You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बलात्काराला विरोध केला म्हणून आई-मुलीचं मुंडण करून धिंड काढली
बिहारची राजधानी पटनापासून साधारण 45 किलोमीटर दूर असणाऱ्या वैशाली जिल्ह्यातल्या भगवानपूर भागात आपल्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा विरोध केला म्हणून आई-मुलीचं मुंडण करून त्यांची धिंड काढल्याचा प्रकार घडला आहे.
बुधवारी संध्याकाळी काही लोकांनी या दोन महिलांवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा या दोघींनी या अत्याचाराचा विरोध केला तेव्हा गावातल्या काही मंडळींनी, ज्यात दोन पंचायत समितीचे सदस्य आणि गावाचे सरपंच यांचाही समावेश होता, न्हाव्याला बोलवून या दोघींचं मुंडण केलं. आणि मग संपूर्ण गावात धिंड काढली.
या मायलेकीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे भगवानपूर पोलीस ठाण्यात सात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तींमध्ये पंचायत समिती सदस्य मोहम्मद खुर्शीद, सरपंच मोहम्मद अंसारी, मोहम्मद शकील, मोहम्मद इश्तेखार, मोहम्मद शमशूल हक, मोहम्मद कलीम आणि न्हावी दशरथ ठाकूर यांचा समावेश आहे.
वैशालीचे पोलीस अधिक्षक मानवजीत सिंह ढिल्लों यांनी बीबीसीला सांगितलं की गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच तासांतच मोहम्मद शकील आणि दशरथ ठाकूर यांना अटक करण्यात आली. इतर आरोपींच्या अटकेसाठी छापेमारीचं सत्र चालू आहे. पोलीस लवकरच त्यांनी अटक करतील.
पोलीस अधीक्षकांनी हेही सांगितलं की, "पीडित मायलेकीला CrPc च्या सेक्शन 164 खाली मॅजिस्ट्रेट समोर जबाब नोंदवायला कोर्टात नेलं आहे. तिथून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येईल.
ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर ठाण मांडून बसले आहेत. इतर आरोपींना पकडण्यासाठी एका विशेष टीमची स्थापना केली आहे.
महिला आयोगाचा दौरा
दुसरीकडे राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. या आयोगाच्या अध्यक्ष दिलमणी मिश्रा यांनी आयोगाच्या इतर सदस्यांसोबत गुरूवारी भगवानपूरचा दौरा केला.
दिलमणी यांनी बीबीसीला सांगितलं, "ही घटना दुःखद आहे. मी पीडित महिलांशी बोलले आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल. गावातल्या काही गुंड लोकांनी असं केलं आहे. तिथल्या पोलीस अधिक्षकांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की सगळ्या आरोपींना लवकरात लवकर पकडलं जाईल. आम्ही हे प्रकरण केंद्रीय महिला आयोगाकडे पाठवत आहोत."
भगवानपूर ठाण्याचे प्रभारी संजय कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की ज्या गावात ही घटना घडली तिथे मुख्यत्वे करून मुसलमान राहातात. या प्रकरणातही न्हावी सोडून सगळे आरोपी मुसलमान आहेत. पीडित मायलेकीपण त्यांच्या शेजारी राहातात आणि मुसलमान आहेत. त्या घरात दोघीच राहातात. त्यांच्या घरातले पुरुष कामानिमित्ताने बाहेर राहातात.
वैशालीचे कलेक्टर राजीव रोशन यांनी बीबीसीला सांगितलं की, ही घटना एक अत्यंत निंदनीय गुन्हा आहे. "आई-मुलींचे जबाब नोंदवून घेतले आहेत. पुढचा तपास पोलीस करत आहेत. लवकरच सगळं सत्य बाहेर येईल. आम्ही लवकरात लवकर कारवाई करू."
महिलांवर अत्याचार होण्याची बिहारमधली पहिलीच घटना नाहीये. काही महिन्यांपूर्वी भोजपूरच्या बिहिया गावातल्या लोकांनी संशयावरून एका मध्यमवयीन महिलेला मारहाण केली होती तसंच विवस्त्र करून बाजारात धिंड काढली होती.
अर्थात, या प्रकरणी स्पीडी ट्रायल झाल्याने आरोपींना लगेचच अटक झाली आणि कोर्टांने त्यांना शिक्षाही सुनावली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)