असदुद्दीन ओवेसी: इंडिया गेटवर असलेल्या शहिदांमध्ये 65 टक्के मुस्लीम

    • Author, प्रशांत चाहल
    • Role, फॅक्ट चेक टीम, बीबीसी न्यूज

'भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची नावं नवी दिल्ली स्थित इंडिया गेटवर लिहिण्यात आली आहेत, त्यात 65 टक्के नावं हिंदुस्थानातील मुसलमानांची आहेत,' असा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे.

ज्यांनी सोशल मीडियावर हा दावा केलाय, त्यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तिहादुल मुसलमीन पक्षाचे (AIMIM) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाचा हवाला दिलाय.

ओवेसी यांनी मुंबईतील चांदिवली परिसरात 13 जुलै 2019 रोजी भाषण केलं होतं. या भाषणातील काही भाग सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

चांदिवलीतील या भाषणात ओवेसी म्हणतात, "जेव्हा मी इंडिया गेटला भेट दिली, त्यावेळी तिथे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची यादी पाहिली. इंडिया गेटवर 95 हजार 300 जणांची नावं लिहिली आहेत. तुम्हाला ऐकून आनंद होईल की, त्यातील 61 हजार 945 जण हे मुसलमान आहेत. म्हणजेच, 65 टक्के केवळ मुसलमान नावं आहेत."

"भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेच्या कुणाही व्यक्तीने जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही देशभक्त नाहीत, तर त्यांना इंडिया गेटवरील नावं पाहून येण्यास सांगा," असंही ओवेसी यांनी उपस्थितांना आवाहन केलं.

'मीम न्यूज एक्स्प्रेस' नावाच्या यूट्यूब चॅनेलवर 13 जुलै रोजी ओवेसींचं हे भाषण अपलोड करण्यात आलंय. या भाषणाला सव्वा लाखांहून अधिक व्ह्यूज आहे. याच व्हिडीओचा आधार घेत अनेकजण सोशल मीडियावर इंडिया गेटवरील नावांमध्ये सर्वाधिक मुसलमान असल्याचा दावा करत आहेत.

मात्र, या दाव्याची पडताळणी केली असता, आमच्या असं लक्षात आलं की, खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे.

इंडिया गेटवर किती सैनिकांची नावं?

दिल्ली सरकारच्या वेबसाईटनुसार, नवी दिल्लीस्थित 'इंडिया गेट' 1931 साली उभारण्यात आला. म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याच्या 16 वर्षं आधी.

42 मीटर उंचीचं हे स्मारक इंग्रजांच्या सत्ताकाळात ब्रिटिशांसाठी लढताना मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलं होतं. 'ऑल इंडिया वॉर मेमोरियल' असं या स्मारकाला म्हटलं जात असे.

या स्मारकावर 13,516 भारतीय सैनिकांची नावं लिहिली आहेत. यामध्ये 1919 सालच्या अफगाण युद्धात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय सैनिकांच्या नावांचा समावेश आहे.

कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह्ज कमिशनच्या यादीनुसार, 1914 ते 1919 दरम्यान ब्रिटिश सरकारसाठी लढताना मृत्युमुखी पडलेल्या 13,220 सैनिकांची नावं इंडिया गेटवर लिहिली आहेत.

कमिशनने आपल्या वेबसाईटवर सैनिकांची सेवा क्षेत्रानुसार म्हणजेच लष्कर, वायूदल आणि नौदल अशी विभागणी केलीय. यामध्ये सर्व धर्मीय सैनिकांचा समावेश आहे.

'कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह्ज कमिशन'च्या मुलभूत तत्त्वांनुसार, या सैनिकांमध्ये त्यांच्या पद, वंश आणि धर्माच्या आधारावर भेदभाव केला गेला नाही.

सरकारी आकडेवारीनुसार, 1921 साली इंडिया गेटचा पाया बांधला गेला. एडवर्ड लुटियन्सने पाया डिझाईन केला होता. त्यानंतर 10 वर्षांनी व्हॉईसरॉय लॉर्ड इरविन यांनी भारतीयांना इंडिया गेट समर्पित केलं.

'स्वातंत्र्यसैनिक' म्हणायचं का?

या सैनिकांना 'स्वातंत्र्यसैनिक' म्हटलं जाऊ शकतं का?

याबाबत इतिहासकार हरबन्स मुखिया म्हणतात, "ब्रिटिशांसाठी भारतीय सैनिक आफ्रिका, युरोप आणि अफगाणिस्तानात लढले, हे खरंय. मात्र ती लढाई वसहतवादी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नव्हती. ते सैनिक ब्रिटिशांच्या बाजूने लढत होते. त्यांच्याच स्मरणार्थ इंग्रजांनी हे स्मारक उभारलं. इंडिया गेट भारतीयांनी बनवलं नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे इंडिया गेट स्वातंत्र्यसैनिकांचं स्मारक आहे, असं कसं म्हटलं जाऊ शकतं?"

"भारतीय स्वातंत्र्याची लढाई अनेक दशकांची आहे. अनेक स्तरावर आपल्याला लढावं लागलं. मात्र ज्यावेळी इंग्रजांविरोधात भारतीयांच्या लढ्याने निर्णायक वळण घेतलं, तेव्हा इंडिया गेट बनलंही होतं."

ओवेसी फेक न्यूजचे शिकार झाले?

इतिहासकार मानतात की, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सर्व जाती-धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता आणि मुस्लीम समाजातील असे अनेकजण होऊन गेले, ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात बलिदान दिलं.

मात्र इंडिया गेटशी संबंधित ओवेसींचा दावा खोटा असल्याचं आमच्या पडताळणीत आढळलं.

इंडिया गेटवर 90 हजार हून अधिक सैनिकांची नावं असून, त्यात 65 टक्के मुसलमानांची नावं आहेत, हा ओवेसींचा दावा केवळ अफवा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही अफवा सोशल मीडियावर शेअर होत आहे.

2017 आणि 2018 या दोन वर्षांमध्येही अशा काही पोस्ट आम्हाला आढळल्या, ज्यात इंडिया गेटशी संबंधित हाच दावा करण्यात आलाय.

तर मग असदुद्दीन ओवेसी सोशल मीडियावरील अफवेला बळी पडले? की आणखी काही कारण होतं? याबाबत आम्ही ओवेसींशीच संपर्क साधला.

ओवेसी म्हणाले, "काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांचं नवं पुस्तक 'व्हिजिबल मुस्लीम, इनव्हिजिबल सिटीझन' या पुस्तकात वाचून इंडिया गेटशी संबंधित दावा मी भाषणात केला होता. मात्र, अशा तथ्थ्यांबाबत मला अधिक सतर्क राहिलं पाहिजे."

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी 'व्हिजिबल मुस्लीम, इनव्हिजिबल सिटिझन' या नव्या पुस्तकातील पान क्र. 55 आणि 56 वर हा दावा केला आहे.

खुर्शीद यांनी पुस्तकात म्हटलंय की, "95 हजारांहून अधिक स्वातंत्र्यसैनिकांची नावं इंडिया गेटवर लिहिली आहेत. यामध्ये 61 हजारांहून अधिक मुस्लीम नावं आहेत. म्हणजे जवळपास 65 टक्के नावं."

मात्र, सरकारी आकडेवारी आणि कॉमनवेल्थ कमिशनच्या यादीनुसार हा दावा खोटा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)