You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आसाम महापूर: थकलेल्या वाघिणीने घेतली घरातल्या गादीवर विश्रांती
सध्या आसाममध्ये महापुराने हाहाकार माजला आहे. अनेक जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे.
राज्यातील काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यात सुद्धा महापुराने थैमान घातल्याचं दिसून आलं. महापुराच्या तडाख्यात आतापर्यंत 92 प्राणी मृत्युमुखी पडल्याचं समोर आलं आहे.
या सगळ्या घडामोडींदरम्यान एक वाघिणीने महापुरातून आपला जीव वाचवण्यासाठी रहिवासी भागात धाव घेतली. थकलेल्या वाघिणीने एका स्थानिकाच्या घरात प्रवेश करून तिथल्या गादीवर विश्रांती घेतल्याचं आढळून आलं.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी वाघिणीला घरातून सुरक्षितपणे बाहेर काढून तिची रवानगी जंगलाच्या दिशेने केली.
वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया (WTI) ने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी राष्ट्रीय अभयारण्यापासून 200 मीटर अंतरावर महामार्गाजवळ वाघिण थकलेल्या अवस्थेत आढळून आली. अखेरीस जवळच्याच एका घरात विश्रांती घेण्यासाठी तिने प्रवेश केला.
"एका दुकानाशेजारी असलेल्या घरात वाघिणीने सकाळी साडेसातच्या सुमारास प्रवेश केला. त्यानंतर दिवसभर ती घरातच झोपून होती," असं वाघिणीला बाहेर काढण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या रतिन बर्मन यांनी सांगितलं.
"ती अत्यंत थकलेली होती. तिने संपूर्ण दिवस झोप काढून आपला थकवा दूर केला," असं ते म्हणाले.
घरमालक मोतीलाल यांचं शेजारीच दुकान आहे. वाघीण घरात येत असल्याचं पाहून त्यांनी लागलीच घरातून पळ काढला.
बर्मन सांगतात, "थकलेली वाघीण विश्रांती घेत असताना कुणीच तिला त्रास दिला नाही हे महत्त्वाचं आहे. या भागात वन्य प्राण्यांबाबत आदर आणि आपुलकी आहे."
याला दुजोरा देत मोतीलाल म्हणाले, "वाघिणीने विश्रांती घेतलेली बेडशीट आणि उशी कायम जतन करून ठेवणार आहे."
दुपारनंतर डब्ल्यूटीआयच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. वाघिणीच्या सुटकेसाठी योग्य ती तयारी करण्यात आली.
एका तासासाठी महामार्ग बंद ठेवण्यात आला. फटाक्यांचा आवाज करून वाघिणीला उठवण्यात आलं. अखेरीस सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाघिणीने आपली झोप पूर्ण केली आणि महामार्ग ओलांडून ती जंगलाच्या दिशेने निघून गेली.
बर्मन सांगतात, वाघिण जंगलाच्या दिशेने निघून गेली असली तरी तिने जंगलात प्रवेश केला किंवा नाही ते अजूनही स्पष्ट झालं नाही.
यूनेस्कोच्या यादीतील काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यामध्ये 110 वाघ आहेत. पण त्यापैकी एकही वाघ महापुरामुळे दगावला नाही.
महापुरात दगावलेल्या प्राण्यांमध्ये 54 हरणं, सात गेंडे, सहा रानडुक्कर आणि एका हत्तीचा समावेश आहे.
यंदाच्या महापुरामुळे बिहार आणि आसामला मोठा फटका बसला आहे. सुमारे 100 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून लाखो नागरिक बेघर झाले आहेत. यासोबतच नेपाळ आणि बांगलादेशमध्येही महापुराने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)