नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सारस पक्ष्यांना असं दिलं गेलं जीवदान

फोटो स्रोत, Mayank Mishra
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
लांब चोच, लाल तोंड आणि करड्या पांढऱ्या शरीराचा सारस पक्षी आपण चित्रात, फोटोत पाहिलेला असतो. इतर अनेक पक्ष्यांप्रमाणेच सारसच्या अस्तित्वाला आणि त्याच्या अधिवासाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
पण गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रयत्नांनंतर महाराष्ट्रातल्या गोंदिया आणि मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यामध्ये सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
भारतामध्ये सारस पक्षी साधारणतः उत्तर भारतामध्ये आढळतो. परंतु मध्य भारतामध्ये बालाघाट, गोंदिया आणि भंडारा इथं त्याचं अस्तित्व टिकून राहिलं आहे.
गोंदिया जिल्ह्यात वन खात्याने आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने 2004 साली केलेल्या सर्वेक्षणामध्ये केवळ 4 सारस पक्षी शिल्लक राहिल्याचे गोंदियातील सेवा संस्थेचे सावन बहेकार सांगतात.
मात्र आता वन खाते, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था आणि शेतकऱ्यांच्या मदतीने ही संख्या 42 वर गेली असून शेजारच्या बालाघाट जिल्ह्यामध्ये ती संख्या 52 वर गेली आहे, असं बहेकार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
सारस पक्षी कसा असतो?
सारस हा एक उंच पक्षी आहे. नर सारस सुमारे 4.5 ते 5 फुटांचा तर मादी 3.5 फुटांपर्यंत असते.
सारस पक्षी नेहमी जोडीनेच राहातात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक सारस असल्याची नोंद आहे. मात्र त्याला जोडीदार नसल्यामुळे तेथे संख्या वाढणे कठिण असल्याचे सावन बहेकार यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

फोटो स्रोत, SEWA
सारस पक्षी हा धान्य, किडे खाऊन जगतो. त्यातही किडे, अळ्या खाण्यावर भर असतो. त्यामुळे त्याला शेतातला 'नॅचरल पेस्ट कंट्रोलर' असं म्हटलं जातं. सारस शेतामध्ये असणं शेत उत्तम स्थितीत असल्याचा संकेत मानला जातो.
गोंदियामध्ये सारस पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी काय केले गेले?
सारस पक्षी महाराष्ट्रातून पूर्ण नामशेष होतील अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु एकत्रित प्रयत्नांमुळे ही स्थिती बदलण्यात गोंदियाच्या लोकांना यश आलं. सारसचा अधिवास असणाऱ्या गोंदिया, भंडारा, बालाघाट या प्रदेशाला 'सारसस्केप' असं नाव देण्यात आलं.
सारस पक्षी आपलं घरटं एखाद्या पाणथळ जागेजवळ किंवा भरपूर पाण साचत असलेल्या शेतामध्ये तयार करतो. या घरट्याचा पसारा साधारणतः 10 फुटांपर्यंत असू शकतो.
आजूबाजूचं गवत वापरून जमिनीवरच हे घरटं तयार होतं. सारस पक्ष्याची जोडी वर्षभरात एकदाच तेही मॉन्सूनच्या काळामध्ये घरटं बांधते. एका वर्षात केवळ एक किंवा दोनच अंडी ही जोडी देते.
जर शेतामधली किंवा पाणथळ जागांजवळची परिस्थिती सुरक्षित वाटली नाही तर सारस पक्ष्याची जोडी घरटंच बांधत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षित वाटेल अशी स्थिती तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते.

फोटो स्रोत, SEWA
गोंदिया जिल्ह्यात ज्या शेतांमध्ये ही घरटी बांधली जातात, अशा शेतांच्या जागा शोधून काढल्या गेल्या.
संबंधित शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्याशी चर्चा करून सारसच्या घटत्या संख्येबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. सारस पक्ष्याला कीटकनाशकांच्या वापरामुळे धोका निर्माण होतो. हा धोका कमी करण्यासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी करण्याचं आवाहन करण्यात आलं.
सारस पक्ष्याला असं संरक्षण देण्यामुळं आज या सारसस्केपमधली सारसची संख्या वाढली आहे.
जून महिन्यामध्ये सारस पक्ष्यांची संख्या मोजण्यासाठी बालाघाट जिल्ह्यात 20 तर गोंदिया-भंडारा जिल्ह्यांमध्ये 22 चमू तयार केले गेले. या लोकांनी पाणथळ जागा, नद्या शेतांमध्ये, तलावांजवळ जाऊन पाहाणी करून ही संख्या मोजण्यात आली.
या मोजणीमध्ये गोंदिया जिल्ह्यात 40 ते 42 सारस, बालाघाटमध्ये 52 ते 54, भंडारा जिल्ह्यात 3 आणि चंद्रपूरमध्ये 1 सारस पक्षी आढळला.
सारससाठी लोकांमध्ये जागृती निर्माण केली
गोंदियाच्या घाटतिमनी गावात राहाणारे बबलू चुटे यांनी सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबाबत बीबीसी मराठीला सांगितले.
ते म्हणाले, "पूर्वी अज्ञानामुळे सारस पक्ष्याच्या अंड्यांची चोरी व्हायची पण नंतर लोकांना व्यवस्थित माहिती दिल्यानंतर लोक सारसच्या घरट्यांची काळजी घेऊ लागले.
आमच्या ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या शेतात घरटे केले जाते. त्याला सेवा संस्थेद्वारे आणि इतर संस्थांद्वारे मदत केली गेली.

फोटो स्रोत, SEWA
जनजागृतीसाठी चित्रांचा वापर करण्यात आला, वेगवेगळ्या घोषणांद्वारे आम्ही लोकांपर्यंत माहिती पोहोचवली. आज लोक सारस आपल्या शेतात येणं सन्मानाची बाब समजतात आणि ते सारसमुळे फार आनंदी आहेत."
"सारस वाचवणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरवही करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांचा हुरूप वाढला आणि त्यांनी संवर्धनासाठी जोमाने प्रयत्न केले. त्याचं फळ आज दिसत असल्याचं," चुटे सांगतात.
'सर्व श्रेय गावकऱ्यांचेच'
सारस पक्ष्यांची संख्या वाचवण्याचं श्रेय गावकऱ्यांनाच दिलं पाहिजे. प्रशासनाने आणि सामाजिक संस्थांनी त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले, असं मत गोंदियाचे उपवनसंरक्षक एस. युवराज यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले, "सारस पक्ष्याच्या संवर्धनाबाबत शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला त्यामुळेच हे शक्य झालं. आपण काहीतरी वेगळं महत्त्वाचं करत आहोत अशी भावना शेतकऱ्यांमध्ये असल्यामुळेच सारसचं संवर्धन आणि संरक्षण शक्य झालं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








