You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यावरून दिल्ली विद्यापीठात वाद जाणून घ्या
दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.
विद्यापीठाच्या आवारात अभाविपने बसवलेल्या पुतळ्यावरून अभाविप आणि NSUI मध्ये वाद उफाळून आला आहे. अभाविपनं दिल्ली विद्यापीठाच्या आवारात विनायक दामोदर सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या प्रतिमा असलेला पुतळा बसवला.
या पुतळ्याला विरोध करत NSUI नं सावरकरांच्या प्रतिमेला काळं फासलं. त्याचवेळी पुतळ्यावरील सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंहांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला.
दिल्ली विद्यापीठात नेमकं काय घडलं?
अभाविपनं 20 ऑगस्ट रोजी पहाटे दिल्ली विद्यापीठाच्या आवारात सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या प्रतिमा असणारा पुतळा बसवला. इथून या वादाला सुरूवात झाली. अभाविपने बसवलेल्य पुतळ्यावर NSUI नं आक्षेप घेतला.
सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्यासोबत सावरकरांचा पुतळा नको, अशी भूमिका घेत गुरुवारी (22 ऑगस्ट) NSUI चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अक्षय लकरांनी इतर कार्यकर्त्यांच्या सोबतीने सावरकरांच्या पुतळ्याला काळं फासलं. यावेळी NSUI नं पुतळ्याच्या खांबावरील सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातले.
हा वाद सुरू झाल्यानंतर दिल्ली विद्यापीठानं अभाविपला आदेश देत पुतळा हटवण्यास सांगितले. त्यानुसार अभाविपनं पुतळा हटवला आहे.
"विद्यापीठात सर्व विचारांना स्थान पाहिजे"
"देशाच्य स्वातंत्र्य लढ्यातील सर्वच क्रांतिकारी नेत्यांच्या पुतळ्याची स्थापना दिल्ली विद्यापीठाच्या आवारात व्हायला हवी. चार-पाच व्यक्तींचे किंवा विशिष्ट कुटुंबातील व्यक्तींचे पुतळे बसवलेले चालणार नाहीत, असं आम्ही दिल्ली विद्यापीठाला पत्राद्वारे कळवलं होतं" अशी माहिती अभाविपचे दिल्ली प्रदेशमंत्री सिद्धार्थ यादव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
विद्यापीठ वैचारिक देवाण-घेवाणीचं ठिकाण असल्यानं प्रत्येक विचारांना तिथं स्थान असायला पाहिजे. दिल्ली विद्यापीठ चर्चेचं एक व्यासपीठ आहे. जर क्रांतिकाऱ्यांबाबत चर्चाच होत नसेल तर कसं होईल, असंही यादव यांनी म्हटलं.
NSUI चे महाराष्ट्र प्रतिनिधी आमीर नूरी हे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "सावरकरांचा आम्हाला काही त्रास नाही. मात्र स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंग फासावर गेले, सुभाषचंद्र बोस शेवटपर्यंत लढले, पण इंग्रजांसमोर झुकले नाहीत. सावरकर मात्र याउलट दिसतात. त्यांनी इंग्रजांकडे माफी मागितली होती."
निवडणुकांमुळं अभाविपनं पुतळा बसवला?
येत्या 12 सप्टेंबरला दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका आहेत. त्यासंदर्भात दिल्ली विद्यापीठाने वेबसाईटवरून घोषणा केलीये. त्यामुळे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सावकरांच्या पुतळ्याचा वाद निर्माण करण्यात आलाय का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
यावर अभाविपचे सिद्धार्थ यादव म्हणाले, "सावरकरांचा पुतळा बसवण्याची परवानगी मिळवण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि यंदा मार्च, एप्रिल, ऑगस्ट असं चारवेळा दिल्ली विद्यापीठाच्या प्रशासनाला पत्र लिहिलं होतं. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही पुतळा बसवला."
मात्र, NSUI चे आमीर नूरी यांनी म्हटलं, "दिल्ली विद्यापीठात अभाविपच्या सदस्यांची संख्या जास्त आहे. किंबहुना केंद्रातही त्यांचंच सरकार आहे. मग पहाटे 6 वाजता पुतळा का लावला? लपून-छपून हे काम करायची काय गरज आहे?"
अभाविपला वर्षभरात सावरकर, बोस किंवा भगतसिंह आठवले नाहीत. काही दिवसातच दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुका आहेत. त्यामुळं अभाविपचं विकृत राजकारण सुरू असल्याचंही नूरी यांनी म्हटलं.
सावरकरांसोबत बोस आणि भगतसिंह का?
दिल्ली विद्यापीठात अभाविपनं बसवलेल्या पुतळ्यावर विनायक दामोदर सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या प्रतिमा होत्या. या तीन व्यक्तींच्या विचारांमध्ये कोणतं सूत्र आहे का, याबाबत बीबीसी मराठीनं इतिहास संशोधक संजय सोनवणी यांच्याकडून जाणून घेतलं.
"वैचारिक पातळीवर सावरकर, बोस आणि भगतसिंह यांच्यात समान सूत्र नाही. मात्र तिघेही राष्ट्रभक्त होते. तिघांचे मार्ग आणि तत्त्वज्ञान मात्र वेगवेगळे होते," असं संजय सोनवणी यांनी म्हटलं.
सावरकर आधी प्रखर राष्ट्रवादी होते, नंतर ते ब्रिटीशवादी झाले. मात्र बोस आणि भगतसिंह हे आपापल्या विचारांशी कायम एकनिष्ठ राहिल्याचं सोनवणी यांनी सांगितलं.
"सुभाषबाबूंना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच पसंत पडला नसता भगतसिंह तर नास्तिक होते आणि साम्यवादाकडे झुकणारे होते. मात्र शस्त्र हाती धरणारा माणूस संघाला प्रिय वाटतो. या एकाच अंगाने संघाला बोस, भगतसिंह आणि सावरकर जवळचे वाटतात. बाकी विचारांच्या दृष्टिनं त्यांचा परस्परांशी काहीच संबंध नाही," असं संजय सोनवणी म्हणतात.
दरम्यान, काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेविरोधात दिल्लीतल्या मॉरिस नगर पोलीस ठाण्यात अभाविपनं तक्रार दाखल केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या प्रशासनाकडेही NSUI विरुद्ध कारवाईची मागणी अभाविपनं केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)