काश्मीर: कलम 370 हटवलं पण हरवलेल्या कश्मीरियतचं काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्वेता कौल
- Role, विस्थापित काश्मिरी पंडित, बीबीसी हिंदीकरता
विस्थापित काश्मिरी पंडितांचं नेमकं दु:ख काय आहे? काश्मीरहून देशात अन्य ठिकाणी स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडित समाजातील महिलेचं मनोगत.
माझा जन्म काश्मीरमध्ये एका पंडित कुटुंबात झाला. दहशतीच्या ज्या काळामध्ये पंडितांनी काश्मीरमधून पलायन केलं ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. दहशतीच्या सावटाखाली जगणं हे किती त्रासदायक असतं हे मी पूर्णपणे समजू शकते.
माझ्या कुटुंबाने जेव्हा काश्मीरमधून पळ काढला तेव्हा मी फक्त पाच वर्षांची होते. मला अगदी नीट आठवतंय की आम्ही रस्त्याने जात असताना अचानक कर्फ्यू लावण्यात आला. मग मुख्य रस्त्यांऐवजी गल्ल्यांमधून जात घरी पोहोचणं, अश्रुधुराचे गोळे, बंदुकधाऱ्यांची दहशत.
मला अजूनही ती रात्र स्पष्टपणे आठवतेय जेव्हा काही दहशतवादी आमच्या घरात बंदुका घेऊन घुसले होते.
त्या रात्री आणि पुढच्या अनेक रात्री आम्ही झोपू शकलो नाही. कडाक्याच्या थंडीमध्ये मध्यरात्री काश्मीर कायमचं सोडणं मी आजपर्यंत विसरू शकलेले नाही.
काश्मीरमधून पलायन केल्याला आता जवळपास 30 वर्षं झाली आहेत. पण इतक्या मोठ्या कालावधीनंतरही मी ती भयावह घटना माझ्या मनातून काढून टाकू शकलेले नाही.
जर माझ्या या जखमा आजही ताज्या असतील तर विचार करा की काश्मीरमधल्या त्या निरागस मुलांचं काय होत असेल जी बंदुकीच्या सावलीमध्येच लहानाची मोठी होत आहेत. त्या निष्पापांना काय वाटत असेल जेव्हा त्यांना 'दुश्मन' म्हणत पेलेट गनने टार्गेट करण्यात येतं?
त्या तरुणाचे काय हाल होत असतील ज्याला फक्त शंका आली म्हणून ताब्यात घेतलं जातं? कसं वाटत असेल त्या काश्मिरी बायकांना ज्यांचा नवरा किंवा तरूण मुलगा ताब्यात घेण्यात आल्यानंतर कधी परतलाच नाही?
काश्मिरी पंडितांची ढाल केली जातेय
हे सगळे प्रश्न तुम्हाला छळतात का हे मला माहित नाही, पण काश्मीरच्या समस्येची झळ सोसणारी एक काश्मिरी म्हणून मला हे सगळे प्रश्न बेचैन करतात.
आपल्याच देशातले नागरिक अडचणीत असल्याचा आनंद साजरा करणारे लोक पाहून मला त्रास होतो. काश्मिरी पंडितांची ढाल करून काश्मीरच्या मुसलमानांवर होणाऱ्या जबरदस्तीला आधीही योग्य ठरवण्यात आलं होतं. आता तर धार्मिक तिरस्काराचा उन्माद टोकाला गेलेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एक काश्मिरी पंडित म्हणून मी याचा जाहीर निषेध करते. माझ्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा अन्याय करत तो योग्य ठरवण्याच्या प्रयत्नांचा हिस्सा होणं, मला अजिबात मान्य नाही.
मी पीडित आहे याचा अर्थ असा होत नाही की दुसऱ्या कोणत्यातरी विनाशाचा आनंद साजरा करीन. मला हे पाहून दुःख होतं की माझं नाव आणि माझी अडचण यांचा वापर मानवतेच्या नियमांच्या विरोधात केला जातोय.
कोणत्याही प्रकारचं शोषण चूकच असतं. कोणत्याही समाजाचं शोषण होणं चूक आहे.
न्याय मिळणं आणि बदला घेणं या दोन्ही गोष्टी समान नाहीत, इतकी साधी गोष्ट समजून घ्यायला लोक तयार नाहीत. मुसलमानांना त्रास होणं म्हणजे काश्मिरी पंडितांना न्याय मिळणं नाही, हे समजून घ्यायला हवं.
