अंशुला कांत: दिल्लीतील एक विद्यार्थिनी ते वर्ल्ड बॅंकेच्या संचालक, जाणून घ्या अंशुला यांचा प्रवास

स्टेट बँकेच्या अध्यक्षा अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. जागतिक बँकेच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

"अंशुला यांना बँकिंग, फायनान्स या क्षेत्रात 35 वर्षांचा अनुभव आहे आणि तंत्रज्ञानाचा वापरही त्या अत्यंत कुशलतेने करतात." असं जागतिक बँकेचे समूह अध्यक्ष डेविड मालपास यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रिस्क ट्रेजरी, निधीवाटप, ऑपरेशन्स अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. आम्ही अनेक विकासाच्या अनेक योजना राबवण्याकडे आमचा नेहमीच कल असतो. त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी आमच्या टीममध्ये त्यांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे" असं जागतिक बँकेने जारी केलेल्या निवेदनात ते म्हणाले.

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून आर्थिक घडी सांभाळणं ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल. आर्थिक ताळेबंदाचा अहवाल देणे, जागतिक बँकेच्या सीईओंबरोबर काम करणं, या त्यांच्या अन्य जबाबदाऱ्या असतील.

1960 मध्ये जन्मलेलेल्या कांत यांचं शिक्षण दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून झालं आहे. त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. सप्टेंबर 2018 पासून त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्टेट बँकेत अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलं असून मुख्य आर्थिक अधिकारी या नात्याने त्यांनी 38 बिलियन डॉलरचं उत्पन्न बँकेला मिळवून दिलं होतं.

अंशुला कांत पदभार कधी हातात घेतील याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

जागतिक बँक काय आहे?

जागतिक बँकेची स्थापना 1944 मध्ये झाली. त्याचं मुख्यालय वॉशिंग्टनला आहे. विकसनशील देशांना अर्थपुरवठा करणं हे या बँकेचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तसंच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी किंवा धोरण विकसित करण्यासाठी तांत्रिक सहाय्य ही बँक पुरवते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक व्यापार संघटनेच्या सहाय्याने आर्थिक घडी सुरळीत ठेवण्याचं काम ही बँक करते.

दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था सुदृढ करण्याच्या दृष्टीने जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली. जू न 1946 पासून बँकेने काम करायला सुरुवात केली. महायुद्धानंतर पश्चिम युरोपला त्यांनी पहिल्यांदा अर्थसहाय्य केलं. 1950 पासून बँकेने विकसनशील देशातील रस्ते बांधणी, वीजनिर्मिती अशा महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य करण्यास सुरुवात केली.

या बँकेच्या अध्यक्षपदावर सुरुवातीपासूनच अमेरिकेचा वरचष्मा राहिला आहे. 10 हजारांपेक्षा अधिक लोक या बँकेत काम करत असून त्यांचे एक चतुर्थांश कर्मचारी विकसनशील देशात आहेत. जवळजवळ 70 देशात या बँकेची कार्यालयं आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)