You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अरुण जेटली यांचं दिल्लीच्या एम्समध्ये निधन
भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं नवी दिल्लीमध्ये निधन झालं आहे.
अरुण जेटली यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी जेटली यांचं निधन झाल्याचं एम्सने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे.
त्यांच्यावर वेगवेगळ्या विभागांच्या डॉक्टरांचे पथक उपचार करत होते. श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे जेटलींना रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र गेले अनेक महिने आजाराशी सामना करणाऱ्या जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला.
'निष्णात वकील, अनुभवी संसदपटू, मंत्री म्हणून प्रभावी कामगिरी. देशाच्या उभारणीत मोलाचं योगदान. आजाराशी त्यांनी जिद्दीने संघर्ष केला. त्यांच्या जाण्याने सार्वजनिक जीवनातील एक दैदिप्यमान पर्व हरपलं आहे. अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. कोणताही विषय समजून घेऊन त्यासंदर्भात शास्त्रोक्त मांडणी करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. कोणतीही जबाबदारी समर्थपणे पेलणं ही त्यांची ओळख होती. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत', अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जेटली यांना आदरांजली वाहिली.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील यापूर्वीच्या सरकारमध्ये 66 वर्षीय अरुण जेटली अर्थमंत्री होते. त्यांची किडनी ट्रान्सप्लांट (मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रीया) करण्यात आलेली आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावरील जबाबदाऱ्या पियूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आल्या होत्या.
'उत्तुंग नेते, सक्षम प्रशासक, कायदेतज्ज्ञ, विविध प्रश्नांची सखोल जाण असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व. भाजपसाठी त्यांनी विविधांगी जबाबदाऱ्या खंबीरपणे निभावल्या. त्यांच्या जाण्याने मी अत्यंत जवळचा मित्र गमावला', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
याच वर्षी फेब्रुवारीमध्ये ते वैद्यकीय उपचारांसाठी देशाबाहेर गेले होते, त्यामुळे ते अंतरिम अर्थसंकल्प सादर करू शकले नव्हते.
मे महिन्यात पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी पत्र लिहून पंतप्रधानांना कळवले होते की ते आरोग्याच्या कारणांमुळे नव्या सरकारमध्ये कोणतीही जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत.
त्यांनी पत्रात म्हटलं होतं की गेल्या 18 महिन्यांत ते आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त आहेत ज्यामुळे ते कोणतंही पद घेऊ इच्छित नाहीत.
वकिली करता करता राजकारणात आलेल्या अरुण जेटलींचा भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये समावेश होतो. ते दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राहिले असून राज्यसभेचे सदस्य होते.
क्रिकेट प्रशासनातही जेटली अग्रेसर होते. 2009 मध्ये त्यांची बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. डीडीसीए अर्थात दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते 1999 ते 2013 या कालावधीत अध्यक्ष होते.
डीडीसीएचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. दिल्लीचे पंतप्रधान अरविंद केजरीवाल यांनी डीडीसीएचे अध्यक्ष म्हणून जेटली यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला. केजरीवाल यांनी माफी मागितल्यावर ते प्रकरण थांबलं.
'अरुण जेटली यांच्या निधनाने अतीव दु:ख झाले. प्रभावी संसदपटू, जाणकार वाचक आणि अभ्यासू नेते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जेटली यांनी आदरांजली वाहिली आहे.
अरुण जेटलींचा नेमका आजार काय?
अरुण जेटली एकाच वेळी वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होते. जेटलींना एकाच वेळी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा सामना करावा लागत होता.. 2014 मध्ये त्यांनी अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बॅरियाट्रिक सर्जरी केलेली होती.
मे 2018 मध्ये एम्समध्ये अरुण जेटली यांची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली. यावर्षी जानेवारीमध्ये जेटली यांची अमेरिकेत सॉफ्ट टिश्यू कॅन्सरवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती लाईव्ह मिंट या संकेतस्थळाने दिली होती.
मधुमेहामुळे किडनीवर परिणाम होणे हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जवळपास 40 टक्के मधुमेहग्रस्त रुग्णांमध्ये किडनीवर परिणाम होत असल्याचे आढळून येत असल्याचं फर्स्टपोस्ट या संकेतस्थळावरील एका बातमीत म्हटलं आहे. या प्रकाराला डायबेटिक नेफ्रोपॅथी असं म्हटलं जातं.
एकाच वेळी अनेक आजार होण्याच्या या प्रकाराला मल्टिमोर्बिडिटी असं म्हटलं जातं. या प्रकाराचा अर्थ असा आहे की एका आजारातून पुढे अनेक आजार किंवा व्याधी उद्भवणे. मल्टिमोर्बिडिटी किंवा अनेक व्याधी एकाचवेळी अस्तित्वात आल्यास त्या व्यक्तीवर उपचार करणे हे अवघड होऊन जाते. कारण रुग्णाला वेगवेगळ्या व्याधींसाठी वेगवेगळे उपचार घ्यावे लागतात आणि त्यातून ड्रग इंटरअॅक्शन्स आणि साईड इफेक्टचं प्रमाण वाढण्याचा धोका असतो.
'जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकात 'एम्स' भोपाळचे डॉक्टर रजनीश जोशी यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, भारतामध्ये दीर्घकालीन आजाराने ग्रस्ता असलेले दोन तृतीयांश रुग्ण हे अनेक व्याधींना बळी पडल्याचे आढळून येते. यांपैकी बहुतेक जणांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्हीही व्याधी एकाच वेळी जडलेल्या दिसून येतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)