घरकुल घोटाळा: सुरेश जैन यांना सात वर्षांचा कारावास तर गुलाबराव देवकरांना पाच वर्षांची शिक्षा

सुरेश जैन

फोटो स्रोत, Shrikant FSuresh Dada Jain/facebook

फोटो कॅप्शन, सुरेश जैन
    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी, नाशिकहून

45 कोटींच्या जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह तत्कालीन नगरसेवक आदींसह 48 संशयित आरोपींना धुळे जिल्हा कोर्टाने दोषी ठरवले. जैन यांना 7 वर्षं कारावास आणि 100 कोटी रुपयांचा दंड, तर देवकर यांना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलं, "हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून राज्यस्तरावर याचे पडसाद उमटले. शिवाय या घोटाळ्यामुळे जळगाव महापालिका कर्जबाजारी झाली, त्यामुळे सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी."

काय आहे जळगाव घरकुल घोटाळा?

'घरकुल योजना' ही जळगाव महापालिकेची झोपडपट्टी निर्मूलन करण्यासाठी योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्याचा प्रस्ताव होता. जळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. ह्या योजनेत जळगाव शहरातील हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा ह्या वसाहतींचा समावेश होता.

11 हजार घरकुले बांधण्यासाठी एकूण 110 कोटी रुपये काढण्यात आले. घरकुले बांधण्याच्या कामास 1999 मध्ये सुरुवात झाली होती. सन 2001 मध्ये ह्या कामात गोंधळ असल्याचे समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार उघडकीला आले.

चौकशीत समोर आलेल्या बाबी

  • पालिकेनं घरकुलं ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती.
  • बिगरशेती परवानगी घेतली गेली नव्हती.
  • विशिष्ठ मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिले.
  • ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे 29 कोटी रुपये आगाऊ देण्यात आले.
  • ठेकेदारास विविध सवलती देण्यात आल्या.
  • ठेका देताना काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही.
  • योजनेच्या कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही
  • याच काळात पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून दिली गेली. --
  • संबंधिताला बिनव्याजी आगाऊ रक्कम वापरण्याची मुभा दिली गेल्याने पालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली.
सुरेश जैन आणि शरद पवार

फोटो स्रोत, Suresh Dada Jain/facebook

फोटो कॅप्शन, सुरेश जैन आणि शरद पवार

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ही बाब लक्षात आली. घोटाळ्याची गंभीरता लक्षात घेत दिनांक तीन फेब्रुवारी 2006 रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत 29 कोटी 59 लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार देण्यात आली. चौकशी सुरू असताना घोटाळ्याची व्याप्ती वाढत 45 कोटीच्या अपहार झाल्याचे निदर्शनास आले.

93 संशयितांवर दाखल करण्यात आला होता गुन्हा

डॉ. प्रवीण गेडाम यांच्या लक्षात हा गैरव्यवहार आल्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर 3 फेब्रुवारी 2006 रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 93 संशयितांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार 57 पैकी 53 आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सुरेश जैन आणि विलासराव देशमुख

फोटो स्रोत, Suresh Dada Jain/facebook

फोटो कॅप्शन, सुरेश जैन आणि विलासराव देशमुख

ह्या घोटाळ्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह खान्देश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, आर्किटेक्ट, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी अशा एकूण 93 जणांविरुद्ध तक्रार देण्यात आली होती.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाविषयी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर न्यायमूर्ती पी. बी. सावंत आयोग, सुधाकर जोशी आयोग, सोनी आयोग या तीन आयोगांमार्फत जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाची चौकशी झाली.

बडे नेते असल्याने अटक करण्यास टाळाटाळ....

घोटाळ्यांसंबंधी गुन्हा दाखल होऊनही आणि संशयितांचे जामीन अर्ज वेगवेगळ्या न्यायालयाने फेटाळूनही एप्रिल 2008 पर्यंत घरकुल गैरव्यवहारातील संशयितांना अटक झाली नव्हती. संशयितांचे राजकीय वजन, त्यांचा दबाव, पोलीस अधिकाऱ्यांची तपास करताना होत असलेली दफ्तर दिरंगाई, तपासी अधिकाऱ्यांच्या बदल्या यामुळे सहा वर्षे हा तपास प्रगती करू शकला नव्हता.

एकनाथ खडसे आणि सुरेश जैन

फोटो स्रोत, Suresh Dada Jain/facebook

फोटो कॅप्शन, एकनाथ खडसे आणि सुरेश जैन

जळगाव पालिकेतील घरकुल घोटाळ्यातील गैरव्यवहाराचा विषय तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उचलून धरल्यानंतर या प्रकरणात कारवाई होऊन अटकसत्र सुरू झाले. याप्रकरणी सुरेश जैन यांना 11 मार्च 2012 ला अटक झाली होती. या प्रकरणात साडेचार वर्षे कारागृहात असलेले सुरेश जैन यांनी शिक्षेतला बराच काळ आजारपणाच्या कारणासाठी विविध खासगी व सरकारी रुग्णालयात काढला होता. नंतर त्यांची अंतरिम जामिनावर सुटका झाली.

राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर हे देखील तीन वर्ष कारागृहात होते. सध्या जामिनावर आहेत. 2014 मध्ये सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांनी विधानसभा निवडणूक कारागृहातून लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच गुलाबराव देवकर यांचा 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)