभरात कधीही करू शकता. याआधी एक महिन्याच्या आतच वाहन परवान्याचं नूतनीकरण करणं बंधनकारक होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)