You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रकाश आंबेडकर: काँग्रेस दिशाहीन, विधानसभा स्वबळावर लढणार #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. काँग्रेस दिशाहीन, विधानसभा स्वबळावर लढणार - प्रकाश आंबेडकर
विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. ते म्हणाले "काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा काही प्रश्न येत नाही. राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे.
"आता महिना झाला तरी काँग्रेस अध्यक्ष कोण होईल हे स्पष्ट नाही. जर वाटाघाटी करायच्या झाल्या तर कुणासोबत करणार?" असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. हे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
विधानसभेसाठी काँग्रेसला 40 जागा सोडू असं विधान बहुजन वंचित आघाडीचे महासचिव गोपीचंद पाडळकर यांनी केलं होतं. त्यावर काँग्रेसने उत्तर दिलं की हे हास्यास्पद विधान आहे.
2. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द
पाच वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या सेवेत मराठा कोट्यातील रिक्त ठेवलेल्या विविध पदांवर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातून केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.
रद्द केलेल्या जागांवर मराठा समाजातील उमेदवारांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश सर्व शासकीय-निमशासकीय विभाग व कार्यालयांना देण्यात आले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी यासंबंधी एक सविस्तर शासन आदेश जारी केला आहे. त्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे शासकीय सेवेतील विविध पदांवर मराठा कोट्याअंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या मराठा उमेदवारांच्या नियुक्त्यांना नव्या मराठा आरक्षण कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे.
तसेच त्या कालावधीत न्यायालयाच्या स्थगितीमुळे भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. ती 'एसईबीसी' आरक्षण लागू करून पूर्ण करण्याच्या सूचनाही सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.
3. अयोध्याप्रकरणी तोडगा न निघाल्यास दररोज सुनावणी
अयोध्येतील वादग्रस्त जमीनप्रकरणी राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद अशा दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी नेमलेल्या मध्यस्थांच्या चर्चेची सध्याची परिस्थिती काय आहे, याचा ताजा अहवाल आठवड्याभरात सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.
वादाच्या मुद्द्यावर चर्चेने मार्ग निघत नसल्याचे स्पष्ट झाल्यास, तर २५ जुलैपासून या अयोध्याप्रकरणी दररोजी सुनावणी करण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करून निर्णय द्यावा, अशी मागणी करणारी याचिका गोपालसिंग विशारद यांनी दाखल केली होती. त्या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली.
त्यावेळी घटनापीठाने हा निर्णय जाहीर केला. मध्यस्थ आणि चर्चेतून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे न्यायालयानेच निकाल द्यावा, अशी मागणी विशारद यांनी अर्जातून केली होती. समितीच्या आजवर झालेल्या बैठकांचा तपशीलही त्यांनी यावेळी घटनापीठापुढे मांडला. हे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे.
4. हरेन पंड्या हत्येप्रकरणी 12 आरोपी दोषी - सर्वोच्च न्यायालय
गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवून १२ आरोपींना दोषी ठरवले आहे. २६ मार्च २००३ रोजी पंड्या यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
सत्र न्यायालयाने या 12 आरोपींना शिक्षा ठोठावली होती. यापैकी काहीजणांना जन्मठेप देण्यात आली होती. या निकालाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल बदलून २९ ऑगस्ट २०११ रोजी सर्व आरोपींना दोषमुक्त केले होते. या निकालाविरोधात गुजरात सरकार आणि 'सीबीआय'ने २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.
5. काँग्रेसच्या माध्यम समन्वयकाचा राजीनामा
राहुल गांधी यांनी राजीनामा देऊन 45 दिवस होऊन गेले तरी नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीचे कोणतेच चिन्ह दिसत नसल्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक रचित सेठ यांनी राजीनामा दिला आहे. याबाबतचे वृत्त हिंदुस्थान टाईम्सने वेबसाईटवर प्रकाशित केले आहे.
रचित सेठ यांनी राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे कळवले आहे. हे पत्र त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केलं आहे.
"प्रचंड प्रेम आणि आदर यांच्यासह मी या पदावरून राजीनामा देत आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर कायम राहण्यात काहीच अर्थ नाही."
"उदारमतवादी आणि पुरोगामी भारतासाठी माझं रक्त नेहमीच सळसळत राहील. श्रीमती इंदिरा गांधी माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहतील. लहान भावाप्रमाणे मला मार्गदर्शन केल्याबद्दल आभार," असं रचित यांनी पत्रात म्हटलं आहे.
दुसरीकडे, माजी सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही काँग्रेस अध्यक्षाची लवकरात लवकर निवड करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर सिंधिया यांनीही राजीनामा दिला होता. राहुल यांचा राजीनामा म्हणजे अकल्पनीय असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाला पुनःश्च उभारी देऊ शकणाऱ्या नेत्याला अध्यक्षपदी निवडण्यात यावं, असं ते म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)