काश्मीर हा फक्त एक भूभाग नाही
'करावं तसं भरावं' प्रकारच्या गोष्टी करणारे नेहमीच या गोष्टीबाबत बोलणं टाळतात की ज्यांनी काही गमावलं ते लोक ना पंडित आहेत ना मुसलमान. ते फक्त काश्मिरी आहेत.
कलम 370 रद्द करण्यात आल्याची घोषणा झाल्याबरोबर सोशल मीडियावर द्वेषाचं वादळ फिरायला लागलं. काश्मिरी लोकांच्या विरुद्ध वायफळ गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या.
काश्मिरी मुलींबाबत नेते लाजिरवाण्या गोष्टी बोलले. सोशल मीडियावरही काश्मिरी मुलींची थट्टा उडवण्यात आली. आणि अनेक लोक या नीच गोष्टीतून आनंद घेत होते.
अगदी यावर थिल्लर आणि अश्लील गाणीही बनवण्यात आली. विश्वास ठेवा, पण या थिल्लरपणावर टीका करण्यासाठी हिंदू किंवा मुसलमान असणं गरजेचं नाही, तर एक सच्चा माणूस आणि सच्चा काश्मिरी असणं गरजेचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
काश्मीरचा इतिहास माहित नसलेला, कश्मिरियत माहिती नसलेला प्रत्येकजण याविषयी टिप्पणी करत होता. अशा लोकांसाठी काश्मीर एका भूभागापेक्षा आणखी काही नाही.
हे तेच लोक आहेत ज्यांनी एकेकाळी काश्मिरी पंडितांच्या विनाशाचा तमाशा पाहिला होता आणि तो थांबवण्यासाठी काहीही केलं नव्हतं. पण आज हे लोक दर वाक्याला काश्मिरी पंडितांचा दाखला देताना पहायला मिळतायत.
खरं म्हणजे जे पक्ष, संघटना आणि लोक आज काश्मिरी पंडितांचे कैवारी असल्याचा दावा करत आहेत त्यांच्यासाठी काश्मिरी पंडितांचं दुःख अजिबात महत्त्वाचं नाही. काश्मिरी पंडितांचा वापर ते फक्त सोंगट्यांसारखा करत आहेत आणि काश्मिरी पंडितांचं दुःख उगाळून स्वतःचं राजकारण केलं जातंय.
मी काश्मीर सोडल्याला आता मोठा काळ उलटून गेलाय. पण आजही कुठे कोणी काश्मिरी भाषा बोलताना कानावर पडलं तर अगदी सहजपणे आपलेपणा वाटतो.
काश्मीरपण हरवले
ही आपुलकी त्या कश्मीरियत आणि मिळूनमिसळून राहण्याच्या संस्कृतीतून आली आहे जिच्यावर जातीयतेचा रंग चढवून ती संपवण्याचे सतत प्रयत्न केले जात आहेत.
काश्मीरचा हा मुद्दा नेहमीच भारत विरुद्ध पाकिस्तान आणि काश्मिरी पंडित विरुद्ध काश्मिरी मुसलमान असा सादर करण्यात आला. आणि याच प्रकारे उर्वरित भारतामध्ये काश्मिरी जनतेच्या विरोधात जनमत तयार करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
काश्मीरच्या राजकीय मुद्द्याचं रूपांतर आज एका जातीय मुद्द्यामध्ये करण्यात आलं ही एक शोकांतिका आहे. काश्मीरच्या या शोकांतिकेची झळ तिथल्या पंडित आणि मुसलमान अशा दोघांनीही सोसली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
काश्मिरी पंडितांवर अन्याय झाला, जबरदस्ती झाली म्हणून त्या आधारावर आज काश्मिरी मुसलमानांवर होणाऱ्या अन्यायांना योग्य कसं ठरवता येऊ शकतं?
कश्मिरियत हा काश्मीरचा आत्मा आहे. हिंदू असो वा मुसलमान, या कश्मिरियतला धार्मिकतेचा रंग देणारे आज या कश्मिरियतला डागाळतायत.
एक सच्ची काश्मिरी म्हणून मी या प्रकारच्या सर्व प्रयत्नांचा जाहीर निषेध करते. काश्मीरची ओळख फक्त एक भूभाग - जमिनीचा तुकडा म्हणून नाही.
काश्मिरची खरी ओळख आहेत तिथे राहणारे लोक आणि ते लोक जे मनापासून ही काश्मिरियत जाणतात.
(लेखिका काश्मिरी पंडित आहेत ज्यांना पाच वर्षांचं असताना विस्थापित व्हावं लागलं होतं. आता त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. लेखातील विचार वैयक्तिक आहेत.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








