You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस, रेल्वेसेवा विस्कळीत
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस, रेल्वेसेवा विस्कळीत
मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील अनेक भागात काही ठिकाणी पावसाची संततधार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वांगणीदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
ठाण्यातील उल्हास नदी दुथडी भरून वाहत असल्याने अंबरनाथ, बदलापूर भागात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये रेल्वे स्थानकं जलमय झाली आहेत. या दोन्ही रेल्वे स्थानकात पाणी फलाटापर्यंत पोहोचलं आहे. कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूकच थांबवण्यात आली आहे.
लोकल किंवा इतर रेल्वेगाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेल्वे पोलीस आणि एनडीआरएफच्या टीम रात्रभर ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र टाईम्सने यासंदर्भात बातमी दिली आहे.
मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील इतरही भागात पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे. कोकणात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेषत: मुंबई, डहाणू, अलिबाग आणि रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे.
विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात येत्या तीन दिवसात मोठ्या पावसाचा अंदाज आहे, असं हवामान खात्याचे (पुणे) प्रमख अनुपम कश्यपी यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.
2) मद्यपी एसटी चालकांना दोन तासात बडतर्फ करणार : परिवहन मंत्री
मद्यधुंद अवस्थेत बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या चालकांना दोन तासात बडतर्फ करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबत घोषणा केली. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकात 25 जुलै रोजी अमोल चोले नामक एसटी चालकाने मद्यधुंद अवस्थेत शिवशाही बस चालू केली आणि बेदरकारपणे बस चालवून अपघात केला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेची गंभीर दखल परिवहन मंत्र्यांनी घेतली आहे.
शिवाजीनगर बस स्थानकातील प्रकारानंतर अमोल चोले या एसटी चालकाचीही सेवेतून हकालपट्टी करण्यात आली.
3) "जे चॅनेल दाखवले नाहीत, त्यांचे पैसे ग्राहकाला परत करा"
टाटा स्काय आणि डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांमधील वादाची दखल केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने अर्थात ट्रायने घेतली आहे. ब्रॉडकास्टर आणि कंपनीच्या वादामुळे जर संबंधित चॅनेल टाटा स्कायला दाखवता येत नसतील, तर दुसरे चॅनेल उपलब्ध करून द्या किंवा न दाखवलेल्या चॅनेलचे पैसे ग्राहकांना परत करा, असे आदेश ट्रायने दिले आहेत. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
चॅनेल पाहणाऱ्या ग्राहकांना गृहित धरू नका, असं म्हणत ट्रायने टाटा स्कायला फटकारलं आहे.
टाटा स्कायने ब्रॉडकास्टर कंपन्यांसोबतच्या वादामुळे काही चॅनेल बंद केल्याचे ट्रायच्या लक्षात आलं. काही महिने लोकप्रिय चॅनेल बंद असल्याने नागरिकांनी ट्रायकडे तक्रारी केल्या. त्यानंतर ट्रायने टाटा स्कायला स्पष्ट आदेश दिले.
4) 'वंदे मातरम्'ला राष्ट्रगीताचा दर्जा मागणारी याचिका कोर्टाने फेटाळली
'वंदे मातरम्'ला राष्ट्रगीताचा दर्जा द्या, अशी मागणी वकील अश्विनी उपाध्याय यांनी दिल्ली हायकोर्टात केली होती. मात्र, दिल्ली हायकोर्टातील मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. सी. हरिशंकर यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
सर्व शाळांमध्य वंदे मातरम् राष्ट्रगीताप्रमाणेच गायलं पाहिजे. तसेच, याबाबत राष्ट्रीय धोरण करावं, अशी मागणी अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेतून केली होती.
अश्विनी उपाध्याय यांची याचिका फेटाळताना दिल्ली हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला दिला. वंदे मातरम् अनिवार्य करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टान 2017 साली म्हटलं होतं.
5) गरोदर महिलेला HIV बाधित रक्त देणाऱ्या हॉस्पिटलला कोर्टाचा दणका
तामिळनाडूतील एका गरोदर महिलेला HIV बाधित रक्त देणाऱ्या सरकारी हॉस्पिटलला हायकोर्टाने दणका दिला आहे. सरकारने महिलेला 25 लाख रुपयांची भरपाई आणि 450 स्केअर फुटांचं 2 बीएचके घर द्यावे, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हिंदुस्तान टाईम्सने ही बातमी दिली आहे.
सरकारी हॉस्पिटलच्या या कारनाम्यानंतर मदुराई येथील सामाजिक कार्यकर्ते अप्पा सामी आणि मुथू कमार यांनी जनहित याचिका दाखल करून गरोदर महिलेची बाजू हायकोटात मांडली होती.
सिवकासी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये 3 डिसेंबर 2018 रोजी उपचारासाठी आलेल्या गरोदर महिलेला HIV बाधित रक्त देण्यात आलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)