You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'शाहरूख खान, तुम्ही बॉलिवुड सिंड्रोमचे शिकार आहात' - पाकिस्तानी लष्कराकडून टीका
शाहरूख खानच्या कंपनीनं नेटफ्लिक्ससाठी तयार केलेल्या एका चित्रपटामुळे पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर आणि शाहरूख खानच्या चाहत्यांमध्ये ट्वीटरवर वाद सुरू झाला आहे.
पाकिस्तानमधल्या ट्वीटर युजर्सनंही या वादात उडी घेतलीये.
शाहरूख खानच्या कंपनीनं नेटफ्लिक्ससाठी 'बार्ड ऑफ ब्लड' या सीरिजची निर्मिती केली आहे. ही सीरिज 27 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
शाहरूख खाननं गुरुवारी ट्विटर अकाऊंटवरून या सीरिजचा ट्रेलर जाहीर केला.
"बार्ड ऑफ ब्लड सीरिजचं स्वागत आहे. हेरगिरी, सूडाची भावना, प्रेम आणि कर्तव्य यांची ही एक रहस्यमय कथा आहे," असं शाहरूखनं लिहिलं होतं.
गफूर यांचं ट्वीट
एक दिवसानंतर आसिफ गफूर यांनी ट्रेलरच्या आधारे दावा केला की, "शाहरूख खान बॉलिवुड सिंड्रोमचे शिकार आहेत."
'बार्ड ऑफ ब्लड' ही अशा 3 भारतीय गुप्तहेरांची कथा आहे, जे एका रेस्क्यू मोहिमेकरता पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात जातात. ट्रेलरमध्ये याला 'सुसाईड मिशन' म्हटलं आहे.
आसिफ गफूर यांनी शाहरूखच्या ट्वीटला रीट्विट करत सत्य जाणून घ्यायचा सल्ला दिला आहे.
'शाहरूख खान तुम्ही बॉलिवुड सिंड्रोममध्ये अडकले आहात. सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी 'रॉ'चे हेर कुलभूषण जाधव, विंग कमांडर अभिनंदन आणि 27 फेब्रुवारी 2019ची स्थिती पाहा. याशिवाय तुम्ही काश्मिरमध्ये होणारा अत्याचार आणि जातीवादासाठी प्रयत्नरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात बोलून शांती आणि मानवतेला प्रोत्साहन देऊ शकता,' असं गफूर यांनी म्हटलं आहे.
गफूर यांच्या ट्वीटनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संदीप सप्रे नावाच्या ट्वीटर युझरनं लिहिलं आहे, "कुलभूषण यांच्याविरोधात पुरावे नाहीत, असं तुमच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारानं म्हटलं आहे."
"गफूर यांनी भारतातल्या त्या ट्विटर अकाऊंटला लक्ष्य केलं आहे, ज्याला जगभरातून सर्वाधिक लोक फॉलो करतात, असं ट्वीट शाहरूख खानच्या एका चाहत्यानं केलं आहे.
याव्यतिरिक्त अनेक युजर्सनी गफूर यांना टीकेचं लक्ष्य केलं. तर दुसरीकडे पाकिस्तानातील ट्विटर युजर्सनी गफूर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
शाहजहान मलिक यांनी म्हटलं आहे, की शाहरूख खानसारखे अनेक चांगले हीरो बॉलिवुडमध्ये आहेत. पण यापैकी कुणी सभ्य माणूस नाही याचं दु:ख आहे."
"सर, ही त्यांची मजबूरी आहे. नाहीतर ते ना इकडचे राहतील ना तिकडचे," असं ट्वीट सईदा बुशरा आमीर यांनी केलं आहे.
शाहरूख खाननं मात्र अद्याप गफूर यांच्या ट्वीटला उत्तर दिलेलं नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)