मुकुल वासनिक: मराठी नेत्याकडे राहुल गांधींनंतर येऊ शकतं काँग्रेसचं अध्यक्षपद

राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पुढचा अध्यक्ष कोण होईल, यावरून देशभर चर्चा सुरू झाली. या पदासाठी कुणी जाहीरपणे अर्ज भरला नसला, तरी काही नावांचा विचार सुरू आहे, अशा बातम्या येऊ लागल्या. त्यात आघाडीवर नाव आहे ते महाराष्ट्रातल्या मुकुल वासनिकांचं.

वासनिक हे महाराष्ट्रात कुणाला फारसे माहीत नसले, तरी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या दरबारी त्यांना वजन आहे.

सर्वांत तरुण खासदार म्हणून दिल्लीत एंट्री

मुकुल वासनिक हे दिल्लीत महाराष्ट्रातील एक दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. अगदी तरुण वयात खासदारकी मिळालेल्या वासनिकांनी केंद्रीय मंत्रिपदही सांभाळलेलं असून सध्या ते काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

मुकुल वासनिकांना राजकीय वारसा घरातूनच मिळाला. मुकुल वासनिकांचे वडील बाळकृष्ण वासनिक हे तीन वेळा खासदार होते आणि काँग्रेसमधील वजनदार नेते होते. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा 2009 पूर्वी अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ होता. ज्यावेळेस विदर्भात काँग्रेसचा एकछत्री अंमल होता तेव्हा बाळकृष्ण वासनिकांनी बुलडाणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

त्यांच्यानंतर बुलडाणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायची संधी बाळकृष्ण वासनिकांचे पुत्र मुकुल वासनिक यांना मिळाली. अगदी वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी ते बुलडाण्यातून 1984 मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्या लोकसभेत ते सर्वांत तरुण खासदार होते.

एकापाठोपाठ एक संधी मिळत गेल्या

खासदारकीच नाही तर त्यानंतरच्या संधीही मुकुल वासनिकांना पटापट मिळत गेल्या. 1985 मध्ये वासनिक यांच्यावर काँग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हा वासनिकांनी दिल्ली गाठली आणि त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवास सुरू झाला. पुढे ते दिल्लीतच राहू लागले.

त्यांनी कधी महाराष्ट्राच्या राजकारणात रस घेतला नाही. 1988 मध्ये वासनिक युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. 1989 मध्ये ते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. पण जेव्हा 1991 मध्ये ते लोकसभेवर पुन्हा निवडून आले तेव्हा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. वयाच्या 34व्या वर्षी ते केंद्रात मंत्री होते.

पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात मुकुल वासनिक यांना 1993 मध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. 2009 मध्ये मुकुल वासनिक रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आणि त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी मुकुल वासनिकांना मिळाली. 2009 मध्येच त्यांच्याकडे काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी आली आणि ती त्यांच्याकडे आजतागायत सीतआहे.

गांधी घराण्याचा विश्वास

1984 मध्ये खासदार म्हणून दिल्लीत आल्यापासून वासनिकांनी दिल्लीच्या काँग्रेस वर्तुळात आपला जम बसवलेला आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना मुकुल वासनिकांचा दिल्लीत प्रवेश झाला. तेव्हापासून ते गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जातात. राजीव गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांच्या मर्जीतील असणे ही मुकुल वासनिकांसाठी जमेची बाजू आहे.

मुकुल वासनिकांचे वय 59 वर्षं आहे. तीही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. एकीकडे सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखे तरुण तुर्क तर दुसरीकडे मल्लिकार्जुन खरगेंसारखी वयाने ज्येष्ठ मंडळी यांच्या तुलनेत वासनिक हे मधला पर्यात ठरतात.

दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांचे म्हणणे आहे की, "मुकुल वासनिकांसाठी निष्ठावंत असणे ही जमेची बाजू आहे. त्यांचा मीतभाषी स्वभाव ही सुद्धा त्यांची जमेची बाजू आहे."

