You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उदयनराजेः राष्ट्रवादीत नुसती आडवा-आडवी अन् जिरवा-जिरवी
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. राष्ट्रवादीत नुसती आडवा-आडवी अन् जिरवा जिरवी-उदयनराजे
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे खूप चांगले मित्र आहेत. ही मैत्री पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडची आहे. गेल्या पाच वर्षात आम्ही सत्तेत नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच मैत्रीपोटी साताऱ्याचा खरा विकास केला. याउलट राष्ट्रवादीत नुसतं आडवा-आडवी आणि जिरवीजिरवीच झाली", असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली आहे.
"भाजपकडे सत्ता आहे म्हणून मी तिथे जाईन असा तर्क काढणं चुकीचं आहे. सातारकरांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे."
"रामराजे नाईक निंबाळकर राजे आहेत. आमची आणि त्यांची कुठंच बरोबरी होऊ शकत नाही. ते वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यामुळे माझा त्यांच्याशी संबंध जोडू नका. ते आणि शिवेंद्रराजे त्यांच्या मार्गाने कुठेही जातील", असंही त्यांनी सांगितलं.
"आता सगळीकडेच यात्रा निघाल्या आहेत. आमची स्वत:ची जत्रा असताना आम्ही असल्या या यात्रांमध्ये का सहभागी होऊ?" असा सवालही त्यांनी केला.
2. फलक मराठीत लावा; मनसेची ईडीला नोटीस
राज्यात शासकीय फलक मराठीत असायला हवेत, त्यामुळे त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्या नोटीशीची प्रत ईडीला पाठवली आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार? असे मनसेनं म्हटलं आहे. 'टीव्ही9 मराठी'ने याबाबत बातमी केली.
कोहिनूर मिल जमीन खरेदीप्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने नोटीस पाठवून राज ठाकरे यांची नऊ तास चौकशी केली.
3. आप महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढवणार
आम आदमी पक्ष (आप) राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहे. सध्याचं सरकार सगळ्या पातळ्यांवर अपयशी ठरल्याने हा निर्णय घेतल्याचं आपने म्हटलं आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.
एकेकाळी प्रगतीशील असलेल्या महाराष्ट्राला दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्थेची दुरावस्था, भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्थेत अनागोंदी अशा अनेक समस्यांनी ग्रासलं आहे असं आप पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख दुर्गेश पाठक यांनी सांगितलं.
रंगा रचुरे, किशोर मध्ययन, धनंजय शिंदे, जगजीत सिंग, प्रीती शर्मा मेनन, देवेंद्र वानखेडे, कुसुमकर कौशिक, अजिंक्य शिंदे, डॉ. सुनील गावित, मुकुंद किरदत, संदीप देसाई यांचा समावेश असलेली समिती राज्यातील निवडणुकांसाठी आप उमेदवारांची निवड करेल.
4. मुंबई-दिल्ली प्रवास एका तासाने कमी होणार
मुंबई-दिल्ली राजधानी प्रवासाचं अंतर एका तासाने कमी होणार आहे. मुंबई सेंट्रल-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस शनिवारपासून पुश-पूल पद्धतीने चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. यामुळे प्रवाशांचा एक तास कमी होणार आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
राजधानी एक्स्प्रेसला पुढे आणि मागे प्रत्येकी 6000 हॉर्सपॉवरचे इंजिन जोडण्यात येईल. यामुळे स्थानकातून रवाना होताच अल्पावधीत वेग घेता येईल. शिवाय ब्रेक तातडीने कार्यान्वित करणं सोपं होईल असं रेल्वेने स्पष्ट केलं.
लवकरच ऑगस्ट क्रांती राजधानी ट्रेनला असा प्रयोग होणार आहे.
5. इशांत शर्माच्या पाच विकेट्स; वेस्ट इंडिजची घसरगुंडी
वेगवान गोलंदाज इशांत शर्माने घेतलेल्या पाच विकेट्सच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. 'इंडिया टुडे'ने ही बातमी दिली आहे.
दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 203/6पासून पुढे खेळायला सुरुवात केली. ऋषभ पंत चार धावांची भर घालून 24 धावांवर बाद झाला.
रवींद्र जडेजाने 6 चौकार आणि एका षटकारासह 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. इशांत शर्माने 62 चेंडूत 19 धावांची चिवट खेळी करत त्याला चांगली साथ दिली. भारताने 297 धावांची मजल मारली. वेस्ट इंडिजतर्फे केमार रोचने 4 तर शॅनन गॅब्रिएलने 3 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. रॉस्टन चेसने सर्वाधिक 48 धावा केल्या. इशांत शर्माने क्रेग ब्रेथवेट, रॉस्टन चेस, शे होप, शिमोरन हेटमेयर आणि केमार रोच यांना बाद केलं.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजच्या 189/8 धावा झाल्या आहेत. वेस्ट इंडिजचा संघ 108 धावांनी पिछाडीवर आहे.
भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होणारी ही दोन सामन्यांची मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)