ऋग्वेद, उपनिषदातले श्लोक वाचलेत, तरी आदर्श खासदार व्हाल: अमित शाह #5मोठ्याबातम्या

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. 'ऋग्वेद, उपनिषदातील श्लोक वाचलेत, तरी आदर्श खासदार व्हाल'

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा संसद भवनाच्या ग्रंथालयात बसून वेळ सत्कारणी लावा, असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला आहे. लोकसभेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खासदार कार्यशाळेत अमित शाह यांनी नवीन खासदारांशी संवाद साधला. सकाळनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

लोकशाही ही पाश्चात्यांनी दिलेली देणगी आहे, असं मी मानत नाही. भारतात बौद्धकाळापासून आणि त्याच्या आधी महाभारतापासून संसदीय पद्धती देशात अस्तित्त्वात आहे, असं शाह यांनी म्हटलं. भारतीय संसदेच्या भिंतीवर कोरलेले ऋग्वेद, उपनिषदं आणि सर्व धर्मातील श्लोक अर्थासह वहीत उतरवून वाचलीत, तरी तुम्ही आदर्श खासदार व्हाल, असा कानमंत्र अमित शाह यांनी आपल्या नवनिर्वाचित खासदारांना दिला.

खासदार कार्यशाळेसाठी अमित शाह यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकसभा सभापती ओम बिर्लाही उपस्थित होते.

2. '50 हजारपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारासाठी आता आधार कार्डही वापरता येणार'

50,000 रुपयापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारासाठी आता पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डचा वापर करता येणार असल्याची माहिती महसूल सचिव अजय भूषण पांडेय यांनी दिली आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

आर्थिक व्यवहार

फोटो स्रोत, Reuters

ज्या ठिकाणी पॅन कार्ड अनिवार्य होतं, तिथं आता आधार कार्ड स्वीकारण्यासाठी बँकांना त्यांच्या यंत्रणेत सुधार करावा लागेल, असं त्यांनी म्हटलं. करदात्यांच्या सोयीसाठी पॅन ऐवजी आधार कार्ड वापरता येईल अशी तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे.

"सध्या 22 कोटी पॅन कार्ड आधारशी लिंक आहेत. 120 कोटी लोकांकडे आधार कार्ड आहे. त्यामुळे एखाद्याला पॅन कार्ड हवं असेल तर आधी आधार कार्ड लागेल. मग पॅनकार्ड मिळेल. आता आधार असल्यास पॅन कार्डची गरज नसेल. हे खूप सोयीचं आहे," असं ते पुढे म्हणाले.

3. 'विधानसभेसाठी अडीच कोटी मतांचं लक्ष्य ठेवा'

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून साडेपाच कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. विधानसभेसाठी त्याच्या पन्नास टक्के म्हणजे अडीच कोटी मतं मिळविण्याचं लक्ष्य भाजपनं ठेवलं पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं. लोकसत्तानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईत भाजपच्या सदस्यता अभियानाची सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. 'भाजपच्या या पन्नास टक्के मतांच्या फॉर्मुल्यामुळं शिवसेनेसोबतच्या युतीचे काय होणार, याची काळजी कोणीही करण्याचे कारण नाही. जिथं आपल्याला गरज लागेल तिथं आपल्या भरवशावर आणि जिथं मित्राला गरज लागेल तिथं मित्रांसाठी आपण काम करू,' असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

4. कोंढव्यातील दुर्घटनेप्रकरणी दोघा जणांना न्यायालयीन कोठडी

पुण्यात कोंढवा परिसरातील 'अॅल्कॉन स्टायलस' या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 मजूर ठार झाले होते. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना शनिवारी (6 जुलै) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांच्या कोर्टानं हा आदेश दिला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

कोंढवा दुर्घटना

फोटो स्रोत, ANI

विवेक सुनील अगरवाल (वय ३२) व विपुल सुनील अगरवाल (३०) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळं त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. या दोघांकडे तपास करण्यासाठी पुरेसे मुद्दे पोलिसांकडे नसल्यामुळे त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

पुणे मनपा बांधकाम विभागसोबत अॅल्कॉन स्टायलसच्या पडलेल्या भिंतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असं सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी न्यायालयात युक्तिवादादरम्यान सांगितलं.

5. मुंबईतल्या अनधिकृत पार्किंगवर आजपासून दंडात्मक कारवाई

मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहनतळालगतच्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या 23 सार्वजनिक वाहनतळालगतच्या अनधिकृत पार्किंगवर रविवारपासून (7 जुलै) दंडात्मक कारवाईला सुरूवात होईल. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

या नियमानुसार संबंधित परिसरात एखादे अवजड वाहन अनधिकृतपणे उभं असल्यास त्यावर 15 हजार रुपये दंड आकारणी केली जाईल. मध्यम आकाराच्या वाहनांवर 11 हजार रुपये आणि कार-जीपसारख्या वाहनांवर 10 हजार रुपये दंड केला जाईल.

रिक्षा, साईडकार असलेलं दुचाकी वाहन यांवर 8 हजार रुपये तर दुचाकी वाहनांवर किमान 5 हजार रुपये दंड आकारला जाईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)