भाजपमध्ये वक्ते आणि प्रवक्ते यांना महत्त्व असलं तरी काँग्रेसमध्ये कमी बोलणाऱ्या आणि पडद्याआडून शांतपणे काम करणाऱ्यांना महत्त्व असतं. ए. के. अँटनी, अहमद पटेल, मोतीलाल वोरा, जनार्दन द्विवेदी असे काँग्रेसमधले महत्त्वाचे नेते क्वचितच टीव्ही चॅनलवर किंवा सभांमध्ये फर्ड्या भाषेत बोलताना दिसतात.

'वासनिक लोकनेते नाहीत'

अर्थात वासनिकांपुढे मोठे आव्हानही असल्याचं जानभोर सांगतात, " एआयसीसी अर्थात काँग्रेसच्या कार्यकारिणीत एका गटाचा त्यांना विरोध आहे. खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी त्यांनी चांगलं काम केलंय. पण अध्यक्षपदासाठी जमिनीवर उतरून आक्रमकपणे काम करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना खूप मेहनत कारावी लागेल. ते दरबारी राजकारणात तरबेज आहेत. मात्र जनमानसातील राजकारण त्यांना कितपत जमू शकेल हा प्रश्न आहे."

"सीताराम केसरी यांच्यानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद दलित व्यक्तीकडे आलेलं नाही. त्यामुळे वासनिकांना ती संधीही आहे. बहुजन वंचित आघाडीचा महाराष्ट्रातील प्रभाव हे सुद्धा त्यांना अध्यक्षपद देण्यामागचे एक कारण होऊ शकते," असंही जानभोर पुढे सांगतात.

महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी सुनील चावके सांगतात की, " काँग्रेस पक्ष कसा चालतो यांची वासनिकांना अगदी नीट माहिती आहे. दिल्लीचे राजकारण जवळून पाहिलेले ते नेते आहेत. दीर्घ काळ सरचिटणीस राहिलेले आहेत. पक्ष संघटनेवर त्यांची चांगली पकड आहे. केवळ गांधी कुटुंबच नाही तर पक्षातले ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्यांचे अतिशय चांगले संबंध आहे.

"अर्थात मुकुल वासनिकांपुढे आव्हानही असतील. ग्रासरुटशी त्यांचा संपर्क कमी आहे. त्यामुळे राज्याराज्यातील काँग्रेस नेत्यांना सांभाळणे ही त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असेल. काँग्रेसमध्ये जेव्हा गांधी कुटुंबाबाहेरची व्यक्ती अध्यक्ष झालेली आहे. तेव्हा बंडखोरी वाढताना दिसलेली आहे. काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाला जे अधिकार असतात ते वासनिकांना मिळू शकणार नाहीत. त्यामुळे कुरघोड्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबी सांभाळणे हे वासनिकांसाठी मोठे आव्हान असेल."

वासनिक काँग्रेसचे अध्यक्ष होतील की नाही हे काँग्रेसच्या सर्वोच्च बैठकीत ठरेल. पण त्यांच्या गळ्यात ही काटेरी माळ पडली तर त्यांच्यासमोर पहिली मोठी जबाबदारी असेल ती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची. ते ज्या राज्यातून येतात, त्या राज्यात काँग्रेसची स्थिती अजिबात चांगली नाहीये आणि वासनिकांना राज्याच्या राजकारणा अजिबात अनुभवही नाहीये.

महाराष्ट्रापेक्षाही मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल ते काँग्रेस पक्षाची पडझड थांबवणं आणि मोदी-शहांच्या शक्तिशाली विजयरथासमोर काँग्रेसला दोन पायांवर उभं करणं.

पण ते करण्यासाठी मुळात काँग्रेस पक्ष त्यांना मनापासून अध्यक्ष म्हणून स्वीकारेल का, हाही प्रश्न आहे. कारण सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सक्रिय असताना काँग्रेसजनांना बिगर-गांधी व्यक्तीचं नेतृत्व स्वीकारणं जड जाऊ शकतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)