You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांची 400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त #पाचमोठ्याबातम्या
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :
1) मायावतींच्या भावाची 400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचे भाऊ आनंद कुमार यांची उत्तर प्रदेशातल्या नोएडामधली जवळजवळ 7 एकर बेनामी जमीन आयकर विभागाने जप्त केली आहे.
या जमिनीचा बाजारभाव 400 कोटी रुपये इतकी असल्याची बातमी सकाळने दिली आहे.
ही जमीन आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्र लता यांच्या नावावर असून आयकर विभागाने ते जप्त करण्याचे आदेश 16 जुलैला देण्यात आले होते.
या जमिनीवर 5 स्टार हॉटेल्स बांधण्याचा प्लॅन होता. आनंद कुमार हे बसपचे उपाध्यक्ष आहे.
दरम्यान, "प्रतिस्पर्ध्याला संपवण्यासाठी भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. पण बसप त्याला बळी पडणार नाही. 2003मध्येही तत्कालीन भाजप सरकारने आमच्यावर CBI आणि आयकर विभागाद्वारे आमच्यावर निशाणा साधला होता", असा मायावतींनी यांनी आरोप केला आहे.
2) कांचीपुरम: अथिवररदार मंदिरातील चेंगराचेंगरीत चार ठार
तामीळनाडूमधल्या कांचीपुरम येथील अथिवररदार मंदिरात मिरवणुकीवेळी 4 भाविकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली नसून पीडित व्यक्तींची प्रकृती आधीच बिघडलेली असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी म्हटलं आहे. दरम्यान या मंदिरातील गैरव्यवस्थेमुळेच भाविकांचा बळी गेल्याची टीका तामिळनाडूच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली आहे.
कांचीपुरम चेन्नईपासून 70 किलोमीटरवर असून, तेथील अथिवररदार मंदिरात दर 40 वर्षांतून एकदा अथिदेवतेची मूर्ती पाण्याबाहेर काढली जाते.
मृत भाविकांपैकी दोन महिलांसह तिघांचे वय 50 हून अधिक होते. एकजण आंध्र प्रदेशातील 21 वर्षांचा तरुण आहे. मृतांच्या वारसांना तामिळनाडू सरकारने प्रत्येकी एक लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.
या मंदिरात गुरुवारी सुमारे दीड लाखाहून अधिक भाविक होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.
3) राज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातल्या 5 जिल्हा परिषदा बरखास्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. ABP माझाने ही बातमी दिली आहे.
ग्रामविकास खात्याने गुरुवारी यासंदर्भातले आदेश दिले. आता या पाचही जिल्हा परिषदांच्या 'प्रशासकपदी' संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पाचही जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्या कार्यरत होत्या. नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2017 मध्ये संपला होता. नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपून 2 वर्ष उलटली आहेत तर अन्य जिल्हा परिषदांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती.
इतर 4 जिल्हा परिषदांचा कार्यकाळ डिसेंबर 2018 मध्ये संपला होता. या ठिकाणच्या आरक्षण प्रक्रियेसंदर्भात उच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया लांबली होती, असंही या बातमीत म्हटलं आहे.
4) विदर्भ, मराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ
मराठवाड्यात 15 जुलैपर्यंत 49 टक्के पाऊस पडणे अपेक्षित होते. त्यापैकी वार्षिक सरासरीच्या केवळ 16 टक्केच पाऊस पडला आहे. पहिल्या पावसाच्या आधारावर ज्यांनी पेरण्या केल्या तेथे आता पिकांची अवस्था वाईट आहे. येत्या आठ-दहा दिवसांत पाऊस नाही आला तर पिकांचे मरण अटळ आहे, असं लोकसत्ताच्या बातमीत म्हटलं आहे.
गेल्या वर्षीदेखील अगदी असेच घडले होते. ओल संपल्याने पीकाचं मूळ तग धरू शकणार नाही. या भागात आतापर्यंत फक्त एकच मोठा पाऊस झाला आहे, असं काही शेतकऱ्यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितलं.
संपूर्ण मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत केवळ 53 टक्केच पाऊस झाला. मराठवाड्यात एकूण लागवड क्षेत्र जवळजवळ 50 लाख हेक्टर आहे. पण त्यापैकी 24.31 लाख हेक्टर. म्हणजे 48.66 टक्के पेरण्या झाल्या आहेत.
5) उपासमारीमुळे ग्रामस्थांनी गाव काढले विक्रीला!
सलग 4 वर्षांपासूनचा दुष्काळ, त्यातून आलेली नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारी अशा दुष्टचक्रात सापडलेल्या ताकतोडा (ता. सेनगाव, हिंगोली) येथील ग्रामस्थांवर उपासमारीची पाळी आल्याने त्यांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचं लोकमतच्या बातमी म्हटलं आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा गावाची लोकसंख्या सुमारे 1,200 इतकी आहे. शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. पण गेली सलग 4 वर्षे या ठिकाणी पुरेसा पाऊसच पडला नाही. यंदाही जुलै महिना संपत आला तरी पाऊस पडला नाही. परिणामी पेरण्यासुद्धा खोळंबल्या आहेत.
ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. मागच्या वर्षात गंभीर दुष्काळ असूनही शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ अद्यापही मिळाला नाही.
सरकार जोपर्यंत याकडं लक्ष देत नाही तोपर्यंत गावातील शासकीय कार्यालये व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर एक पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर 'मुख्यमंत्री साहेब, आमचे गाव शेतजमिनीसह विकत घ्या' असा उल्लेख करण्यात आला असल्याचं या बातमी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)